असोनी अदृश्य

23 Jun 2024 10:10:10


असोनी अदृश्य

 

वारकरी संत-परंपरा ढोबळ मानाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींपासून सुरू होऊन संत निळोबांपर्यंत मानली जाते. आपल्या सर्वांच्याच अकलनापासून तसे काहीसे दूर राहिलेले निळोबाराय महत्त्वाचे संत आहेत. त्यांची विपुल अभंग रचना विठ्ठल भक्ती आळवणारी आहे. त्यातले काव्यात्म सौंदर्य देखील अनेकपदरी आहे. मात्र आपल्या या लेखन कर्तृत्वाकडे ते कसे बघत असतील? याचं उत्तर त्यांनीच दिलं आहे. 'निळा म्हणे मी बोलता ।। दिसे परी हे त्याची सत्ता ।।' हा त्यांचा कृतज्ञ उद्गार. याचं मूळ काय असावं हे शोधणं फार कठीण नाही. निळोबांनी तुकाराम महाराजांना आपलं गुरू मानलं होतं. स्वाभाविकपणे, 'बोलविता धनी वेगळाचि' ही तुकोबांची भूमिका किंवा त्यांचं भान निळोबांसारखे शिष्य आत्मसाद करणार हे निःसंशय! मी बोलतो असं वरवर दिसत जरी असलं, तरी ती 'त्या'ची सत्ता आहे. माझी नाही. स्वतःकडे अकर्तेपण घेणारा हा निळोबांचा निर्वाळा पाहून अनेक प्रश्न पडू शकतील. श्रद्धाहीनांना किंवा अगदी श्रद्धा अंमळ डळमळीत असलेल्या प्रत्येकाला ही सत्ता मानायची म्हटली तर ती पुरेशी दिसत नाही हा प्रश्न डाचू शकतो. त्याचंच उत्तर निळोबा अभंगातून देतात.

तो ईश्वर, ज्याला संतांनी सावळ्या विठ्ठलरुपात पाहिलं, आळवलं, तो आपल्या आतबाहेर व्यापलेला आहे.

अवघियांचे असोनि देहीं । अंतर्बाही न दिसेचि ॥१॥

तो विठ्ठल सर्वांच्या अंतर्यमी आहेच, पण बाहेर देखील तोच व्यापून आहे. पण तो दिसत नाही. खरंतर, तो सामान्यपणे दिसत नाही इथेच तर सगळ्या प्रश्नांची गंगोत्री आहे! म्हणूनच संशयाची पाल चुकचुकत राहते. पण तो असूनही न दिसतो, तर त्याचं अस्तित्व मानावं तरी कसं? ते आपल्याला पटवून द्यावं यासाठी निळोबांचा केवढा कळवळा म्हणावा.. त्यांची उदाहरणांची लडी संपता संपत नाही. इतके दाखले देऊन ते मुद्दा मांडतात, की तो पटलाच पाहिजे. वास्तविक, हा

निळोबांचा लेखनविषेश आहे. अनेकानेक रूपक व दाखल्यांची योजना फार सहजतेने करतात निळोबा. इथेच पहा ना -

जेवीं साखरेमाजी गोडी । न दिसे उघडी असतांही ॥२॥

साखरेमध्ये गोडी असते पण ती थोडीच दिसते? आपण साखर बघतो, पण त्यातली गोडी मात्र दिसत नाही. ती असतांही म्हणजे असूनही दिसत नाही. पण म्हणून आपण गोडी नाकारत नाही. किती नेहमीचं उदाहरण आहे साखरेचं! पण त्यातून ईश्वराचं व्यापकत्व सहज सांगितलं आहे. अध्यात्म सोपं करून सांगण्याची हातोटी भारतीय अध्यात्मात केवढी सहज आहे! उपनिषदात सांगितलेला पाणी आणि मीठ एक होऊन जाण्याचा सिद्धांत असो किंवा वारकरी संतांचे असे सहज सोपे दाखले! आशयाचं महत्व कमी न करता त्याचं सोपिकरण ठायीठायी दिसून येतं.

वाद्य दिसती न दिसे नाद । जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥

वाद्य दिसतात, पण नाद थोडीच दिसतो? किंवा, भोजन म्हणजे त्यातील पदार्थ दिसतात, पण त्यांची चव मात्र दिसत नाही. तसाच तर तो ईश्वर! सुरुवातीला त्याचं असणं दिसत नसलं, तरी ते नाही म्हणता येत नाही. साक्षात्काराच्या वाटेचं प्रवेशद्वार स्वीकारातच असतं! क्ष गृहितक धरल्याशिवय कोडं सुटत नाही. एकदा त्याचं अस्तित्व मानलं, आणि वाटचाल सुरू केली की ते प्रत्ययास आल्याशिवाय रहात नाही. हा संत-सिद्धांचा अनुभव आहे. स्थूल दिसत असलं, तरी त्यातील सूक्ष्म दिसत नाही. पण या ना त्या मार्गे प्रत्ययास मात्र येतं. अशा या स्थुलात व्यापून राहणाऱ्या देवाला जाणून बघायला कुणी गेलं, तर..?

निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

वेदांनी हे धाडस केलं! पण.. पण जाणूनही ते नेणते राहिले. का? कारण साखरेचं वर्णन करता येतं, गोडीचं नाही. वाद्याचे आकार सांगता येतात, पण त्याच्या नादाचे नाही. भोजनाची कृती सांगता येईल, स्वादाची नाही! म्हणूनच हे जणूनी नेणतेपण वेदांच्या वाट्यास आलं.

निळोबांनी जी जी उदाहरणं दिली आहेत, ती पाहता अजून काही लक्षात येतं. आपण साखर खातो ती गोडीसाठी. आपण वाद्य वाजवतो ती त्यातील नादासाठी. काही आवर्जून खातो ते चवीसाठी. प्रत्यक्ष न दिसणाऱ्या गोडिचा, स्वादाचा, ध्वनीचा आपण जर एवढा विचार करत असू, तर सर्वव्यापी ईश्वराचा का करू नये? ज्या देहासाठी आपण अविरत झटत असतो, त्यात वास करणाऱ्या विठ्ठलाचं भान ठेवणं हेच तर या अभंगाचं सांगणं आहे. आपल्यापासून सुरुवात करून त्याच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा परीघ वाढवत नेऊ, म्हणजे 'विष्णुमय जग' हे केवळ शब्दच रहाणार नाहीत, तर आपला अगदी स्वतःचा अनुभव होतील. तेव्हा विठ्ठलाचं दर्शन दूर रहाणार नाही!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0