गंध गेला रानावना...

17 Aug 2024 16:48:01


गंध गेला रानावना...

परवा एका बंगल्याजवळून जाताना प्राजक्ताच्या फुलांचा गंध आला. तिथे प्राजक्ताचं झाड मला दिसलं नाही. बहुतेक, ते झाड बंगल्याच्या मागच्या दाराजवळ असावं.. पण त्या गंधाचा छान दरवळ अगदी दूरवरही येत होता. मुळातच, कुठेही फुले पाहिली म्हणजे मला मनापासून आनंद होतो. फुले आपल्या आयुष्यात नसती तर आपल्या जगण्याला देखील गंधच आला नसता. फुले आणि त्यात प्राजक्ताची फुले म्हणजे माझा अगदी विक पाॅईंट! त्यामुळे त्या झाडापाशी क्षणभर थांबलं नाही तर आपलं माणूस भेटूनही त्याच्याशी काही कारणाने किंवा आपल्या रोजच्या लगबगीमुळे नीटसं बोलणंसुद्धा होत नाही तेव्हा आपल्या मनाला जे वाटेल ते मला या प्राजक्ताविषयी वाटतं. बंगल्याच्या मागच्या दाराजवळची वाट मी शोधली आणि त्या झाडापाशी थोडावेळ थांबलो. प्राजक्ताची झाडावरून पडलेली फुले पाहिली की, निसर्ग देखील सुरेख रांगोळी काढतो हे जाणवतं. निसर्गाने वा-याच्या मदतीने काढलेल्या त्या सुंदर रांगोळीतील काही फुले ओंजळीत घेऊन त्याचा गंध श्वासात भरुन घेतला. प्रवेशद्वाराजवळ कोण घुटमळतंय म्हणून बंगल्याचा मालकाने बाहेर पाऊल टाकायच्या आधीच मी तिथून काढता पाय घेतला. इतकी सुंदर फुले बंगल्याच्या अवतीभवती असूनही काही मालक विक्षिप्त का असतात याचं नवलच वाटतं! अर्थात, ते झाड अधिक काळ टिकावं आणि तुमच्या-माझ्या सारख्या त्या बंगल्याशेजारुन जाणा-या वाटसरुला छान गंध यावा असाही त्यांचा हेतू त्यामागे असतो.. पण पुढे आलो तरी प्राजक्ताचा गंध मात्र येतच होता. तेव्हा का कुणास ठाऊक पण आरती प्रभूंच्या
'फुले माझी अळूमाळू, वारा बघे चुरगळू,
नको नको म्हणताना गंध गेला रानावना..'
या ओळी ओठावर आल्या. ये रे घना या गीताचा नेमका
अर्थ सुनीताबाई देशपांडे यांनी फार छान सांगितला आहे. अधुनिक संपर्क माध्यमांत तो व्हिडिओ 'व्हायरल' होतोय. आणि मनाला झालेलं एक प्रकारचं 'व्हायरस इन्फेक्शन' कमी होतंय. आरती प्रभूंच्या त्या गीतालाही सुनीताबाईंनी सांगितलेला तोच अर्थ अभिप्रेत असावा.. प्रसिद्धी मिळावी असं सा-यांनाच वाटतं. पण त्या प्रसिद्धीच्या ओघात माणसाला आपले पाय जमिनीवर ठेवता येतीलच असं नाही.. अलीकडच्या काळात प्रसिद्धीच्या वाढत्या स्पर्धेत जमिनीवर निसटलेल्या पायाकडे गंभीर दुखापत झाल्याखेरीज लक्ष जात नाही. प्रसिद्धीचं माणसाला प्रलोभन होतं नि त्याच्या मनातलं माणूसपण कणाकणाने कमी होत जातं. ते कमी होता कामा नये असं आरती प्रभूंना मनापासून वाटलं असावं आणि त्यातूनच आपल्याला अशा सार्थ गीताचा आनंद घेता आला. तो घन तुमच्या-माझ्या आयुष्यात देखील आला म्हणजे आपलेही पाय जमिनीवर राहतील.

फुलाचं नि गंधाचं नातं फार छान असतं. घरभर बागडणा-या लहान मुलासारखा तो गंध वा-याच्या हातात हात गुंफून बागडत असतो. पण तो कितीही दूर गेला तरी फुलाशी त्याचं नातं तितकंच घट्ट नि बांधलेलं असतं. आपल्या फुलाशी तो एकनिष्ठ राहतो. एखादा अभिनेता टीव्हीच्या पडद्यावर झळकतो. हळूहळू तो प्रसिद्ध होतो. पण कलेशी असणारं त्याचं एकनिष्ठत्व संपुष्टात आलं की, त्याचं आयुष्य कफल्लक होतं. त्याला आपल्या अभिनय नावाच्या कलेशी एकनिष्ठ राहता येत नाही तेव्हा 'ट्रोल' नावाच्या वादळाला त्याला सामोरे जावे लागते. पण हीच छोटीशी गोष्ट आपल्याला ते एवढंसं प्राजक्ताचं फूल नि त्या फुलाच्या स्वर्गीय गंधातून ते आपल्याला शिकवतं. तांबडं देठ नि पांढ-या पाकळ्यांवरचं किंचित तांबडं शिंपण मनाला मोहिनी घालतं. कृत्रिमतेच्या अंधारानी वेढलेल्या जगात काजव्याप्रमाणे ते फूल चमकतं. एखादा कलाकार आपली कला सादर करतो. प्रेक्षकांच्या हातात हात गुंफून आपल्या कलेशी एकनिष्ठ राहणा-या कलाकारच 'खरा कलाकार' म्हणता येईल. अशा कलाकाराच्या कलेचा गंध रानावनात गेला तर त्या गंधाला सुगंध म्हणता येईल.

हल्ली ब-याचशा इमारतीत किंवा मोठाल्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ 'वाॅचमन' असतो. कुणी बडी आसामी दिसली की, तो तिला सलाम करतो. पण ती व्यक्ती त्या वाॅचमनकडे न बघताच निघून जाते तेव्हा त्या माणसाच्या वाटेवर चांगुलपणाच्या फुलांऐवजी अहंकाराचे काटेच अधिक आहेत, असं आपल्याला जाणवतं. अगदी आपल्या स्वतःच्या जगण्याशी देखील आपण एकनिष्ठ असतोच असे नाही. प्रसिद्धी आपल्याला रोजच साद घालत असते. तिला आपण रोजच प्रतिसाद दिला तर आपल्या जगण्यानी आपल्याला घातलेली खरीखुरी साद आपल्याला ऐकूच येणार नाही. प्रसिद्धीला प्रतिसाद निश्चितच द्यायला हवा.. पण जगण्याची सादही आपल्याला ऐकता आली म्हणजे आयुष्य नि जगणं यांच्यात फूल आणि गंधासारखं सुंदर नातं निर्माण होईल. आभाळाला गवसणी घालताना पावलं अहंकाराच्या नव्हे तर जाणिवेच्या जमिनीवर घट्ट पाय रोवून उभी राहतील.. म्हणूनच आरती प्रभूंचं हे गीत म्हणजे सरस्वतीच्या चरणी मागितलेलं पसायदानच आहे. आरती प्रभू म्हणतात,
"ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना..."

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0