करा हा विचार..

20 Jun 2024 13:56:07


करा हा विचार..

 
संतांच्या अभंगांमधे जसा त्यांचा रसाळ अनुभव असतो तसा कनवाळू मनाने त्यांनी भक्तांना केलेला उपदेशही असतो, जाणिवांची बीजंच जणू त्यांनी अभंगांमधे पेरलेली असतात. ह्या जाणिवा अभंगांमधून कधी इतक्या लख्ख डोळ्यासमोर प्रकटतात, कधी पूर्वानुभवाच्या पातळीवर पटतात की त्या आचरणात उतरायला वेळ लागत नाही. तेव्हा हे अभंग भक्तांचे सारथी होतात आणि अर्थात त्यांनी दाखवलेली सुवाट भक्तांना कृतार्थ करणारी असते... एका अभंगामधे संत नामदेव महाराज म्हणतात -



अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥

अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥



इथे संत नामदेव महाराज सांगतात की सगळ्यांनी सतत विचार करायल हवा तो भवसिंधूच्या पार तरून जाण्याचा. कदाचित विचार करायचा आहे तो आचार बदलण्यासाठी. ज्याप्रमाणे घरातून निघाल्यावर नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्याचा आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेत पोहोचण्याचा विचार मनात असेल तर प्रवासात आजूबाजूला दिसणाऱ्या मोहपशांना भुलण्याचा संभव फार थोडा शिल्लक राहतो तसं एकदा ध्येय सुनिश्चित असलं की त्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी किती सहज टाळल्या जातात माणसांकडून. कोणत्याही गोष्टी टाळण्यासाठी टाळणं कदाचित अवघड जाऊ शकतं मात्र त्या गोष्टी ध्येयाच्या आड येतात म्हणून टाळणं कदाचित सहज साध्य होऊ शकतं. अशावेळी ह्या गोष्टी टाळून जीवनाचं सार्थकत्व उंचावतच मात्र त्याचबरोबर ध्येयही जरा लवकर साधतं. जेव्हा रोजच्या जगण्यात आपल्याभोवती कितीही व्याप असला, कितीही कीर्ती आणि ऐहिक समृद्धी असली तरी भवसिंधु तरुन जाण्याचा विचार दृढ असतो तेव्हा माणूस उगीच गरजेपेक्षा जास्त कशात अडकत नाही कारण प्रयत्नांनी नक्की मिळवायची किंबहुना मिळायला हवीच अशी ती गोष्ट नसते. कदाचित म्हणूनच हा विचार निरंतर करायचा आहे. संत नामदेव महाराज म्हणतात की सगळेच जन्म जणू वाया गेले. वाया गेले ते विषयांना जवळ केल्यामुळे, मायेला, मोहाला भुलल्यामुळे... कदाचित ह्या जन्मात कोणालातरी किंवा संतांना आपल्याला 'त्या'चं नाम उच्चारायला कळकळीने सांगावं लागतंय हाच मागचे जन्म वाया गेल्याचा पुरावा तर नाही ना? असा प्रामाणिक प्रश्न इथे पडतो.



अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥

अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥



म्हणूनच आपल्याला संत नामदेव महाराज इथे सांगतात ते परमेश्वराचं नाम घ्यायला. हा मार्ग जरी माणसांच्या परम उद्धराचा असला तरी तो सोपा आहे, म्हंटलं तर निश्चयाने ठरवून साधू शकाण्यासारखा आहे. जणू म्हणूनच रोजच्या जगण्यात केल्या जाणाऱ्या कामाचा त्याग न करता ते काम करताना हरिनाम घ्यायला सांगितलं आहे. रोजच्या व्यवहारातून काही कमी करण्यापेक्षा रोजच्या व्यवहारालाच हरिनामाची जोड द्यायला सांगितलं आहे. वाचेवर वसणारं हरिनाम हेच तर खऱ्या अर्थाने अवघ्या कायेचं सौंदर्य असतं...हे करत असताना जणू सगळा भाव गोळा करून अर्पण करायचा तो एका विठ्ठलाच्या चरणी, त्याचं भजन-पूजन करायचं ते भावाने. त्याचबरोबर जीवाच्या आर्ततेने पूजन करायचं ते हरिदासांचंही. कदाचित हरिला हरिदासांत आणि पुढे अवघ्या सृष्टीत बघण्याचा भावार्थ इथे असू शकेल. कदाचित प्रत्येकात परमेश्वराचा अंश असल्याचं जाणून अशा भक्ताने इतर माणसांची पूजा करावी अर्थात त्यांना दुखवू नये, गरजूंना मदत करावी असा यामागचा अर्थ घेता येऊ शकतो. ह्यामध्ये केवळ औपचारिकता नसून आर्तता आहे हे लक्षात घ्यायला हवं.



अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥\

नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥



ह्यात किती सहज आचार आणि विचार शुद्धी साधली जाते. माणूस परमेश्वराच्या नामाच्या मार्गावर चालू लागतो, त्याच्या भजनात रंगू लागतो, हरिदासांमधेही 'त्या'ला पाहू लागतो किंवा 'तो' असण्याची जाणीव बाळगतो. महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या कृपेत न्हाऊन निघतो आणि जणू ह्यामुळे अशा भक्ताला सगळं सुख लाभतं त्याचबरोबर त्याला पुन्हा आपल्या कर्मामुळे गर्भवास भोगावा लागत नाही अर्थात त्याला त्यासाठी जन्म घ्यावा लागत नाही. संत नामदेव महाराज म्हणतात की सगळ्यांनी हा अनुभव घेऊन पाहावं आणि हे सांगून शेवटी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतात ती सतत संतांच्या संगतीत राहण्याचा. जिथे संतांच्या कृपेने ह्या मार्गावर चालण्याचं बळ मिळतं, नित्य त्यांचं सहाय्य मिळत रहातं तसं सतात्याला फळही...



- अनीश जोशी

Powered By Sangraha 9.0