फारफार तर विंडोग्रीलच्या पडद्याआडून बाहेर उसंत घेत असणारी गॅलरीतून पडत असलेली पावसाची थेंब बघत बसायची माझी सवय आहे,पाऊस मला पूर्वी कधीच आवडला नाही,त्याला कारणे अनेक होती.
परंतु आपल्या आवडल्या न आवडल्याने काही होत नसते अन् ते मला नकोही होते,कारण संपूर्ण सृष्टीचक्र त्यावर चालते....
पहाटेच्या फिरण्यासाठी तयार झालो.
ट्रॅकसूट,शूज घातले अन् निघालो आज नियमित फिरायला जाणाऱ्या रस्त्याकडे जायची मुळीच इच्छा नव्हती,तिकडे सकाळी फिरायला येणाऱ्या माणसाची फार गर्दी असते,कधीकधी ही गर्दी मला नकोशी वाटते.असेही मला आसपास माणसे नकोसे वाटतात,एकांताचा सानिध्यात मला माझं आयुष्य जगायला आवडते.त्यामुळे शक्य होईल तितकी मी गर्दी टाळतो,शक्य होईल तितके गर्दीकडे घेऊन जाणारे मार्ग टाळतो....
ठरल्याप्रमाणे निघालो, घरापर्यंत आता सिमेंटचे रोड झाले आहे पण त्यांना सोडून मी लालमातीच्या पायवाटांशी लगट करून मी चालू लागलो.लाल मातीच्या रानात मातीवर चहूकडे उगलेल्या हिरव्यागार गवताला बघत चालत होतो,पावसाची चालू असलेली झड आणि जमिनीचं भरलेलं पोट यामुळे बऱ्याच ठिकाणी खडकांतून पाणी मुरुन झऱ्यारूपातून वाहू लागलं आहे....
हिरव्या गवतावर झडीच्या पावसाने दवबिंदू चहूकडे पसरले आहे,त्यातून मी ढगाआड असलेल्या सूर्याच्या किरणांना बघत बघत वाट काढत चालत आहे,बघणाऱ्याच्या नजरेला निसर्गाशी जवळीक करता आली की तो निसर्गातील सामान्य गोष्टीत सौंदर्य,स्वर्ग अनुभवू शकतो मग त्यासाठी फार दूर जायची गरज नाहीये...
Actually माझे बालपण आणि आता तरुणपणसुद्धा या निसर्गाच्या सानिध्यात जात असल्यामुळं मला थोरोच्या नजरेतला निसर्ग असो किंवा त्याचा नदीचा किनारा असो अनुभवायला फार असे अवघड जात नाही....काळया खडकांच्या जमिनीशी लगट करून त्यावर पावलांना सावरत,बाजू असलेल्या हिरव्या मऊसुत वनस्पतीला काही क्षण तळहातांनी अनुभवत हा स्पर्श मनात घेऊन पुढे चालू लागलो....
अश्यावेळी मला माझाच झालेला एक गैरसमज दूर झाल्याचे अनुभवयास येते,की मला यापूर्वी म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वी वाटायचं की आपण पैश्यातून सर्व सुख विकत घेऊ शकतो.पैसा असला की सर्व काही आहे पण जसजसा या निसर्गाच्या सान्निध्यात गुंतत गेलो तेव्हा ही प्रचिती नेहमीच येत गेली की पैसा ही गोष्ट गौण आहे.एक विशिष्ट किमती लोक तो जमवला की किंवा काही अंशी जरी कमवला की आपण सुखी राहू शकतो हे कळून चुकलं आहे,पण ते ही आपण ठरवायचं आहे की आपण आपले सुख कश्यात शोधत आहोत.पैश्यात शोधत असाल तर त्यांना या माझ्या विश्वात माझ्या जगण्यात काही एक रस असणार नाही माझ्या बाबतीतसुद्धा त्यांच्यासाठी माझ्या मनात काही एक जागा नसेल.काही गोष्टींचा त्याग करावा लागतो काही मिळवण्यासाठी त्यामुळं साहजिक आहे,ज्याला जसं हवं तसे तो जगतो...
पाऊलवाटा सोडून केव्हाच मी भटकंती करत झाडा झुडपाच्या सहवासात दिसेल त्या जागेतून वाट काढत चाललो होतो,मध्येच एखाद्या झऱ्याच्या वाहत्या पाण्याला काही अडसर येत असेल असे बारीक बारीक दगडे पायांनी बाजुला करत,छोटी छोटी निळसर फुलं डोळ्यात सामावुन घेत, छोटुली बेंडके तीरतीर करत उड्या मारत होती त्यांना बघत उंच टेकडीच्या माथ्यावर जावून कितीवेळ बसून राहिलो.
दूरवर दिसणाऱ्या छोट्या छोट्या वाटा जिथवर नजर पुरेल तिथवर शहरीकरणाचा 'श' दिसणार नाही फक्त दिसेल तो हिरवा निसर्ग अनुभवत होतो.अश्यावेळी मनात येणारे विचार आणि मला जे काही हवे असते ते सर्व भेटले आहे याची होणारी जाणीव सुखद असते.आयुष्यातील काही क्षण या निसर्गाच्या सान्निध्यात मला जगायला भेटत आहे याचा आनंद वाटतो.
उंच टेकडीच्या माथ्यावरून दिसणारी धुके,आकाशात वाहणारी ढग अन काही ढग आपल्याला भेदून पुढे निघून जाताना, येणारा अनुभव आपण इतक्या उंचीवर आहे की ढगसुद्धा आपल्या सोबतीने या निसर्गात भ्रमंती करतो आहे ही फिलिंग फक्त अनुभवातून खूप छान वाटणारी आहे...
तृनांवर पडलेली धुके,ओस अन् त्यांची तयार झालेली जाळी त्याला हात लावून हलकेच हातावर येणारी दवबिंदू जेव्हा हातावर एकत्र येऊन पाण्यात रूपांतरित होतात तेव्हा ही प्रक्रिया फक्त माझ्यासाठी थांबली होती असे वाटते अन् मनाला हा काही क्षणांचा आनंद भेटतो....
कित्येकवेळ पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज,अधूनमधून पक्षांचा येणारा आवाज,कुठे एखाद्या झऱ्यातील पाणी एखाद्या कृत्रिम रस्त्यातून खाली पडताना येणारा आवाज.कुठे खडकातून येणारं हेच पाणी एखाद्या बिळातून जमिनीत मुरताना येणारा आवाज,सगळ्यात आवडता वाऱ्याचा गोंघावणारा आवाज वेळोवेळी दिश्या बदलून वाहणारे वारे....
भर झडीच्या पावसात शिस्तीत काम चालू असलेली मुंग्यांची रांग,शेणाचे गोळे आपल्या शरीराने लोटणारा सर्वात मेहनती आणि निसर्गात मला सर्वाधिक प्रिय असलेला तो जीव,रुईच्या झाडावर लगडलेल्या फुलांत आपले परागकण मिळवून फिरणारी ती गांधिली,बागडणारी फुलपाखरे,मी ही त्यांच्यातला कुणी आहे ही जाणीव झाली की आपसूक माझ्याजवळ शरीराच्या समीप येऊन बागडणारी ती फुलपाखरे,सागाच्या पानावरून ओघळणारी पावसाची थेंबे.....
आणि शेवट होणारी जाणिव निसर्ग,पाऊस आणि मी जुळून आलेलं समीकरण..!