माऊली..!

19 Jun 2024 10:46:56


माऊली..!

 

जेवण आटोपून मी देवळात तेलाचा दिवा घेऊन गेलो,एरवी अंधार झाला होता थंडी कापत होती शरीराला....

वेशीच्या बाहेर असलेलं ते देऊळ,दुरूनच टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडला.सोबतीला माझ्या शिवनातीरच्या विठु माऊलींचा ही आवाज कानी पडत होता,तसा मी तिच्या जवळ जात होतो...

तसंतसं पावलांनी वेग वाढता घेतला,खुप दिवस झाले गावाकडे आलो होतो.माऊलीचे वेध लागलं होतू या भक्ताला,शिवनामाई तुडुंब भरली होती संथ वाहणारी शिवनाई भयाण रौद्ररूप धारण केलेली भासत होती....

स्मशानातही काल सोडुन गेलेल्या एकनाथ बाबाचं मडं जळत होतं,दुरुनच बघुन वाटेवरच हात जोडून एकनाथ बाबाचं दर्शन घेतलं.बापाच्या वयाचा असल्यानं बाप गेल्याचं दुःख व्हावं तसं झालं....

नकळत माऊलींच्या ओढीनं पावलं देवळाकडे वळाली,मला माझ्या सर्व माऊलींचे दर्शन झाले अन् धन्य झालो मी.ही माऊली पंढरीची नसुन माझी शिवनातीरावरची माझी पंढरीची माऊली समान मला ती होती....

गावातील सर्व वृद्ध,सायंकाळी हरिपाठ,भजनाला जमतातनां ती मायबापच माझी माऊली. आईबापा नंतर देव दिसला तो या माऊलींमध्येच मग नाही कधी पंढरीच्या वारीची आठवण झाली...

गावी येऊन एक अख्खी रात्र यांच्या सहवासात घालतो,आशिर्वाद घेतो.कुणास ठाऊक ही शेवटची भेट असेल एखाद्या माऊलीची,जशी कालची एकनाथ बाबांची भेट नाही होऊ दिली देवानं आज त्यांच्या प्रेताला बघुन शेवटचा राम राम घातला....

एकनाथ बाबा वैकुंठाला निघुन गेले,मी आहे माझी वृद्ध माऊली आहे.रात्री एकनाथ बाबांच्या आठवणीत अन माझ्यासाठी माऊलींनी मला बापानं शिकवलेला अभंग आम्ही म्हणलो, नाशिवंत देह जाणार सकळ...!अन मी भान हरवुन गेलो....

नव्हतो या जगात मी आठवणी फक्त डोळ्यांसमोर येऊ लागल्या,त्या येड्या अशोक नावाच्या गावातील एक गरीब पण बुध्दीने लहान राहिलेल्या वडील माणसाच्या.तो ही वैकुंठाला जाऊन खुप वर्ष झाले, आजही तसाच आठवतो हातात डफडं घेतलेला....

माझ्या बापाच्या मयताला मांग म्हणुन त्याला मौतीच्या पुढं डफडं वाजायला बोलावलं होत.तो डफडं वाजत होता,पण राहून राहून माझ्याकडे बघत होता.अन् तो त्याचा येडा खुळा चेहरा आयुष्भर डोक्यात कायमचा फिट्ट झाला,तो आजही आठवला की झोप नाही येत....

तो डफडं वाजुन थांबला,बिडी प्यायला लागला की लोक त्याला ए येड्या आश्या वाजव की म्हणून चिडवत होती.ते मला पटत नव्हतं तो बिचारा त्याच काम करत होता....

गंभीर होता माझा बाप गेल्याचं दुःख त्याला झालं होत,बापानं कधीपण गावी आलं की पारावर भेटल की त्याला इस्माईल बिडीचा एक कट्टा घेऊन द्यावा....

बापाच्या वयाचा होता,अन आज माझ्याच बापाच्याच मौतीला डफडं वाजवतोय हे त्याला अनावर नाही झालं अन् अखेरला अग्निडाव देतांना बिचार्यानं अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....

बाप माझा वारला होता पण दुख मला त्याच्या अश्रुंसाठी झालं होतं, त्याच्या रुपात अक्षरक्षा माऊली बापाच्या मौतीला आली होती. मी रडत होतो....

त्याला दुःख अनावर झाले अन् तो मौत करून पुन्हा शिवनाथडीला येऊन स्मशानाकडं बघुन ढसाढसा रडला,हे फक्त मी पाहिलं होतं. यडा नव्हता तो लोकांनी त्याला येडं ठरवलं होतं...

नंतर मी शहराच्या आमच्या घरी राहायला येऊन गेलो.तसा त्याचा विसर पडला पण एकदा दोनदा गावात दिसला,मला बघुन मिस्किलपणे हसला कारण बाप गेल्यावर आम्ही बरंच दुखातुन सावरलो होतो आता याचा त्याला आनंद झाला होता...

एक दिवस सकाळी सकाळी शिवनातीरी असलेल्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात भेटला. बिडी ओढत होता मला बघुन बोलावलं अन् बोला पितोस का ? मी नकारार्थी मान हलवली अन् तो बोलता झाला लेकरु बापावर नाय गेलं. तुझा बाप माझा मित्र होता असा म्हणला अन् एक एक पाऊल मागे टाकत मागे सरल अन् जे पळत सुटला नंतर कधी नाही भेटला....

काही दिवसांपूर्वी समजलं भद्द झालेलं पिसाळलेल कुत्रं त्याला डसलं अन् तो मरुन गेला बस....एक माऊली गेली सोडुन असे वाटलं अन् डोळ्यातुन अश्रु अन् फक्त अश्रु....‌

- भारत लक्ष्मन सोनवणे.

Powered By Sangraha 9.0