अजून काही करता येईल का..? नवीन कुठला मार्ग अवलंबता येईल पैसे उभे करण्यासाठी हा विचार प्रवीणचे मित्र करू लागले होते. अन् मग काही गरीब लोकांच्या आर्थिक मदतीसाठी काम करणाऱ्या संस्थांना भेट द्यायची मित्रांनी ठरवलं. पण; यासाठी कुण्या सामाजिक कार्यकर्त्याची त्यांच्याशी ओळख त्यांना हवी होती.
मग तालुक्याच्या गावाला असलेल्या त्यांच्या मित्राचा म्हणजे विशालचा विषय निघाला. विशाल हा ही गरिबीची झळ सोसत परिस्थितीशी दोन हात करत जगत असलेला मित्र. पण; त्याला गरिबांची दुःख सहज कळत होती. आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं म्हणून तो एका त्याने स्वतः उभारलेल्या फाऊंडेशन मार्फत काम करू लागला होता.
बरीच मित्र त्याने या फाऊंडेशनमध्ये जोडली होती. अन् ही सगळी मित्र रक्तदान शिबिर, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करणे असो, किंवा वृक्षरोपण, अपंगांना होईल ती मदत सढळ हाताने करत होती.
तर उद्या विशालला प्रवीणबद्दल सांगायचं प्रवीणच्या मित्रांनी ठरवलं अन् विशाल जसं उपाय सांगेल तसं करायचं असं मावडी अन् तिच्या आईला विश्वासात घेऊन प्रवीणच्या मित्रांनी समजावले. पहाट झाली प्रवीणचे सर्व मित्र प्रवीणला दिलासा देण्यासाठी त्याच्या घरी आले होते. त्यांनी रात्रीच विशालला प्रवीणसाठी काहीतरी मदत करायला हवी आहे असं सुचवलं. त्यासाठी विशाल आज सकाळीच प्रवीणच्या भेटीसाठी येणार होता.
विशाल म्हणजे एका गरीब घरातून आलेला पण समाजसेवेचं वेड असलेला तरुण. थोडाफार कमावता झाला तसा तो समाजात आपल्या माध्यमातून आपण कशी सढळ हाताने मदत करू यासाठी तो प्रयत्नरत असायचा. अन् त्याच्या या कार्यात त्याने अनेक मित्रांना सामावून घेतलं होतं अन् या मित्रांच्यामध्ये बहुतेक सर्व गरीब मुलं होते. दिवसभर लोकांच्या इथे कुणी शेतात काम करायचं, कुणी बिगारी काम करायचं, कुणी मिस्तरीच्या हाताखाली काम करायचं. अन् मग हफ्ताभर काम करून जो पैसा जमा होत असायचा त्यातील काही पैसा ही मुलं समाजात काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत राहण्यासाठी वापरत असायची.
जसे की रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम असो, वृक्षरोपण, गरीब लोकांना एकवेळ जेवण देणे असो किंवा हिवाळ्यात कपडे वाटप करणं असो असे सगळे काम अन् समाजकार्य ही मुलं विशालच्या सोबतीने करत असत.
सकाळ झाली अन् प्रवीणचे मित्र प्रवीणच्या घरी आली. ठरल्याप्रमाणे विशालही प्रवीणला भेटायला आला मावडी अन् आई प्रवीण विशालशी बोलले त्यांची सर्व वाईट परिस्थिती विशालने बघितली. त्याच्या मित्रांनी अन् विशालने प्रवीणला या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी मदत करायचं ठरवलं. यावेळी त्यांच्या सोबतीने आजवर मैत्रीचा आधार दिलेले त्याचे मित्रही सोबत होतो.
विशाल आपल्या भावाच्या उपचारासाठी पैश्यांची तजवीज करणार म्हणून मावडी पण आता थोडी निर्धास्त झाली होती अन् आई पण सगळं छान होईल असा विचार करत होती. विशालने प्रवीणला त्याच्या उपचारासाठी कसे पैसे उभे करायचे ते सांगितलं अन् सगळे मित्र कामाला लागले.
त्यावेळी विशाल अन् त्याच्या मित्रांनी जे काही थोडेफार पैसे आपल्या कामातून सामाजिक कार्यासाठी मागे पाडून ठेवले होते ते प्रवीणच्या आईला दिले अन् त्यांचा घरखर्च यातून करण्याचे प्रवीणला सुचवले. विशाल अन् त्याच्या मित्रांच्या माध्यमातून प्रवीणला झालेली ही मदत बघून आई अन् मावडीला राहवले नाही अन् त्यांच्या डोळ्यात आसवे तरळली.
आता सर्व छान होईल अन् प्रवीणच्या उपचारासाठी आम्ही सर्व पैसा उभे करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन विशालने प्रवीण आणि त्याची आई व मावडीला दिले. विशालने पैसे कसे उभे करायचे त्यासाठी काही रणनीती आखली अन् त्यानुसार सर्व मित्र कामाला लागले .
या सगळ्यात प्रवीणचे मित्रही त्यांना साथ देत होते अन् शहरात काही सार्वजनिक ठिकाणी मित्रांनी प्रवीणच्या मदतीसाठी काही पॉम्पलेट लावले गेले अन् समाजात रुग्णसेवेचं फळ पदरी पाडून घेणाऱ्या व्यक्तींना प्रवीणचे मित्र आव्हान करू लागले. अश्या विविध प्रकारे प्रवीणच्या उपचारार्थ मदत निधी उभा राहू लागला होता.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.