पोटाची खळगी..!

12 Jun 2024 13:51:59


पोटाची खळगी..!

 

काल सहज पडत्या पाऊसाच्या धारा वाहून डबके साचलेल्या अन् गंध्या नाल्याचं, गटरातलं संडासाचे पाणी वाहणाऱ्या गल्ल्या फिरून झाल्या. अन् मग मी सहज प्रश्न करत फिरलो लोकांना की, मी लिहत असतो म्हणजे नेमकं काय करतो रे..!

तेव्हा लोकं बोलू लागले, आमच्या काळ्याकुट्ट पडलेल्या छात्या अन् पीळ पडलेल्या आतड्यांच्या पोटाचा प्रश्न तुझ्या लेखणीतून सुटला असावा. जेव्हा खळगीभर पोटासाठी आणि मिळणाऱ्या अन्नासाठी आमची माय, आमची इज्जत आम्ही भर आंदोलनात आम्हाला आमचा हक्क मिळावा म्हणून उघडी पाडली होती. तेव्हा दंगे झाले, आमच्या लोकांचे डोके फुटले. हापश्याखाली जेव्हा डोके धुवायला घेतले, तेव्हा पाणी नाही रक्त वहायला लागलं होतं.

मग सगळं शांततेत व्हावं म्हणून माझ्या वस्तीतून मला पुढं करण्यात आलं. मी चिटुरभर कागदावर काहीतरी चार-दोन अक्षरं आई बापाची भाड खाल्यागत लिहिली, खरडली. त्याला निवेदन असं नाव दिलं. दोन-चार दिवसात आमच्या अटी मंजूर झाल्या मोठ्या साहेबानं काही अर्ज फाट्यावर निवेदनं मंजूर झालं म्हणून माझ्या सह्या घेतल्या अन् आमचीच खोलून मारावी तसं आमच्या गावाला राशनचं दुकान उघडं झालं. अन् दोनात आठ किलो गहू, दोनात चार किलो तांदूळ आम्हाला फुक्कट मिळाला.

मग पुढे अश्याच समस्या निर्माण व्हायला लागल्या, कामधंदे मिळेनासे झाले. स्टोव्हचा भडका घेऊन जसं एखादी बाई जळून जाऊ लागली. अन् जसा तिचा जनाजा घेऊन लोकं शमशनात घेऊन गेले, तेव्हा जी पब्लिक उधळलीना तितकीच मग बेकारी वाढली. चौका-चौकात रोजंदारीचा,‌रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला.

कंत्राटी कामगार, रोजंदार कंपन्यात कमी अन् बाभळीच्या फसाटीत भर दुपारी दारू पिऊन पडून राहत असल्याचं एकाकी प्रमाण वाढलं. मग माझ्या बाहिणी त्यांच्या नागविलेल्या संसाराच्या गोष्टी, कथा घेऊन माझ्याकडे आल्या. तू जाणता आहे, चार लोकांत उठबस आहे, चार अक्षरं समजूतीची लिहतो मग तुझ्या या बेवड्या मेव्हन्यांना कामाला लाव, त्यांना न्याय मिळवून दे म्हणू लागल्या. मग मी पुन्हा औद्योगिक वसाहतीमध्ये माझी पोटाची खळगी भरण्यासाठी टीचभर पानावर लिहलेली पत्र फिरवली.

कामगारांना न्याय मिळाला असावा कदाचित असं वाटू लागलं. मला लोकांनी डोक्यावर घेतलं अन् मग पुन्हा गावात राशन, लोकांना कंत्राटी कामगार म्हणून का होईना माझ्या लेखणीतून रोजगार मिळाला.

जेव्हा मी असं प्रश्न करत शांता अव्वाच्या अंडाभुर्जीच्या टपरीवर अव्वाला हा प्रश्न केला, तेव्हा अव्वानं उत्तर दिलं भाडखाऊ भाऊ आहेस तू माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. मला काय तुझ्यासारखं दोन-चार अक्षरं वाचता-लिहता येत नाय, पण; तू या वसाहतीमधल्या बायकांना त्यांची झंपराची बटने अन् साड्या फेडण्यापासून वाचवलं रे..!

भूक वंगाळ अस्तीया, लई वंगाळ..! तुला वाटत असल माझ्याकडे दोन-चार गिऱ्हाईक माझ्या चवदार अंडाभुर्जीमुळे येत असतीला पण तसलं काय नाय रे..!

जिंदगी जगतांना माणसं पाहून म्या बी माझा पदर थोडा सैल केला, तुझ्यासारखी अव्वा म्हणणारी माझी माणसं जेव्हा आली तेव्हा तो सावरला. ती बोलत होती मी ऐकत होतो, सध्या जिंदगी झ्याट आहे पण तू असं दोन-चार ओळी लिहून गरिबांना न्याय देत राहशीला तर आंदोलनं उसळणार नाय. तुझी लेखणी आम्हा गोरगरिबांचा आवाज होईल. तेव्हा लेका तू लिहत रहा..!

कुंटणखान्यातील माय-लेक जसं लोकांच्या अन् त्यांच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकं दिवसाढवळ्या उरावर घेतात. तसं तू घेत रहावं तुझ्याच मड्यावर आमच्या झ्याट जिंदगीचे प्रॉब्लेम अन् लिहत रहावं चिटुरभर कागदावर निवदनं तुझ्या लेखणीतून. आणि मग साडी न फेडण्याचं सोल्युशन आम्हाला भेटत राहील.

मी काय बोलू अव्वाने दिलेल्या अंडा भूर्जीतला कापलेला, चिरलेला कांदा उभ्याने माणसं चिरावा तसा मला वाटला. मी तो नालीत टाकत अंडाभुर्जी खात होतो, नालीत किडे वळवळ करत होते. अन् डोक्यात पार अंधार पडला होता, गरीबांचा वाली व्हायला हवं अन् त्यांचं प्रतिनिधित्व करणारी आपली लेखणी व्हावी म्हणून लिहायला हवं, लिहायला हवं.

असं वाटून गेलं..!

 

भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0