निर्गुणीचें वैभव

09 Jun 2024 10:00:00


निर्गुणीचें वैभव

नामदेवांची भक्ती ही सर्वांहून आगळी आहे. यादवकालीन संतांमध्ये देखील तिचे विशेषत्व लपून राहिलेले नाही. माउलींच्या भक्तीला असलेली ज्ञाना-तत्वज्ञानाची खोली, मुक्ताईच्या अभंगातून जाणवणारी प्रखर तेजस्वी झलक, निवृत्तीनाथांच्या शब्दातली वारकरी आणि नाथपंथी तत्वज्ञानाची वीण, किंवा सोपानदेवांचा देखील यासारख्या अभंगवाटा असोत, अथवा तेराव्या शतकातील इतर संतांच्या अभंगांची जातकुळी असो, नामदेवांचा अभंग किंवा एकूण कविता म्हणजे या कशाचा अनुकार नाही. त्यात ज्ञान ततवज्ञान इत्यादींना दुय्यम लेखलेलं नसलं, तरी भक्तीहूनी श्रेष्ठ काही नाही हाच त्या सर्वाचा एकमेव निर्वाळा आहे. त्या भक्तितील अनन्यता, निस्पृहता आणि कमालीची निरागसता यामुळेच तर साक्षात देव वेडावून गेला होता! म्हणूनच तर नामदेव भक्तशिरोमणी! नामदेवांनी कायम स्वतःकडे मूलपण घेतलेलं आहे. विठ्ठलाचं लेकरू होण्यातच त्यांच्या जीवा जीविताची सार्थकता आहे. आश्चर्य म्हणजे, त्यांच्या दासी जनाबाईने सख्यभक्ती केली पण त्यांचं समाधान मात्र विठाईचं अजाण बाळ रहाण्यातच होतं. अर्थात ते सगुणाचे निस्सीम उपासक होते हे वेगळे सांगायलाच नको. पण जेव्हा नामदेव आपल्या अभंगात सगुण निर्गुणचा स्वर लावतात तेव्हा स्वाभाविक आश्चर्य वाटतं. सारं काही विठ्ठल.. यापलीकडे काहीच नाही, अशा निष्ठेने त्याच्या सगुण सख्याची ओढ असणाऱ्या नामदेवांनी तत्वज्ञानाचा उहापोह अभंगातून केला हे पाहून नवल वाटतं. पण क्षणात वाटतं, की भक्ती सर्वसाधक असते यावर श्रद्धा असली, तर ज्ञान सुद्धा भक्तीची सहज फलशृती होऊच शकतं की! भक्तीमुळे सहज उमललेल्या ज्ञानाला अहंकाराचा वास नसतो की गर्वाची उग्राताही नसते. भक्तीत कर्ताही तोच आणि कर्मही तोच. भाक्ताच आयुष्य हीच त्याची सुंदर लीला!

वाटतं, की या भक्तीचीच ही सहजस्फुर्ती आहे.

निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥

निर्गुण सगुणाच्या प्रश्नाची ही उकल किती सहजसुंदर आहे! जे परब्रह्म निर्गुण आहे ते निर्गुणींचें वैभव इथे आले आहे. पण येण्यामागे काही प्रयोजन? आहे ना! भक्तिमिषे! जो पूर्णकाम आहे अशा परमेश्वराला देखील प्रलोभन आहे ते भक्तीच! त्याला ओढ आहे ती भक्ताच्या सहवाससुखाची. म्हणून तो इथे आला आहे. खरंच आहे ना, कारण तो स्वतः भक्तांची वाट पहात उभा आहे. वाटतं, की या सावळ्या देवाला येण्यामागे 'विनाशाय च दुष्कृताम् ' ठाउक नाहीच. 'परित्राणाय भक्तानां ' यासाठीच तो आला आहे. आतुरतेने अथक थांबला आहे. नामदेव सांगतात की हे निर्गुणींचें वैभव भक्तीच्या लोभाने आले आहे पण ते सगुण होऊन आले हे सांगण्याची क्लृप्ती पाहा - विठ्ठल वेषात ते हेम ठसावले आहे. एखादी अमूर्त कल्पना मनात चित्रित होते तेव्हा ठसली जाते. रुपाकर घेते. ठसावले या शब्दामध्ये हेच तत्वज्ञान सांगितले आहे. ते मूळ निर्गुणच. पण या विठ्ठल वेषात ते साकार झालं. ठसल गेलं. त्याला हेम म्हटलं आहे हे विशेष. आपण सोनं पाहतो म्हणजे सोन्याचे दागिने पाहतो. उत्खनन झालेलं मूळ सोनं नाही. वाटतं, की ते मूळ निराकार सोनं म्हणजेच निर्गुण निराकार तत्व. त्याचे लोभस दागिने म्हणजे ऋषीमुनींना प्रतीत झालेली त्याचीच ध्यानरूपं..

बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥

तो आला हे सांगितलं, पण कसा आहे तो? तो बरविया बरवें म्हणजे चांगल्यात चांगला आहे, नेतक्यात नेटका आहे, सुंदरात सुंदर आहे. त्याचा विशेष म्हणजे नित्य नवाच आहे बरं तो. कालचा आज नाही आणि मागल्या क्षणी होता तसा आत्ता नाही. खरंतर, तो नित्य नवा आहे म्हणूनच तर संतमंडळी त्याच्यावर इतकं अगणित लिहू शकली. कारण रोज तो नवा दिसतो, नवा हसतो, नवा बोलतो, नवा खेळवतो, नवा लिहवतो, या सर्वांतून नवा जाणवतो आणि हे होता होता आपल्यालाच नवा करत जातो! त्याच्या मार्गी लागल्यापासून किती बदलत गेले असतील सगळेच संत. अशा या अभिनव घननीळाचं ह्रदयी ध्यान करता, आधिदैविक, आधिभौतिक आणि अध्यात्मिक असे त्रिविध ताप निवून जातात. यात नवल तरी काय? प्रेमाचं आश्वासन देण्यासाठीच तर तो उभा आहे.

चोविसांवेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध ॥३॥

श्री विठ्ठल हे महाविष्णूचे रुप आहे हे आपण जाणतोच. हातातील शंख, चक्र, गदा, पद्म यांच्या स्थानानुसार महाविष्णूची चोवीस रुपे मानली जातात. पण विठ्ठल मात्र या चोविसात काही बसत नाही. म्हणून तो चोविसा वेगळा आहे. पण हे वेगळेपण केवळ आयुधांमुळे नाही. पुढचे शब्द याचीच तर पुष्टी देताहेत! हे रूप सहस्त्रां आगळे आहे. कितीही सहस्त्र (किंवा सहस्त्र या शब्दाचा ' aganit' हा अर्थ घेऊन) देव पाहिले तरी त्यांहून हा निराळे आहे. कारण भक्तासाठी वैकुंठ सोडून वाळवंटात येऊन साध्याशा विटेवर चक्क उभा राहणारा देव जगात दुसरा नाहीच!! म्हणून हे रूप किंबहुना हा देवच आगळा वेगळा आहे. नामदेव तर याला निर्गुणाहूनही निराळा म्हणतात. कारण आपल्या आकलनाच्या पुष्कळ पलीकडे त्याची अनंत व्याप्ती आहे. असा हा शुद्धबुद्ध देव.

मग याचं वर्णन करण्याचे प्रयत्न कुणी केले नाहीत का? केले ना. अगदी समर्थ ग्रंथांनी केले. पण झालं असं की

वेदां मौन पडे श्रुतींसी कां नडे । वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥४॥

वेद जे अपौरुषेय म्हणून सर्वत्र गौरवले गेले, पूज्य ठरले त्यांना सुद्धा मौन आपलंसं करण्यावाचून पर्याय उरला नाही. अशाप्रकारे श्रुतीना काही हे शक्य झालं नाही. मग स्मृतिकडे जनसामान्यांनी श्रद्धाळू अपेक्षेने पाहिलं असेल. पण पुराणं मात्र स्वतःच प्रश्नात पडली. जिथे वेद पुराणादी ग्रंथ परब्रम्हाची ग्रंथी सोडवू शकले नाहीत, तिथे नामदेव मात्र तो विठ्ठल कसा आहे हे लीलया सांगतात. त्यांची दासी जनी तर चक्क त्याच्या गळा दोर बांधू शकते. हाच तर भक्तीचा महिमा!

भावाचें आळुक भुललें भक्तिसुखें । दिधलें पुंडलीकें सांधूनियां ॥५॥

आता त्याचा स्वभाव कसा? तर अगदी सोपा. त्याला भूक आहे ती भावाची. आणि 'त्या' अनंताची भूक म्हणजे अनंतच असणार! म्हणून ज्याच्या ज्याच्या ठायी भक्तीचा भाव आहे तिथे तो जात रहातोच. अगदी आजही. कितीही भक्त आपले केले तरी त्याची भूक काही शमत नाही हे किती सुंदर आहे! तारक आहे! ज्याची माया योग्यांना आणि ज्ञानीयांना देखील भूल पाडते, तो मायाधिश स्वतः भुलतो भक्तीसुखाला. पण त्याला इथे पंढरीत सांधून दिलंय ते पुंडलिकाने. सर्वच संतांनी पुंडलिकाचे आभार परोपरी मानले आहेत. नामदेव तरी ते कसे विसरतील. हा कृतज्ञ उच्चार यासाठीच. त्याच्यामुळेच तर हा विश्वलावण्याचा सावळा ठेवा तुम्हाआम्हाला विनासायास मिळाला आहे.

नामा ह्मणे आह्मां अनाथां लागुनी । निडारले नयनीं वाट पाहें ॥६॥

नामदेव स्वतःला अनाथ म्हणतात. तसे तर गोणाई आणि दामाशेट म्हणजे त्यांचे आई वडील जिवंत होतेच की. देह नावाच्या मातीच्या गोळ्याला जन्म दिला ते आई वडील आहेतच, पण खरा नाथ तोच जो श्वासाच गाणं अखंड गात राहतो आणि मृण्मयाला अमृताची पालवी फुटते. तोच एकनाथ. हे शेवटचं चरण दोन्ही अर्थांनी वाचता येईल असं वाटतं. दोन्ही अर्थ तीतेकच जिव्हाळ! एक म्हणजे अनाथ असल्याने नामा डबडबल्या डोळ्यांनी विठूमाऊलीची वाट पहात आहे. आणि दुसरा अर्थ म्हणजे नामा तसा अनाथ असल्याने ती विठूमाऊलीच तिच्या अकारण कारुण्याने ओथंबून नामयाची वाट पहात आहे.

नामदेवांचा भक्तीने बहरलेला प्रत्येक अभंग उच्चार आपल्या मनावर विठ्ठलवेषातील परब्रह्म ठसवतो हे मात्र नक्की. तो ठसा अमीट तर असतोच, पण सोबतच अवीट गोडीचा अनुभव अखंड देणारा असतो हा अनुभव आल्यावाचून राहत नाही.

~ पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0