रील ते रिअल

01 Jun 2024 12:00:00


रील ते रिअल


सोशल मिडीया आता मानवाच्या रोजच्या जगण्यातील एक आवश्यक घटक आहे. आपले विचार एकाच वेळी हजारो लोकांसमोर व्यक्त करण्याचे हे साधन आहे. अनेकजण आपले विचार मांडत असतात. काही जण साहित्य पोस्ट करतात, काही जण एखाद्या घटना व प्रसंगाविषयी आपले मत मांडत असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी सोशल मिडीयावर रोज पोस्ट होतात. वाॅट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे गेल्या दोन - चार वर्षात झपाट्याने प्रसिद्ध झाली. आज जवळपास प्रत्येकच व्यक्तीच्या मोबाईलमधे ही तीन ॲप आहेत. रोज कोणी एक तास, कोणी तीन - चार तास, तर कोणी दिवसभरही फेसबुक, इन्स्टाग्रामवर येणा-या पोस्ट, त्या पोस्टवरील प्रतिक्रिया बघतात. अगदी अलीकडच्या काळात या माध्यमांवरील रील्सचे प्रमाण वाढले आहे. एखादा विचार, विनोद, कविता, गायन, नृत्य असं काही अगदी दोन मिनिटात सादर करुन तो व्हिडिओ अपलोड करण्याची जणू एक स्पर्धाच निर्माण झाली आहे. रील हा प्रकार दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. पण हल्ली बातम्या, चालू घडामोडी यावरही रील पहायला मिळतात. यात माहितीपर विचार किंवा बातम्या कमी आणि प्रक्षोभक विधाने, धार्मिक तेढ निर्माण करणारी वाक्ये, अगदी दोन धर्मांची, देवांची तुलना या रीलमधून आणि छोट्या व्हिडिओतून होत असते. त्यावरील प्रतिक्रिया अत्यंत हीन दर्जाच्या असतात. त्यामुळे, एकंदरीतच तंत्रज्ञानाचा वापर मानवानी वैचारिक आणि उपयुक्त माहितीच्या देवाण - घेवाणीपेक्षा मनोरंजन, धार्मिक टीका, निरनिराळ्या घटना - प्रसंगातून समाजाच्या रागाचा अंत पाहणे याकरिताच अधिक केलेला दिसतो.

पृथ्वीवर झाडे, जीव - जंतु पशु - पक्षी, मानव हे सजीव घटक आहेत. इतर सजीव घटकांच्या तुलनेत ईश्वराने मानवाला विचार आणि बुद्धी यांचं दान अधिक दिलेलं आहे. पर्यावरणाच्या आधारे आपण अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवतो. पण आपल्या बुद्धीचा वापर विज्ञानाच्या सहाय्याने करुन मानवाने धरणे बांधली, इमारती बांधल्या. नवनवीन विचार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या सहाय्याने पवनचक्की, अधुनिक वीजनिर्मितीची साधने आपण निर्माण केली. म्हणजेच आपल्या विचाराच्या सहाय्याने आपण प्रगती साधली. या प्रगतीशील विचारांचा वापर आज दुर्दैवाने आपण एकमेकांची माथी भडकावणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, घडलेल्या घटनांविषयी शिवराळ भाषेत प्रतिक्रिया देणे याकरिता करत आहोत. आपल्याला विचार करण्याचा, विचार मांडण्याचा हक्क निश्चितच आहे. पण प्रत्येकच विचार सोशल मिडीयावर मांडण्याची गरज असते का, असाही एक नवा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या नकारात्मक पोस्टवर प्रत्येकच वेळी प्रतिक्रिया देण्यापेक्षा एखाद्या सकारात्मक व्हिडिओला आपण प्रतिसादही देऊ शकतो. मराठी माध्यम उत्तम का इंग्रजी माध्यम उत्तम यावर वैचारिक मते मांडण्याऐवजी त्याची स्पर्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण लावली आहे. आपल्या पाल्याचा कल कुठे आहे हे जाणून घेत समुपदेशक, अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्ती यांचे प्रत्यक्ष सल्ले घेण्याऐवजी वाॅट्सअप वरील पोस्ट, या विषयावरील एखाद्या व्हिडिओच्या खाली काॅमेंट बाॅक्समधे स्वघोषित तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्या पाल्याचे माध्यम आपण ठरवले तर पदवीधर असूनही आपण निरक्षर आहोत, हे मान्य केले पाहिजे ! धर्म हा मुळातच मनापासून स्वीकारण्याचा घटक आहे. दुस-या धर्मियांनी आपल्या धर्मावर टीका केली म्हणून तो बुडायला धर्म इतका कमकुवत नाही. तसेच, दुस-या धर्मावर टीका केली तरच आपला धर्म टिकायला धर्म काही कमकुवत नाही. धर्म ही श्रद्धेशी निगडित भावना असल्यामुळे कुठल्याही प्रक्षोभक धार्मिक पोस्टचा आपल्या श्रद्धेवर परिणाम होऊ न देणे हाच खरा धर्म आहे.

एक तासाच्या मुलाखतीतील दोन मिनिटांच्या भागाची रील बघून मुलाखत देणा
या मान्यवर व्यक्तीचे विचार आपल्याला जाणून घेणे अशक्य आहे. सोशल मिडीयावर मांडत असलेल्या विचारात समाजाच्या प्रगतीचा समावेश असायला हवा. माणसाला आयुष्य नावाची सर्वांगसुंदर देणगी मिळाली आहे. विचार हा त्या आयुष्याचा सूर्य आहे. सूर्याची उगवती दिशा पूर्व आणि मावळती पश्चिम असते. त्यामुळे आपले विचार हे पूर्व म्हणजेच योग्य दिशेला उगवणे गरजेचे आहे. आपला विचार पटवून देण्यासाठी दक्षिणेला पूर्व म्हणणे हे सोशल मिडीयाला अभिप्रेत नाही. सोशल मिडीयाला अपेक्षित आहे मानवांची वैचारिक देवाण - घेवाण ! आपला विचार एखाद्या चित्रातून, एखाद्या कथा - कवितेतून कोणाच्याही सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मूल्याला बाधा येणार नाही असा मांडला तर त्यातून समाजाला आनंद मिळेल, नवी दिशा मिळेल. काही रीलमधे एखाद्या प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती दिलेली असते. काही रीलमधे खाद्यपदार्थांची झटपट कृती असते. त्या प्रेक्षणीय स्थळाची माहिती म्हणजे 'रील' बघून त्या स्थळांना भेटी देणं हे 'रिअल' आहे. झटपट कृती असलेला पदार्थाची 'रील' पाहून पटपट तो पदार्थ करणे हे 'रिअल' आहे. थोडक्यात काय, तर 'रिअल' कडे छानपैकी प्रवास होईल अशा 'रील' पहायच्या आणि आनंदी रहायचं..

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0