तुमची आमची इकिगाई

21 Jul 2024 10:00:00


तुमची आमची इकिगाई

 

उन्हेरी दिवस अलवार संध्येकडे झुकत होता. पन्नाशीची अंजली खिडकीतील रोपांना पाणी घालत होती. कुमारला यायला अजून खूप वेळ होता, रात्रीचा स्वयंपाकही बराचसा तयारच होता. पाणी घालून झाल्यावर अंजली मोबाइल स्क्रोल करत बसली आणि नेहमीप्रमाणे त्यानेही कंटाळली. शेवटी ती न राहवून आई-बाबांच्या, म्हणजे सासू सासर्यांच्या खोलीत गेली. बाबा निवांत वाचत बसले होते, आणि आई मात्र मोबाइलवर कसलासा वीडियो बघण्यात गुंगल्या होत्या. अंजली बेडवर बसली.

"काय गं, काय झालं?" बाबांनी अंदाज घेत विचारलं.

"काही नाही ओ आई बाबा.. उदास वाटतं या वेळेला. रोजच. म्हणजे खरंतर दिवसभर असं रिकामपण वाटतं. काय करावं कळत नाही." अंजली शांत पण उदास स्वरांत म्हणाली.

"अगं, लेक आत्ताच विदेशी गेलाय ना, म्हणून वाटत असेल बघ. फोन कर त्याला जरा, बरं वाटेल" मोबाइल बंद करत आई म्हणाल्या.

"अहो रोज होतोच फोन दोन वेळा. पण तरी असं वाटतंच राहतं." अंजली उत्तरली.

आजोबा पुस्तकात खुण ठेवत म्हणाले -

"मला कळला तुझा प्रॉब्लेम. लग्गेच सोल्युशन सांगतो बघ. तू तुझी इकिगाई शोध. मग बघ छान राहशील आधीसारखी."

"इकिगाई? म्हणजे?" अंजलीने न कळून कुतूहलने विचारलं.

"जॅपनीज शब्दय का हा? म्हणजे अर्पित जॅपनीज शिकायचा तेव्हा असलेच काहीसे उच्चार करायचा." जपानला गेलेल्या अर्पितच्या आठवणीत अंजली क्षणभर बुडाली.

"हो हो. अगदी बरोबर. जपानीच शब्द आहे हा. बघ, इकिगाई म्हणजे ढोबळपणे सांगायचं तर आपल्या जगण्याचा अर्थ किंवा जगण्याचं कारण. ते शोध, मग बघ जगण्याला एक दिशा मिळेल. म्हणजे ती असतेच, फक्त स्पष्ट झाली की अजून छान आणि काय, तुमच्या भाषेत मिनिंगफुल जगता येतं."

आजोबांनी सुचवलं.

"पण आयुष्याचं कारण म्हणजे? आणि असं एकच थोडीच कारण असतं?" अंजलीने विचारलं.

"बरोबरे तुझं. आयुष्याचं एकच एक कारण नसतंच कधी. पण असं कारण जे आपल्याला खूप आवडतं, आपल्या आयुष्याला अर्थ देतं ते म्हणजे इकिगाई. ज्यामुळे जगण्यात रस निर्माण होतो, मनापासून जगावंसं वाटतं ते कारण म्हणजे इकिगाई. मग त्याच्यासाठी आपण मनापासून जगतो, रमतो ती इकिगाई." आजोबांचं हे समजावणं अंजलीला पटत होतं.

"पण बाबा, छाने ही इकिगाई. पण माझ्या प्रॉब्लेमशी रिलेटेड कसंय हे?" अंजलीचा प्रश्न आणि बाबांची उत्तरं आई शांतपणे ऐकत होत्या.

"अगं बघ, इतकी वर्ष म्हणजे अर्पितच्या जन्मापासून त्याच्या पुढे मागे करणं, त्याचं खाणं पिणं, अभ्यास, क्लास, सगळं काही बघण्यात तू पूर्ण गुंतून जायचीस. आता त्यालाही जपानला जाऊन महिना झाला. त्यात सध्या कुमार घरी उशीरा येतो. आणि कितीही नाही म्हटलं, तरी आम्हा म्हातारा-म्हातारीशी किती बोलणार तू? म्हणून तुला हे रिकामपण वाटतंय, कळलं?"

बाबांचं हे उत्तर अंजलीला पूर्णपणे पटलं. न कळलेला प्रश्न कळला म्हणून तिच्या चेहर्यावर छानसं स्मित खुलून आलं. उत्तराची वाट बाबांनी दाखवली होतीच, आता फक्त त्यावर निष्ठेने चालायचं होतं.

"खरंच की! असंच असेल मला वाटतं. पण बाबा, कशी शोधायची इकिगाई? एक काम करा ना, तुम्हिच सांगा मला माझी इकिगाई." अंजली उद्गारली.

हसत हसत बाबा म्हणाले -

"छे गं राणी. ती काय सुपारी आहे? अशी मी हातावर ठेवायला? किंवा ही साडी घे असं सुचवायला? हे आपलं आपण ठरवायचं असतं. आपल्या जीवनाचं ध्येय आपणच ठरवायला हवं ना? दुसर्याने दिलेला अर्थ तसाच स्विकारला, तर ते आपलं जीवन कसं होईल?"

खूप वेळ शांत बसलेल्या आई आता बोलल्या

"खरंय बघ. आपणच शोधायचं ते. काय सांगू तुला, काही वर्षांपूर्वी यांनी मला पण ती इकिगाई शोधायला लावली होती. मागेच लागले होते माझ्या, कितीही वेळ घे म्हटले पण आधी इकिगाई शोध." आईंच्या डोळ्यांत आठवणी चमकत होत्या.

"किती भारी आहे हे! पण बाबा, काय काय असू शकते इकिगाई?"

"काहीही! म्हणजे अक्षरशः काहीही बघ. कुणासाठी नृत्य, काहीतरी शिकवणं, शिकणं, लेखन, वाचन, संशोधन, समाज प्रबोधन, वडिलधार्यांची शुश्रूषा करणं, फिरणं, मदत करणं, स्वयंपाक करणं, घर सजवणं, लोकांना खिलवणं, काहीही असू शकते इकिगाई. अगदी लहानातलं लहान कामही. म्हणजे जे करताना आपण फ्लो स्टेट अनुभवतो, स्वतःला विसरुन जातो आणि जे आपल्याला आनंद देतं आणि अर्थात जे आपल्यासाठी आणि इतरांसाठी हिताचं असतं असं काहीही. एका पुस्तकात तर लिहिलंय की एका एकट्या रहणार्या जपानी बाईची इकिगाई होती वृद्ध शेजार्यांची काळजी घेणं. एकांची होती बागकाम करणं."

"बागकाम ठीके. पण शेजारच्यांचं ते विचित्रच आहे हां. आपल्या शेजारच्यांची काळजी घ्यायला गेलो, तर त्यांचं ऐकून ऐकून कुणाला तरी आपलीच काळजी घ्यावी लागेल!!" आईंच्या या बोलण्यावर एकच हशा पिकला.

"आणखी सांगायचं तर बघ, अनाथ मुलांसाठी काम करणं ही सिंधूताई सपकाळांची इकिगाई, किंवा स्वराज्य ही शिवाजी महाराजांची इकिगाईच म्हणता येईल की!"

आता अंजलीला एकदम क्लियर झालं.

"तुमची इकिगाई काये बाबा? मला खूप क्युरियोसिटी आहे." अंजलीने उत्सुकतेने विचारलं.

"हा.. हा.. माझी इकिगाई बघ, मी रिटायर झाक्यावर पक्की ठरवली. ती म्हणजे वाचन! मला वाचनात प्रचंड रस आहे. काय समृद्ध होतो आपण वाचून! मी मिळेल ते वाचत जातो. ठरवून असं नाही, पण भरपूर वाचतो. उठल्यावरही काल काय वाचायचं राहिलंय हाच विचार येतो मनात आणि झोपताना उद्या काय वाचायचंय याचा. बघ माझी ही इकिगाई जगण्याची प्रेरणा तर बनतेच, पण ध्येयही! आणि हो, व्हिक्टर फ्रँकल यांचं छान संशोधने बरंका, की आयुष्याला अर्थ नसेल, ध्येय नसेल तर अशी एंझायटी निर्माण होते मनात." बाबांनी सांगितलं.

"किती छान बाबा. तुम्ही वाचता हे मी रोज पहातेच पण ती तुमची इकिगाई आहे हे आजंच कळलं मला! किती छान गोष्टी माहितीयेत तुम्हाला. ग्रेट वाटतं असं पाहून" अंजली म्हणाली.

"हे सगळं वाचनातूनच आलेलंय बघ. आता एक काम कर, वेळ घे, विचार कर, आणि ठरवून टाक तुझी इकिगाई!"

अंजलीला आता एकदम फ्रेश वाटत होतं! मनातलं मळभ दूर सारलं गेलं. संध्याकाळ रात्रीच्या कुशीत अलगद शिरली होती. मंद वार्याच्या झुळुकीमधे अंजलीचे ओठ मनापासून खुलून आले होते. क्षितिजाची सुगंधी धून तिला आतून खुणावत होती.

~ पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0