स्पर्शाचे जपलेपण...

10 Aug 2024 17:09:30


स्पर्शाचे जपलेपण...

'जे शब्दांतून व्यक्त करता येत नाही, ते स्पर्शातून व्यक्त करता येतं, असं म्हणतात. ते खरंच आहे. नऊ महिने आईच्या पोटात राहणारं मूल स्पर्श नावाची भाषाच बोलत असतं. आपल्या आईला काही सांगवंसं वाटलं म्हणजे ते मूल लाडिकपणे लाथ मारतं. तेव्हा ते मूल पोटात छान खेळतंय किंवा त्याची अपेक्षित वाढ सुरु आहे हे स्पर्शाच्या भाषेतूनच आईला कळतं. पुढे ते मूल जन्माला आलं म्हणजे त्या मुलाने लाथ मारल्यानंरच्या आईने जपलेल्या स्पर्शाला नवी भाषा मिळते. ते मूल देखील प्रथम आपल्या आईचाच स्पर्श ओळखायला शिकतं. म्हणजेच भोवतालच्या सा-या माणसांची ओळख त्या मुलाला स्पर्शानेच होत असते. कुणी अनोळखी व्यक्तीने त्या मुलाला कडेवर घेतलं की, ते मूल रडू लागतं. तेव्हा त्या मुलाच्या आई-बाबांपैकी कुणी त्याला घेतलं म्हणजे त्यांच्या हाताचा स्पर्श त्याला थोडासा ओळखीचा जाणवतो नि ते मूल पुन्हा हसायला लागतं. आपल्या छोट्याशा मुठीत आजीचं बोट धरुन ते मूल छानपैकी झोपतं.

एखाद्या कुत्र्याच्या किंवा मांजराच्या पाठीवरुन तुम्ही हात फिरवलात तरी ते मांजर शेपूट फुगवतं नि लाडिकपणे म्याव म्याव करीत आपण केलेला मायेचा स्पर्श ओळखतं. गायीचे दूध काढणारा माणूस बदलला तरी त्या वेगळ्या स्पर्शाने गाय थोडीशी गोंधळते, शेपटीचा फटकारा मारते. लाजाळूसारखं झाड तुम्ही स्पर्श केलात म्हणजे नवपरिणीतेसारखं सुरेख लाजतं. बागेतली फुलझाडे तुमचा स्पर्श ओळखत असतात. इतकंच काय तर, घराची भिंत निर्जीव असली तरी पुन्हा पुन्हा त्या भिंतींना तुमचा स्पर्श होत राहिला की, त्या भिंतींशी तुमचं नातं जुळू लागतं. स्पर्शाची आपली अशी एक भाषा असते. प्रियकराने प्रेयसीचा नुसता हात हातात घेतला तरी त्या प्रियकराप्रमाणेच प्रेयसी देखील सुखावते. त्या अवघ्या स्पर्शात ते दोन जीव प्रेमाची असंख्य फुले उधळीत असतात. अंध आणि मतिमंद माणसांना तर स्पर्श म्हणजे जगण्यासाठीचं वरदान आहे. यातूनच ब्रेल लिपीसारख्या लिपीचा उदय झाला असावा. गुरुजी वर्गात मुलांना शिकवतात. एखाद्या मुलाला गणित जमलं नाही तर त्याला गुरुजी हळूच फटका मारतात. त्या स्पर्शामागे ते मूल घडावं अशी प्रेमळ इच्छा असते. प्रत्येक स्पर्शामागे विशिष्ट भावना असते.

माणूस वर्तमानात जगत असतो नि त्या जगताना भविष्याची स्वप्ने रंगवीत असतो. पण त्याचं मन भूतकाळातही तितकंच रमतं. कितीतरी गोष्टी माणूस जपून ठेवतो. कुणी दिलेल्या भेटवस्तू, भेटकार्डे, पत्रे, पुस्तके अशा अनेक गोष्टी असतात. पण याबरोबरच स्पर्श नावाची गोष्ट देखील माणूस जपत असतो. लोण्याच्या गोळ्याला स्पर्श केला की, आईचा स्पर्श आपल्याला आठवतो. गोधडीच्या एकेका विणेवर आजीचा स्पर्श जाणवतो. गुलाबाचं फूल हातात घेतलं म्हणजे प्रियकराला आपल्या प्रेयसीने केलेला पहिला स्पर्श आठवतो. हे स्पर्श आपल्या नकळतच आपण जपून ठेवतो. मनाच्या कप्प्यात कित्येक स्पर्श जपलेले असतात. त्या स्पर्शाच्या प्रतीकाला स्पर्श झाला की, स्पर्शाचा तो मनातला कप्पा आपोआपच उघडला जातो नि पावसाच्या स्पर्शाने नदी जशी भरुन वाहू लागते तसा गात्रागात्रांतून तो स्पर्श वाहू लागतो. स्पर्श दिसत असला तरी त्याची जाणीव अदृश्य असते. अदृश्य जाणीवेमुळेच स्पर्शाला अर्थ असतो आणि म्हणूनच त्याची ओढही कायम असते. एखादी व्यक्ती मोठ्या पदावर काम करते. असंख्य कागद आणि नोंदवह्या त्या व्यक्तीच्या समोर सहीसाठी येतात. पण तरीही बालवाडीत पुस्तकाला आणि वहीला झालेला स्पर्श त्याला कधीच विसरावासा वाटत नाही. आपल्या जवळची माणसे अचानक आपल्याला सोडून जातात. त्यांची आठवण म्हणून काही वस्तू आपण जपून ठेवलेल्या असतात. त्या वस्तूला कितीदातरी त्या व्यक्तीचा स्पर्श झालेला असतो. अशा वस्तूला आपण स्पर्श केला तरी त्या व्यक्तीलाच आपण स्पर्श करीत आहोत, असे आपल्याला वाटते.

स्पर्श केवळ शरीराने नव्हे तर बरेचदा तो मनापासून किंवा नकळत झालेला असतो. म्हणूनच त्या स्पर्शाशी केवळ शरीराचे नव्हे तर मनाचेही नाते जुळलेले असते. या बंधामुळेच माणसाला स्पर्श जपावासा वाटतो. व्यभिचाराने झालेल्या स्पर्शाला मुळात स्पर्श म्हणताच येणार नाही. दोन व्यक्तींची मने जुळली म्हणजे स्पर्शाचं फूल छान मनमोकळेपणे उमलतं. तो उमललेला स्पर्श ह्रदयात जपण्याची परवानगी त्या नात्यात एकमेकांना एकमेकांनीच बहाल केलेली असते. एकटेपण जाणवलं म्हणजे मायेच्या माणसाचा स्पर्श आपल्याला आठवतो नि अंगावर शहारा येतो. हा शहारा नसून खरंतर तो स्पर्शाचा बहावाच असतो. या बहाव्याचा सुंदर देखावा म्हणजेच असंख्य स्पर्शांचे जपलेपण...

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0