सामाजिक डिप्रेशन..

06 Jul 2024 14:00:11


सामाजिक डिप्रेशन..

गेल्या आठवड्यात एका मानसोपचार तज्ज्ञ मित्राच्या दवाखान्यात जाणे झाले. त्या मित्राचा आणि माझा एक दुसरा मित्र काही कारणाने डिप्रेशन मधे गेला होता. त्याच्याबरोबर म्हणून मी त्या दवाखान्यात गेलो होतो. तिथे आणखीही काही जण केवळ डिप्रेशनच्या कारणामुळे नंबर लावून बसले होते. इतके नंबर पाहून डिप्रेशन देखील आता संसर्गजन्य विकार आहे असं तेव्हा वाटून गेलं. पण खरोखरच डिप्रेशन हा एक संसर्गजन्य विकार असल्याचं थोडा विचार केल्यावर जाणवलं. अलीकडच्या काळात वाढती स्पर्धा हे त्याचं वरवरचं कारण वाटत असलं तरी समाज किंवा भोवतालचं एकंदरीतच माणसाचं जग हे त्याचं कारण आहे. काळ बदलतो तशी स्पर्धा वाढणारच आहे. स्पर्धा वाढणं किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान कालानुरूप पुढे जाणं हे स्वाभाविक आहे. पण ज्यांनी ख-या अर्थाने पुढे जाणे अपेक्षित आहे ते तुम्ही-आम्ही विचाराने पुढे जात आहोत का, याचा विचार स्वतंत्रपणे आणि सामाजिकदृष्ट्या देखील करणे गरजेचे असते.

शिक्षण, नोकरी, विवाह, संतती या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. पण अलीकडच्या काळात या सा-याची चिंता स्वतःपेक्षा समाजालाच अधिक असल्याचे जाणवते. कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे, हा आमच्यासारख्या युवा पिढीला नित्याचाच प्रश्न आहे. भोवतालच्या लोकांकडून इतके पर्याय सुचवले जातात की, त्यापैकी कोणता निवडावा हे कळेपर्यंत सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची तारीख संपलेली असते. केवळ वर्ष वाया गेल्याचे दु:ख उरते. याउलट एखादा पर्याय कुणाचे ऐकून निवडला तर त्यात अपयश येऊन डिप्रेशनची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी तंत्रज्ञान, पुस्तके, समुपदेशन यांचा आधार घेऊन योग्य निर्णयाप्रत पोचणे गरजेचे असते. विवाहासाठी अपेक्षित स्थळे न मिळणे ही मुले व मुली दोघांचीही समस्या आहे. आपले प्रयत्न सुरु असतात. नकार पचविणे हळूहळू कठीण होते. परंतु, समाज मात्र 'लग्न केव्हा करणार?' , "वय वाढले की लग्न होत नाही!" इत्यादी उपदेश करीत असतो. हा सारा गुंता पंचवीस नि तीस या वयात सोडवता सोडवता काहीवेळा नैराश्य येते. वरवर पाहता या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरी याच काही गोष्टींचा अलीकडच्या काळात नैराश्याशी संबंध असतो. समाजाच्या या सततच्या सूचनांमुळे माणूस आपली इतरांशी तुलना करीत राहतो. या तुलनेच्या भरात हाती असलेलं सारं समाधान हळूहळू गमावतो. अर्थात, प्रत्येकच वेळी समाजाचा हेतू वाईट असतो, असे म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या हिताची तळमळ देखील समाजात असतेच. परंतु, मार्गदर्शकांपेक्षा समाजात उपदेशकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे, सल्ला आणि मार्गदर्शन यात समाजाला संतुलन साधता येत नाही. हे संतुलन ढासळल्यामुळे डिप्रेशन सारखी गोष्ट तापाचा संसर्ग व्हावा तशी पसरते. त्यामुळे, समाजाने म्हणजे अर्थातच तुम्ही, मी आणि सर्वांनीच एकमेकांच्या हिताची तळमळ सदैव जागृत ठेवली म्हणजे डिप्रेशनचा हा संसर्ग हळूहळू कमी होऊन सा-यांनाच योग्य मार्ग सापडेल.

आपले पूर्वज धोतर, सदरा, कोट, टोपी असा पोषाख करत असत. स्त्रिया साड्या नेसत. पण कालानुरूप ह्या वस्त्र परिधान करण्याच्या पद्धतीत बदल झाला. शर्ट पँट, पंजाबी ड्रेस, सलवार कुर्ता, जीन्स टीशर्ट पासून थ्री फोर्थ पर्यंत नाना त-हेचे अधुनिक कपडे आपण परिधान करतो. मोबाईल सारखे अधुनिक साधन म्हणजे अगदी आपली मूलभूत गरजच आहे. या सा-याप्रमाणेच विचारात देखील अधुनिकता येणे अपेक्षित आहे. वाढत्या स्पर्धेत टिकून राहताना सा-यांचीच दमछाक होते. एखाद्याला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेता येत नाही, एखाद्यावर कौटुंबिक जबाबदारी अधिक असल्यामुळे विवाह निश्चित होण्यास विलंब होतो, शारिरीक असंतुलनामुळे लग्नानंतर मूल होण्यास उशीर होतो अशी नाना त-हेची उदाहरणे आपण आपल्या भोवताली रोज पाहतो. पण ही उदाहरणे आणि परिस्थिती पाहत असूनही परिचयातील माणसांना आपण सतत प्रश्न विचारुन नैराश्याच्या दरीत लोटतो आहोत. याऐवजी समाज म्हणून आपण एकमेकांना सावरले पाहिजे. केवळ कपडे आणि राहणीमानातच नव्हे तर विचारातही कालानुरूप अधुनिकता आली म्हणजे व्यक्तीला समाजाचा त्रास न होता आधारच वाटेल.

जन्माला आल्याक्षणी आयुष्यात नियती नावाचा कंडक्टर आपल्या हातात सा-या प्रवासाचं अदृश्य तिकीट देत असतो. या प्रवासात एकेक गाव नि वळणावळणाने हळूहळू त्या तिकीटावरचं एकेक अक्षर स्पष्ट होत जातं. म्हणजेच आपलं ठिकाण आपल्याला नीटसं ठाऊक नसतं. तिथे दुस-याच्या प्रवासाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न किती केविलवाणा आहे, हे आपल्या लक्षात येईल! वपुंच्या एका पुस्तकात कुठल्याशा कथेत एक वाक्य आहे, "कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करु नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं; उपदेशक होऊ नये " हे वाक्य अगदी तंतोतंत आमलात आणले नाही तरी त्याचा मतितार्थ लक्षात घेऊन आपल्या वर्तनात बदल निश्चितच करता येईल..

-
गौरव भिडे
Powered By Sangraha 9.0