आपला प्रवास सुखाचा होवो..

24 Aug 2024 14:30:00


आपला प्रवास सुखाचा होवो..

हल्ली रस्ता ओलांडणे हे मोठे अवघड काम झाले आहे. रोज नव्या वाहनाचा वाहतूकीत समावेश होतो. माणसांना रहायला घरे पुरत नाहीत तसं वाहनांनाही आता रस्ते पुरेनासे झाले आहेत. एका गावाला जाण्यासाठी या वाहनांच्या कोंडीतूनच मी घर ते बसस्थानक असा 'प्रवास' केला. अर्थात घरुन बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी पोचणे यात 'वाहतूक कोंडी' नावाची गोष्ट सगळ्यांच्या पत्रिकेत 'काॅमन' असते, असेच म्हणावे लागेल. 'बस'स्थानक या ठिकाणी फक्त 'उभे' राहूनच आपली बस शोधावी लागते. फलाट सतत बदलते ठेवणे हा बसस्थानकाच्या व्यवस्थापनाने पाळलेला अलिखित नियम असल्यामुळे मी थेट चौकशी कक्ष गाठला. तेव्हा आपला चेहरा सुशिक्षित असणे किंवा दिसणे म्हणजे आपल्याला माहिती विचारण्याचा अधिकार नसतो, हे आपल्या लक्षात येते. "एवढे शिकलेले दिसता आणि साध्या पाट्या वाचता येत नाहीत का?" असे उत्तर आपल्याला मिळते. याउलट एखाद्या अशिक्षित माणसाने चौकशी कक्षात जाऊन आपला प्रश्न विचारला म्हणजे त्याला उत्तर मिळते, " इथे यायचे कसे समजले तशीच आता बस शोधा!" पण मला यावेळी चौकशी कक्षात अगदी सविस्तर माहिती मिळाली. त्यामुळे 'बस'फुगडी न घालता योग्य बस मला सापडली. आसन क्रमांक देखील लगेच मिळाला. अर्थात आता बसेसचे स्वरुप बदलले आहे. साधी बस ते वातानुकूलित बस यात वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात वातानुकूलित बस जरा ब-या असल्यामुळे माझ्या आसनावर बसून मी त्या गारव्याचा सुखद अनुभव घेत बस सुटण्याची वाट बघत बसलो.

वाहक या व्यक्तीच्या स्वरुपात फारसा बदल झालेला जाणवला नाही. सुटे पैसे देण्या-घेण्याच्या चर्चा ऐकल्यामुळे जरा हायसे वाटले. बसचे रुपडे बदलले असले तरी स्वभावात फारसा बदल झालेला नाही. आईवडील, गुरुजन, वडीलधारी मंडळी याप्रमाणेच वाहक ही व्यक्ती देखील आपल्या आयुष्यात महत्त्वाची आहे. "मधले पुढे चला, दरवाजात थांबू नका, पुढे जात रहा" असे प्रवासभर हा माणूस प्रोत्साहन देत असतो. ही प्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळाले म्हणजे प्रवासाला ख-या अर्थाने दिशा मिळते. आपल्या आयुष्याला 'ब्रेक' लागू नये म्हणून खिळखिळे झालेले ब्रेक देखील ऐनवेळी चालक बरोबर लावतो. हे चालक आणि वाहक बसचा प्राण असतात. शहराच्या वाहतूक कोंडीतून आपण बाहेर पडलो म्हणजे बस छान वेगाने धावू लागते. मगाशी असणारी सगळी गडबड संपून थोडीशी शांतता आता जाणवत असते. तेव्हा आपसूकच छानशी डुलकी आपल्याला लागते. पण मधेच जोरात ब्रेक दाबल्याचा किंवा आणखी कशाच्या तरी आवाजाने आपल्याला जाग येते. खिडकीतून तेव्हा बाहेर बघितले की निसर्गाचा सुंदर आविष्कार आपण बघतो. हिरवाईने नटलेले डोंगर पाहिले म्हणजे मन सुखावते. महाकाय डोंगर नि द-या आणि त्यातून वाट काढत जाणारे वळणावळणांचे रस्ते पाहताना मन अगदी लहान होते. याबरोबरच खिडकीतून बाहेर पाहिल्यावर आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे मोठाल्या पाट्या.. सूचनावजा मजकूर या पाट्यांवर असतो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, अति घाई संकटात नेई, आपला प्रवास सुखाचा होवो, सुरक्षित अंतर ठेवा वगैरे पाट्या वाचताना भारी मजा येते. त्याबरोबरच त्या पाट्या वाचून व्यवस्थितपणे सूचना पाळल्या म्हणजे अपघातांचे प्रमाण काहीसे कमी होईल हेही जाणवते. घाट उतरला की एखादे गाव दिसू लागते. त्या गावच्या बसस्थानकात बस शिरताच चढण्या-उतरण्याची प्रवाशांप्रमाणेच लगबग सुरु होते ती विक्रेत्यांची! आलेपाक हा त्यातील एक पारंपारिक पदार्थ.. प्रवासाचा त्रास होऊ नये आणि कंटाळा येऊ नये म्हणून अधेमधे आलेपाक चघळावा. लिंबू किंवा संत्र्याच्या गोळ्या अगदी हमखास विकल्या जातात. पूर्वी वडा आणि चहा घेण्यासाठी बसमधून खाली उतरावे लागे. पण हल्ली गरमगरम वडे, पाण्याच्या बाटल्या बसमध्ये विक्रेते घेऊन येतात. यातील काही पदार्थ प्रवासातच चवदार वाटतात. एरवी आपण आलेपाक, संत्र्याच्या गोळ्या खाल्ल्या तरी प्रवासात लागलेली ती चव त्या पदार्थांना येत नाही. त्यामुळे ज्याला प्रवासात काही खाल्ले म्हणजे त्रास होत नाही अशा माणसाने या सा-या पदार्थांचा नेहमीच आस्वाद घ्यावा. या पदार्थांबरोबरच विक्रेत्यांची ते पदार्थ विकण्याची पद्धत मोठी चवदार असते. ती विशिष्ट लय ऐकली म्हणजे भारी मजा वाटते. आपल्या कुटुंबियांचा 'भार' ही विक्रेते मंडळी आपल्या डोक्यावर रोज उचलत असतात..

निरनिराळ्या रस्त्यावरुन, वेगवेगळ्या बसस्थानकाची ही दृश्ये बघत आपण इच्छित स्थळी पोचतो नि चार-पाच तासांच्या या प्रवासात शेजारचा प्रवासी, वाहक वगैरे सर्वांचा निरोप घेऊन बसमधून खाली उतरत बसस्थानकाचाही निरोप घेतो. हल्ली प्रवासाची पुष्कळ साधने उपलब्ध आहेत. मोबाईलच्या एका 'क्लिक'वर ती वाहने मागवता येतात. पण 'गाव तिथे एसटी' हे ब्रीदवाक्य असणा-या आपल्या लालपरीतून एकदा तरी नक्की प्रवास करावा. असा प्रवास जर आपण करणार असाल तर, आपला प्रवास सुखाचा होवो!

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0