अन् गावाची लेक सासरी निघाली.

07 Jun 2024 14:41:10


अन् गावाची लेक सासरी निघाली.

गावाकडच्या सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या असतात. पद्धती, रीती हा भाग निराळा पण तिथली आपुलकी ही सगळयात वेगळी असते. याचा सुंदर दाखला मिळतो तो गावाकडच्या लग्न समारंभात! कधी अनुभवलं आहे का असं गावाकडचं लग्न? जिथे जसं स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून संसार करतात तसंच प्रत्येक व्यक्ती एक होऊन एखाद्या घरचं लग्न आपलं समजून साजरं करते. कसं? छोटीशी झलक लिहिते आहे पुढे -

साखरपुडा झाला नि पुढच्या दोन महिन्यांची रीतसर आखणी सुरू झाली. नात्यातल्या, गावातल्या, ओळखीतल्या साऱ्यांनाच पुढच्या गोष्टी सांगून झाल्या. घरोघरी केळवण, आहेर यांची बोलणी नि नवरीचे लाड करण्याची सरबराई सुरू झाली. इतक्यात म्हणता म्हणता एक दिवस गावातल्या सगळ्या बायका हातात आपापल्या घरचं पोळपाट लाटणं घेऊन दारी आल्या नि इकडच्या तिकडच्या, सासरच्या माहेरच्या गप्पांमध्ये पापडांच्या एका एका ढीगाची वाळवणं पडत गेली. गावाच्या सगळ्या आयोंच्या (आजींच्या) सांगण्या नुसार एकीकडे लग्नात लागणाऱ्या वस्तूंची ही भली मोठी यादी तयार झाली. मधूनच एक दिवस मुंबईला फेरी झाली नि त्यात बहिणी, वहिनी, आत्या, मावश्या सगळ्यांच्या साड्यांची खरेदी झाली. एक दिवस सख्खे चुलते घरी आले - हातात पैश्यांची पिशवी ठेऊन गेले. म्हणाले, ' लगीन घर असलं की लागतात वर खर्चाला'. "भाऊ, वहिनी, लागेल तेव्हा हाक द्या, आम्ही आहोतच इथं", असं म्हणत गावातली सगळी मित्रमंडळी घरची बनून गेली. पत्रिका छापल्या गेल्या - घरच्यांसोबत आजूबाजूच्या हाकेला धावणाऱ्या सगळ्यांची नावं आवर्जून पाहिली गेली. पत्रिका घेऊन आमंत्रणाला गेलेली मंडळी रोज थकून भागून घारी येऊ लागली. वेळ आहे वेळ आहे म्हणता म्हणता लग्न दहा दिवसांवर येऊन पोहचलं. मुंबईला राहणाऱ्या काकाने 'गोडधोड घेऊन येतो' असा निरोप पाठवला, बाजूच्या मैत्रिणीने रुखवत मीच करते गं असं म्हणत सहज बहिणीची जागा घेतली. आत्यांनी, मावशींनी अशी तयार हो, तशी तयार हो करत नवनवीन दागिने आणून दिले. लग्न दोन दिवसांवर आलं - वेशीपासून अंगणापर्यंत मांडव पडला. दिव्यांची तोरणं लागली. मुंबईला असणाऱ्या भाऊंचं घर पाहुण्यांसाठी उघडुन दिलं गेलं. चार घरांची अंगणं शेणखळा टाकून सारवली गेली. गावातल्या सगळ्या मुलांनी आम्ही आहोत वाढायला असं म्हणत शहराची बुफे का काय ती पद्धत एका क्षणात दूर लोटली. मांडव स्थापणी झाली. गावातल्या सगळ्या बायकांच्या हातात चुडा भरायला कासरणीला बोलवलं गेलं. बारीक डिझाईन, थोडी जाडसर, आणखी चार भर असं म्हणता म्हणता करवल्या, सूना, माहेरवाशिणी सगळ्यांचे हात बांगड्यानी भरले. दिवस संपला. दिवस उजाडला. मुहूर्ताची हळद लागली. धवलं गात गात नवरीला हळद लावण्यासाठी पलीकडच्या गल्लीतली काकु कशी सजून धजून आली. ओल्या डोळ्यांनी हळद लावता लावता परकर पोलक्यातलं अल्लड लहान लेकरू आठवून भरपूर आशीर्वाद देऊन गेली. जाता जाता सोबत आणलेली २-२ रुपयांची नाणी करवल्यांचा मान म्हणून सगळ्या लहानग्यांच्या हातात ठेऊन गेली. पत्रावळ्या मांडल्या गेल्या, "ए दादा जरा याला भाजी वाढ", "बाय जेवलीस ना?" असं म्हणत प्रत्येक पाहुण्याला आग्रहानं जेवायला वाढलं. जेवणं झाली. हो नाही म्हणता म्हणता रात्र झाली. गावातल्या मुलांचा बँजो कधीच ठरला होता. लोकगीतांवर ठेका धरला गेला. गावातलं पहिलं लग्न असल्यासारखे सगळे आनंदाने नाचात सहभागी झाले. घरासमोरचं अंगण पहिल्यांदा एवढं गजबजलेलं होतं. दिवस संपला. दिवस उजाडला. नवरी मुलीची मानाची आंघोळ झाली. स्टेज, रुखवत सगळं नीट मांडून झालं. रुखवत पाहत रहावं असं! गोडधोड खाऊ, सुपारीपासून तयार केलेला मंडपाचा देखवा आणि आणखी काय काय! नवरामुलगा गावाच्या वेशीपाशी आला अशी बातमी आली नि लगबग सुरू झाली. गावातली सगळ्यात सुशिक्षित मंडळी आणि व्याही यांची पुन्हा गाठभेट झाली. एवढ्यात गावातल्या चार शाळकरी मुलांनी सरबत वाटायला घेतले. ए बारक्या एक ग्लास इकडे दे रे, फारच उकडतंय नाई? असं म्हणता म्हणता एकाचे चार ग्लास संपले. सख्खा मामा नाही म्हणून मंदिराच्या बाजूच्या घरातले मामा मी आहे ना असं म्हणत मुलीला आनंदाने मांडवात घेऊन आले. इतक्यात अंतरपाट धरला गेला. मंगलाष्टक सुरू झाली. शेवटच्या चार अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर सुदैवानं पडल्या नि पुढचे रितीरिवाज सुरू झाले. गावातल्या प्रत्येकाची नवा जोडा बघण्यासाठी ही घाई झाली. मांडवातले भटजी बुवा कोपऱ्यात स्थिरावले आणि न स्वीकारला जाणारा आहेर कौतुक, परतफेड, आशीर्वाद म्हणून मेहंदीने रंगलेल्या हातात दिले गेले. बक्कळ फोटो निघाले. मुलीच्या करवल्यांनी नजर चुकवून नवऱ्याचे शूज पळवले. गावातल्या आजीने दम दिला म्हणून तो मामला ५००/- वरच मिटला. तळ्याच्या अलीकडे राहणाऱ्या दादांनी वेळेचं भान राखून चला आवरा असा एकच इशारा दिला. आपसूक पदरांचे कोपरे डोळ्यांपाशी पोहचले. नवरी आईआधी समोरच्या काकींना बिलगली. तब्येतीला जपा असं म्हणत पुढे सगळ्या लहानग्यांना जवळ घेऊन त्यांची बालपणं नजरेत साठवून घेतली. आईबाबांना पाहून डोळे आणखी पाणावले तर चार दिशेच्या चार जणींनी अलगद डोळ्यातलं पाणी पुसलं. नव्या जोड्याने सगळ्यांना वाकून नमस्कार केला

अन् गावाची लेक सासरी निघाली.

या सगळ्याच्या मध्ये आणखी खूप गमती जमती घडत राहतात. चार कोसांवरती गावं बदलतात, पद्धती बदलतात तसतसं माणसंही बदलतात. पण आपुलकी बदलत नाही. दुसऱ्याचा आनंद तो आपला आनंद असं मानणारी लोकं बदलत नाही. रस्त्यावरून चालताना ओटीवर बसलेल्या आजीला मारलेली हात चुकत नाही. शेतात काम करणाऱ्या काकांना विचारलेलं पाणी चुकत नाही. सख्या भावाच्या बरोबरीने त्याच्या मित्राला बांधलेली राखी चुकत नाही आणि म्हणूनच एखाद्या गावातल्या चार भिंतींच्या घरातल्या लेकीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्या घराची लेक नाही तर अख्या गावाची लेक सासरी निघालेली असते.

Powered By Sangraha 9.0