उत्तर प्रदेशातील घरांमध्ये रोज काय जेवण बनवले जाते याबद्दल आपण जाणून घेतोय. नेहमीच्याच भाज्या पण दुसऱ्या राज्यातील पद्धतींनी बनवून पहिल्या तर रोजचे जेवणही चविष्ट लागते. कधीतरी दाण्याच्या कुटाऐवजी ओले खोबरे भाजीत घातले तर पोरियल बनते आणि वेगळे फॅट्ससुद्धा खायला मिळतात. उत्तर प्रदेशात काशीफळ किंवा लाल भोपळ्याची भाजी चिंच घालून बनवली जाते. शेवग्याच्या शेंगांच्या भाजीत मोहरीचा कुट टाकून वेगळी ग्रेव्ही बनवतात. बटाट्याच्या भाजीत तेजपान टाकले कि वेगळीच चव येते. अशाच काही सोप्या पण युपीचा ट्विस्ट असलेल्या पाककृती आजही जाणून घेऊ.
सत्तू का पराठा - पराठा कल्चर हे केवळ पंजाब्यांचे नाही तर पूर्ण भारतात हा पदार्थ आवडीने खातात. सत्तू का पराठा मी पहिल्यांदा एक रेस्टारंटमध्ये खाल्ला होता, वेगळा वाटला म्हणून. सत्तू म्हणजे सातूचे पीठ असे मी समजत होते पण नंतर समजले कि सत्तू म्हणजे डाळ्या/डाळवं यांचे पीठ. हिरव्या चटणीत ज्या डाळ्या वापरतो त्या डाळ्यांचे पीठ करून त्यात मीठ, मिरची, कोथिंबीर आणि जिरे टाकून सारण बनवले जाते. या सारणाचा पराठा म्हणजे सत्तू पराठा. सत्तूमध्ये प्रोटीन असते आणि त्यामुळे हा पराठा पौष्टिक आहे.
मीठा चिला आणि लाल रबडी - गोड धिरडे आणि लाल रबडी! पॅनकेक असतो तसंच हे धिरडे किंवा चिला. कणिक आणि थोडासा रवा, साखर/गूळ, बडीशेप दुधात मिसळून त्याचे बॅटर बनवले जाते. या पिठाचे नेहमीप्रमाणे धिरडे/डोसे/चिले बनवले जातात. आता पॅनकेकवर जसे सिरप असते तसे यावर लाल रबडी ओतून खातात. लाल रबडी बनवण्यासाठी लाल पेढा दुधात कुस्करून पटकन लाल रबडी बनवली जाते. मला तरी हे कॉम्बिनेशन फारसे आवडेल असे वाटत नाही पण तुम्हाला आवडू शकते. लाल पेढा नसेल तर कुंदा किंवा धारवाड पेढा वापरूनही ही रबडी बनवता येईल.
पनीर सफेदा/ चांदणी सब्जी/चांदनी पनीर - किती छान नाव आहे चांदनी पनीर. आजपर्यंत कोणत्याही मेनूमध्ये हे नाव मी वाचले नाही. वाचले असते तर पटकन तेच ऑर्डर केले असते. उत्तर प्रदेशमध्ये पनीर सफेदा नावाने हा पदार्थ जास्त ओळखला जात असला तरी मला मात्र चांदनी पनीर हे नावच खूप आवडले आहे. किंबहुना सगळ्या पांढऱ्या ग्रेवींसाठी चांदनी नाव असायला काही हरकत नसावी, नाही का? व्हाईट सॉस पास्ता साठी चांदनी पास्ता किंवा पांढऱ्या रस्स्यासाठी चांदनी रस्सा नाव कसं वाटतंय? खूप दूर गेला विचार! या ग्रेव्हीत काजू भिजवून सोबत मसाले वाटले जातात. ग्रेव्हीत क्रीमही असते. ग्रेव्ही नीट परतली कि त्यात पांढरेशुभ्र पनीरचे तुकडे टाकले कि चांदनी पनीर तयार! अशा ग्रेव्हीत चव सांभाळणे खूप महत्त्वाचे असते, कारण थोडेही मसाले कमीजास्त झाले तर चव प्रचंड बिघडू शकते. पण तरीही ही शाही पनीरच्या आसपासची रेसिपी नवीन नावाने खाऊ घालण्यात मजा येऊ शकते.
टमाटर चाप - टमाटर चाटनंतर हा अजून एक नवीन पदार्थ. टमाटे पाण्यात वाफवून, त्याची साले काढून आतला गर काढला जातो. उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर- मिरची पेस्ट, आलं आणि चाट मसाला यांचे सारण टोमॅटोमध्ये भरले जाते. हे टोमॅटो बेसनाच्या पिठात बुडवून बटाटा वड्यासारखे तळले जातात. हा वडा कापल्यावर टमाटा आणि सारणाच्या छान लेयर्स दिसतात. हा पदार्थही पार्टीसाठी छान आहे. अगदी मास्टरशेफ स्टाईलची रेसिपी!
इतके साधे सोपे पदार्थ आहेत या लोकांचे. आपणही घरी बनवू शकतो अर्थात काही कठीण पाककृतीही आहेत पण त्या आपण पुढील भागांमध्ये वाचू या.