उन्हं काहीलीची..!

10 Jul 2024 15:02:54

पितृपक्ष संपला पण पितृपक्षातील उन्हं अजूनही पहाटेच्या पहारे शरिराची काहीली काहीली करून जात आहे.अश्या या भरउन्हात पहाटे दहाच्या सुमाराला गावच्या जुन्या येशीतुज जाणं होतं,येशीत मधोमध असलेल्या मुंज्याला शिवनामायचे पाणी तांब्यात आणून त्याला न्हांनुंन घेतलं,कपूरची एक वडी तिथं जाळली की त्याचा येणारा सुगंध अनुभवत,यशीत डोकं टेकवून उतरतीच्या दिशेनं पावलं चालू लागली..!

गावातले गुरखे रानाला,डोंगराला,धरण पाळेला असलेल्या हिरव्या कुरणाच्या रानात गाय,म्हशी,बकऱ्या चरायला घेऊन निघाले.डोईवर बांधलेलं उपरणे,कंबराला बांधलेली छोटी कुऱ्हाड,तारेच्या पिशीत भाकरीचं पेंडकं अन खांद्यात अडकवलेला रेडू घेऊन येशीतून रांनच्या वाटेला लागलं की त्यांना न्याहाळणं होतं,दूरवर त्यांच्या पावलांनी उधळलेली धुळ आसमंतात त्यांचं सकाळच्या प्रहरी अस्तित्व निर्माण करते...

गावच्या नव्या तरण्या सुना हौसे खातर नदीच्या तीरावर धुने धुवायला म्हणून निघायच्या,येशीतून दहाच्या सुमाराला यांचा ऐकू येणारा गलका.नदीच्या तीरावर गुळगुळीत झालेल्या दगडांवर धुणे धुण्याचा येणारा आवाज अन् ऐकायला हव्या अश्या त्यांच्या गप्पा,माहेरच्या आठवणी,शाळेच्या,मैत्रिणींच्या आठवणी,माहेराला धुने धुवायला म्हणून नदी तीरावर जायला लागते म्हणून तिथल्या वेगळ्या आठवणी,सासू सासर्यांचे कौतुक,चकाट्या अन या सर्वात अधून मधून येणारा महादेवाच्या मंदिरातील घंटेचा नाद अन् मग तिकडं आपोआपच वळणारी पावलं...

नदीच्या तीराने पांदीच्या रस्त्यानं अनवाणी पायांनी चालणं काही वेगळंच सुख देतं,पांदीच्या दोन्ही बाजूंनी असणारी घाणेरीची फुलझाडे,नदीच्या कडेला असलेली बेसरमाची वाढलेली झाडे अन् डोक्यावर असलेला गुलमोहरांच्या झाडांचा मंडप,हातात अगरबत्ती,तेलाची कुप्पी घेऊन निघालं दहा पंधरा मिनिटांत नदीची खळखळ ऐकत महादेवाच्या मंदिरात जाणं होतं.

उंच उंच वडाची झाडं,पिंपळाची झाडं,बेलाची झाडं,कौटाची झाडं पुरातन काळातील मंदिर असल्यानं उंच असलेली दगडी कमान,कमानीला दोन्ही बाजूंनी दिवा ठेवायला असलेली दिव्यांची रास,एकांगाला दीपमाळ...

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली अतिप्राचीन पिंड,तांब्याचा नागफना,पिंडीच्या लिंगावर मधोमध पडणारी पितळी घागरीतील शिवनामायच्या पाण्याची धार अन रातराणीच्या फुलांचा येणारा सुगंध,पिंडीवर वाहीलेली बेल पत्र,जास्वंदीची वाहिलेली पाने,फुले अन् या सर्व वातावरणात मनोभावे प्रार्थना करून आपलं पूजाआर्चा करणं.

पुढे शनिदेवाच्या मंदिरात शनी देवाला कुप्पीत आणलेलं तेल वाहून मनोभावे पाय पडून घंटीचा नाद ऐकत कितीवेळ मंदिराच्या प्रांगणात आपली समाधी लावून बसून राहणं...

पक्षांच्या चिवचिव करण्याचा ऐकू येणारा नाद,घंटीचा नाद,टाळ्यांचा नाद,भजनाचा आवाज,अन् हे सर्व ऐकू येत असतानासुध्दा आपलं मन एकाग्र चित्ताने देवाचे नामस्मरण करत राहणं,या नामस्मरणात आपली समाधी लागणं हेच सुख असावं कदाचित जीवनात.

अन् मग एका त्या अभंगाचा प्रत्यय येणं होतं...

समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी !!१!!

समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा !!२!!

समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील !!३!!

जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे !!४!!

स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला !!५!!

नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें।वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं!!६!!

 

- भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0