गृहसखी..

22 Jun 2024 14:05:39


गृहसखी..

शेजारच्या बंगल्यातल्या काकू नेहमीप्रमाणे आमच्याकडे चावी ठेवून बाहेर गेल्या. त्यांची मोलकरीण येऊन सगळं काम करुन चावी परत आमच्याकडे ठेवून पुढच्या कामाला गेली. पण गेले दोन-तीन दिवस ती मोलकरीण आली नाही. त्यामुळे शेवटी काकू रविवारी तिच्या घरीच चौकशी करायला गेल्या. तेव्हा समजलं, जिना पुसत असताना एका ठिकाणी ती जी घसरुन पडली ती आठ- नऊ पाय-या गडगडत गेली. त्यामुळे तिला कायमची दुखापत एका पायाला झाली. काकूंना देखील वाईट वाटलं. पण त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला, आता रोजच्या कामाचं काय, नवीन बाई शोधायला हवी.. काही काळानंतर त्यांना बाई मिळाली. मोलकरीण मिळाल्याचा काकूंना अगदी आनंद झाला. मोलकरणी काय कशाही मिळतात.. पण खरंतर या शब्दाभोवती मन कुठेतरी काहीतरी सांगू पाहत होतं. मोलकरीण हा सुलोचना बाईंनी केलेला सिनेमा... पण सिनेमाच्या विश्वातही आता कालानुरूप बदल झाले, होतही आहेत. पण मोलकरीण या उपेक्षित वर्गाविषयी मात्र आपले विचार कालानुरूप फारसे बदललेले नाहीत. महिना ठराविक पगारावर धुणं-भांडी करणारी किंवा फरशी पुसणारी आणि गरीब परिस्थितीपायी आपल्या घरी येऊन काम करणारी बाई, या पलीकडे आपली व्याख्या अजूनही फारशी गेलेली नाही!

मध्यंतरी याच विषयावर कविता किंवा लेख वाचल्याचं आठवतं. त्यातील गृहसखी हा शब्द अतिशय सार्थ वाटला. मोलकरीण या शब्दापेक्षा तो शब्द उजवा देखील वाटला. आज नवरा-बायको दोघंही नोकरी करताना आपण पाहतो. तेव्हा कुणा मदतनीसाची गरज भासते. तेव्हा मोलकरीण या शब्दाचं महत्व जाणवतं. मोलकरीण म्हणण्यापेक्षा खरंतर अलीकडे अनमोलकरीण हा शब्दच वापरला पाहिजे. स्वतःचे कुटुंब सांभाळून आणखी कुणाचे तरी कुटुंब सांभाळणारी ही स्त्री ख-या अर्थाने गृहसखीच असते. आर्थिक मोबदला तिला मिळत असला तरी किमान आदर असल्याखेरीज ती काम करु शकत नाही. 'कामवाली बाई ' किंवा ' मोलकरीण ' ह्या शब्दांपेक्षा खरोखरच गृहसखी हा शब्द आता आपण वापरला पाहिजे. आपल्या घरची आठ-नऊची वेळ सांभाळण्यासाठी ही गृहसखी सुर्योदयापुर्वीच उठून आपल्या कुटुंबियांचा स्वयंपाक इत्यादी कामे करुन सात-सव्वासातला घराबाहेर पडते. कुणाच्या घरी धुणं, कुठे पोळ्या लाटणे, काही ठिकाणी तर सगळीच कामे गृहसखी करते. आपल्या कंपनीत चांगल्या कामाचं बक्षीस आपल्याला मिळतं. मिठाईचा पुडा मिळतो. पण अविरत राबणा-या या गृहसखीला चहाचा कप किंवा क्वचित एखाद्या घरी जेवायचा आग्रह केला जातो. पण बक्षीस वगैरे अपेक्षा न करता देखील कित्येक सख्या घरातील सदस्यांच्या अनुपस्थितीत ते घर स्वच्छ ठेवतात. बक्षीस आणि मोबदला यातला फरक आपल्याला जाणवतो. ऑफिसातील सहकर्मचा-यास आपली बक्षिसाची अपेक्षा आपण बोलूनही दाखवतो. पण एखाद्या वेळी या गृहसखीने आगाऊ रक्कम मागितली म्हणजे आपल्याला काहीवेळा आवडत नाही. पण तिची आणि आपली एक गोष्ट सारखी असते आणि ती म्हणजे 'गरज' .. या गरजा भागविण्यासाठीच सारं चाललेलं असतं. पण स्टेटसच्या फरकाची आपण एक पट्टी डोळ्याला बांधलेली असल्यामुळे गरजेतला सारखेपणा आपल्याला दिसत नाही.

काही सख्या अविश्वासाने वागत असतीलही. पण ज्या खरोखरीच आपल्या घराकडे नीट लक्ष ठेवतात, त्यांना अगदी बक्षीस दिले नाही तरी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यानेही 'मोलकरीण ' हा शब्द 'गृहसखी ' असा होऊ शकतो. आपल्या सण-समारंभात अशा गृहसख्यांना बोलावणं ही त्यांच्याविषयी व्यक्त केलेली एक कृतज्ञताच नव्हे का! महिलांच्या सन्मानार्थ मोठ्या ऑफिसात कितीतरी सोयी असतात. पण घरी येणा-या गृहसखीच्या सन्मानार्थ आपण योजना राबविल्याचे कुणाच्या स्मरणात नाही. आपल्या घरी पोळ्या लाटणा-या गृहसखीच्या घरी प्रत्येक सदस्याला पुरेशा पोळ्या मिळतात का, याची नुसती चौकशी केली तरी त्या गृहसखीला किती आनंद होतो. या तिला झालेल्या आनंदाची आपल्याला होणारी जाणीव माणूसकीच्या दिशेने आपल्याला एक पाऊल तरी निश्चितच घेऊन जाते. जी घराचा भार सांभाळते ती गृहिणी.. त्याप्रमाणेच त्या गृहिणीला तो भार सांभाळण्यास सहाय्य करणारी गृहसखी.. इतका साधा-सोपा या शब्दाचा अर्थ आहे.

या लहान-मोठ्या जाणीवा आपले जीवन फुलवत असतात. ही जाणीवांची फुले जगण्यातलं सौंदर्य वाढवत असतात. त्यातीलच एक छोटंसं फूल म्हणजे ह्या गृहसखीविषयी कृतज्ञतेची किंवा आपुलकीची जाणीव आहे. या आपल्या घरातल्या अनोख्या सदस्याचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी म्हणून जे प्रयत्न सहज करता येतील ते केले म्हणजे आपल्याला समाधान मिळेल. तुमच्या-माझ्या भोवती अशा कित्येक गृहसख्या असतील. त्यांना आदराची, साक्षरतेची, सन्मानाची, आपण करत असलेल्या कामाच्या मोबदल्याची आणि मोबदल्याबरोबरच त्या जाणीवेची गरज आहे. या गरजांपैकी कोणती गरज पूर्ण करता येईल, हे आपण पाहिलं की, गृहसखीच्या घराला आपोआपच सौख्याचा आणि समाधानाचा आनंद उपभोगता येईल.. आपलं कुटुंब सांभाळून अनेक कुटुंबांची गरज नित्यनेमाने पूर्ण करणा-या गृहसखीला मनापासून सलाम!

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0