खुशाल ठेवा नावे !

20 Jul 2024 15:04:24


खुशाल ठेवा नावे !

हल्ली निमंत्रण पत्रिका मोठ्या आकर्षक असतात. लग्न आणि मुंजीच्या पत्रिकांचे निरनिराळे प्रकार आपण पाहत असलो तरी प्रत्येकच पत्रिकेत काही ना काही वेगळेपण जाणवते. पत्रिकेवर छायाचित्रेसुद्धा छापली जातात. पण हल्ली मोबाईलवर एकमेकांना पत्रिका सहज पाठवता येते. त्यामुळे वाढदिवस, बारसे किंवा अगदी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाची सुद्धा निमंत्रण पत्रिका असते. अशीच एका बारशाची आमच्या एका स्नेह्यांनी मला निमंत्रण पत्रिका पाठविली. त्यांच्या घरी बारसे होते. पण त्यांची मुले तर परदेशात असतात आणि ती इतक्यात कधी भारतात आल्याचे काही कानावर आले नव्हते. मग बारसे कुणाचे असावे, हे बघण्याची उत्सुकता आणखी वाढली. पत्रिकेचे पुढचे पान उलटले तेव्हा मात्र त्या स्नेह्यांवर हसावे का रडावे हा प्रश्न मला जसा पडला तसा तो माझ्यासारख्या कुणालाही पडला असता. ते बारसे चक्क एका कुत्र्याचे होते! त्या कुत्र्याला लोक 'कुत्रा' असे संबोधतात याचे त्यांना मोठे वाईट वाटत होते. पत्रिकेत त्यांनी ओळ अशी छापली होती, 'आमच्या कुत्र्याला आता कुत्रा म्हणायचे नाही हं... त्याचे नाव आहे.. काय असेल बरं त्याचे नाव? अहो, तेच तर आता ठेवायचंय ना! मग येणार ना तुम्ही बारश्याला? अगदी सहकुटुंब यायचं हं.. ' त्यांच्या या विनंतीला मान देत मी त्या बारशाला गेलो. कुत्र्याच्या बारशाला जाण्याचा हा पहिलाच 'प्रसंग' असल्याने भेटवस्तू काय घ्यावी हा प्रश्न पडला. सर्वसाधारणपणे कुत्रं कुठे दिसलं म्हणजे आपण त्याला बिस्किटे किंवा पोळी घालतो. कशीबशी सुचेल ती भेटवस्तू घेऊन आणि त्या कुत्र्याच्या मालकांना शुभेच्छा देऊन परतलो. ती कुत्री असल्यामुळे तिचे नाव लुसी असे ठेवले होते. बारशाला गेल्यापासून या कुत्र्याच्या किंवा एकूणच पाळीव प्राण्याच्या नावाविषयी मनात एक कुतूहल निर्माण झाले.

पूर्वी असे थाटामाटात बारसे केले नसले तरी जी सुचतील ती नावे पाळीव प्राण्यांना दिली जात असत. ग्रामीण भागातील कुत्र्याची नावे खंड्या, बंड्या तर, गाईचे नाव कपिला असेच असे. शहरातील कुत्र्याचे 'टाॅमी' असे नाव ठरलेले होते. मांजरीला मनी, माऊ वगैरे काहीही हाक मारली तरी म्याव म्याव करुन '' देत ताटलीतली दूधपोळी चाटूनपुसून संपवीत असे. या मांजरीच्या विश्वातील नर म्हणजे बोका... पण हा बोका दुधाची पातेली सांडणारा आणि स्वयंपाकघरात भांडी पाडून ठेवणारा मस्तीखोर प्राणी असल्याने त्याचे बारसे करण्याऐवजी त्याला नावे ठेवीत चांगले बदडून काढले जाई. पण अलीकडच्या काळात मात्र एकूणच भूतदया अधिक उत्पन्न झाल्याने मांजर किंवा कुत्रा वगैरे प्राण्यातही स्त्री-पुरुष समानता जाणवते. मांजरीची काळजी घेणारे कुटुंब एखाद्या बोक्याविषयी देखील आपुलकी बाळगतात. त्यामुळे, बोक्याला आपले हक्काचे नाव आता मिळू लागल्याचे दिसते. ज्याप्रमाणे प्रभावती, वामन, वसुमती वगैरे नावे 'आऊटडेटेड ' झाली आहेत अगदी त्याचप्रमाणे टाॅमी, मनी, खंड्या वगैरे नावे आता जुनी वाटतात. हल्ली लुसी, सिंबा, मिली, लिओ, मॅक्स वगैरे पाश्चिमात्य नावे या प्राण्यांना बहाल केली जातात.


पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा ह्या प्राण्याला नावाने हाक मारलेले विशेष आवडत असावे. त्याचे बारसे केल्यावर तर सुरुवातीचे दोन-तीन महिने त्याला नाव इतके आवडते की, वेगाने त्याच्या शेपटीची हलचाल होते. पुढे पुढे त्याला नावाची सवय होते. पण तरीदेखील एखाद्या वेळी बोबड्या स्वरात त्याचे नाव तुम्ही उच्चारलेत तर ते त्याला भारी आवडते. त्यामुळे, कुत्र्याचा नावाशी संबंध अधिक असतो. गायीलाही कधी कधी आपल्याला नावाने हाक मारलेले आवडते. पण मांजर हा जन्मसिद्ध 'मूडी' प्राणी आहे. त्याला नावाशी फारसे काही देणे-घेणे नसावे. कारण, तुम्ही त्याला कितीदा जरी नावाने हाक मारली तरी त्याला मनापासून वाटले तरच ते तुमच्याजवळ येईल. मांजराचा स्वतःच्या नावापेक्षा पदार्थांच्याच नावाशी अधिक संबंध असतो. या प्राण्यांना इंग्रजी नावापेक्षा मराठी नावेच अधिक आवडत असावीत. खंड्या अशी हाक मारली की, कुत्रं कसं छान ऐटीत कान वगैरे टवकारुन आपल्या आवाजाच्या दिशेने एका ठराविक वेगाने येतं. तेव्हा त्याच्या चालण्यात वेगळीच ऐट असते. लूसी असं नाव पुकारताच खंड्यापेक्षा अधिक वेगाने कुत्रं धावत येऊन आपल्याला '' देतं. पण त्या चालण्यात ऐट काहीशी कमीच असते. हे प्राणी मुके असल्यामुळे त्यांच्या हावभावावरुनच आपण दिलेलं नाव त्यांना आवडतंय का नाही, हे आपल्याला ओळखावं लागतं.


हल्ली लोक ससा, कासव वगैरे प्राणीही घरी पाळतात. त्यांच्या नावांची परंपरा नसली तरी लवकरच ती येण्याचा संभव दिसतो. अलीकडेच एक दुधाने मिशी पांढरी करुन आलेला बोका रोज समोरच्या गच्चीत असतो. त्याच्याशी थोडीशी नावाविषयी चर्चा केली. तेव्हा त्याचे हावभाव मला सुचवत होते, " तुम्ही आमची नावे ठेवा अगर ठेवू नका. पण दूधाची पातेली सांडून आम्ही कायमच नामानिरळे राहणार बुवा! मग तुम्ही खुशाल ठेवा नावे! "


- गौरव भिडे
Powered By Sangraha 9.0