पाऊस आला !

08 Jun 2024 14:00:19


पाऊस आला !

"
पाऊस आला ! ", " पाऊस आला!" वगैरे कोणीतरी घातलेल्या आरोळ्या गेल्या दोन-चार दिवसात नियमित ऐकायला मिळत आहेत. पाऊस आला, या अवस्थेच्या आधी जाणवणारी एक अवस्था म्हणजे चाहूल.. पावसाची चाहूल लागताच आपल्या मनात त्याच्याविषयीच्या कल्पना निरनिराळ्या गोष्टींची उधळण करीत असतात. त्या कल्पनाच भारी रम्य असतात की, त्यावरूनच प्रत्यक्ष पाऊस आल्यावर आपल्या मनाला किती आनंद होत असावा , याचे चित्र आपल्यासमोर तराळते. पाऊस म्हणजे काय, याची व्याख्या विज्ञानात, भूगोलात आपण वाचलेली आहे. पण भावनांचा गाभारा असणारं आपलं मन पावसाची निश्चित अशी व्याख्या करु शकत नाही. ऊन काहीसे विसावते, आभाळाचा रंग बदलू लागतो, काळे ढग आभाळात जमा व्हायला सुरुवात होते. या पावसाच्या पूर्व अवस्थांचा वातावरणावर मोठा प्रभाव पडतो. खिडकीतून बाहेर पाहिले तरी ते वातावरण आपल्याला सहज जाणवते. एकूणच वातावरणाचा रंग बदलतो. वारा अधिक वेगाने वाहू लागतो. झाडे डोलू लागतात. लहान मुलाला आनंद झाला म्हणजे ते मूल घरभर सैरावैरा धावत सुटतं तसे पक्षी इमारतींच्या छतांवर, झाडावर उडताना दिसतात. त्यांच्या किलबिलाटात उत्साह जाणवतो.

आता अगदी सारीकडून आभाळ भरून आलेलं असतं. हळूच दोन-चार, दोन- चार थेंब झाडाच्या शेंड्याला, इमारतीच्या छतांना, घराच्या कौलांना, खिडकीला आणि खिडकीतून बाहेर काढलेल्या आतुरलेल्या हातांना स्पर्श करतात. हळूहळू त्या थेंबांचा वेग वाढू लागतो. लांबी आणि रुंदीच्या परिमाणात मोजता येणार नाहीत असे चांगले टपोरे थेंब कोसळायला लागतात. पावसाचा कौलांवर टपटप असा जोरात आवाज येऊ लागतो. तेव्हा तो पाऊस बघायला जाण्यासाठी आपलं मन अगदी हट्टच धरतं. स्वतःच्याच मनाचा हट्ट मोडायचा तरी कसा! आपण अगदी उत्साहाने तो हट्ट पुरवतो. दार उघडून आपण बाहेर धावतो. बरेच दिवसांनी एखादा मित्र समोर दिसला म्हणजे त्याला अगदी कडकडून भेटावसं वाटतं, तसं आपण त्या पावसाला अगदी कडकडून भेटतो. पाऊस आपल्याला अगदी मायेने, प्रेमाने जवळ घेतोय असं आपल्याला जाणवतं. पावसाची चाहूल लागल्यापासून निरनिराळ्या कल्पनांचा सुरु झालेला प्रवास पावसाला प्रत्यक्ष कडकडून भेटेपर्यंत सुरू राहतो. हा प्रवास संपतो असे म्हणता येणार नाही. पाऊस थांबला म्हणजे प्रवास एखाद्या थांब्यावर विसावला आहे, असे म्हणता येईल. पाऊस थांबला तरी अनेक गोष्टींना झालेल्या स्पर्शात तोही विसावलेला असतो. सारीकडे थेंबांची सुरेख नक्षी असते. या ओल्या वातावरणात एकेका श्वासाबरोबर निरनिराळे गंध येतात. मातीचा गंध आल्हाददायक असतो. हा गंध आठवणींना रुंजी घालतो.

एखाद्या अंगणात वेगवेगळी फुलझाडे असतात. वा-यामुळे आणि पावसामुळे त्याची काही फुले त्या ओल्या अंगणात पडलेली असतात. त्यांचा एक मंद सुगंध त्या ओल्या वातावरणाशी आपली गट्टी जमवतो. पारिजातकाचा तर अक्षरशः ओला सडा पडतो. चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या गळून पडतात. त्या ओल्या फुलांचा नि पाकळ्यांचा अंगणभर गंध येतो. त्यानंतर हवेत निर्माण होणारा गारवा शरीराला हळूच स्पर्श करतो तेव्हा हलकेच शहारा आल्यासारखं आपल्याला वाटतं. ही पावसाची वेगवेगळी रुपे, निरनिराळे गंध निसर्ग निर्माण करीत असतो. पण या गंधांव्यतिरिक्त पावसाला साजेसे काही गंध आपणही निर्माण करतो. ते म्हणजे उकळत्या चहाचे आणि खमंग कांदाभज्यांचे! हे गंध श्वासाबरोबरच पोटालाही हवेहवेसे वाटतात. कोकणात किंवा एखाद्या गावात पावसाच्या पाण्याने भरलेल्या नदीत किंवा अगदी घराजवळच्या विहरीतसुद्धा लहान पोरं पटापट उड्या मारुन पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. तशी ही कांद्याची भजी तेलात उड्या मारून मनसोक्त पोहून आपल्या जीभेचे चोचले पुरवीत असतात. त्यावर चहाचा एकेक घोट घेताना जणू अमृतप्राशनच करीत आहोत असे आपल्याला वाटते.

पावसाचं सुंदर वर्णन मराठी साहित्यातच आपल्याला पहायला मिळतं. विशेषतः मराठी कवींनी आपल्या भावना कवितेतून पावसाविषयी व्यक्त केलेल्या भावना अजूनही ओल्या आहेत. "येती झराझरा पावसाच्या धारा , झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा.." ही शांता शेळकेंची कविता , ना.धों. महानोरांची " मन चिंब पावसाळी, झाडात रंग ओले.." , " नको नको रे पावसा , असा अवेळी धिंगाणा.." ही कवयित्री इंदिरा संतांची कविता.. या आणि अशा कितीतरी कविता मराठी साहित्यात सापडतील. सर्वत्र एकच आभाळ आणि एकच पाऊस असतो.. तरीही इतक्या सुंदर आणि पावसाची वेगवेगळी रुपे दाखविणा-या कविता मराठी साहित्यात आहेत. पावसाचे असे निरनिराळे रंग आपल्या आयुष्याची रंगत वाढवत असतात.. सा-या सजीव-निर्जीव सृष्टीला स्पर्श करण्यासाठी एकेक थेंब आतुर असतो. रोज नवे रंग घेऊन येणारा पाऊस मनातल्या पावसाविषयीच्या कल्पनांच्या रंगात अगदी सहज मिसळतो आणि जणू सारी सृष्टीच ओल्या रंगात न्हाते..

-
गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0