गरज आणि उपभोगाची साधने..

04 May 2024 15:50:34


गरज आणि उपभोगाची साधने..

दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज आधी संपते तो तुम्हाला सोडून जातो." ही वपुंनी केलेली आयुष्याची व्याख्या. ही व्याख्या सार्थ आहे. पण अलीकडच्या काळात आयुष्य आणि गरज यातील अंतर अगदी जवळ येतंय. वाढती स्पर्धा हे त्याचं कारण असलं तरी उपभोगवादाशी त्याचा संबंध आहे. गरज या शब्दाचा अर्थ अलीकडच्या काळात बदललेला दिसतो. गरजेचं रुपांतर उपभोगात होत आहे. जागतिकीकरणाचा परिणाम विकसित प्रदेशांपेक्षा विकसनशील प्रदेशात अधिक झाला. त्यातूनच राहणीमानाचा दर्जा ही संकल्पना उदयास आली. या संकल्पनेचा अर्थ दुर्दैवाने आपण 'चांगले असणे ' याऐवजी 'चांगले दिसणे' असाच काहीसा घेतला आहे. शिक्षण, पैसा, सुसंस्कृतपणा, काळानुरुप विचार या सर्वांचा एकत्रितपणे उल्लेख राहणीमानाच्या दर्जातील प्रगती असा करता येईल. पण राहणीमानाचा दर्जा या शब्दाचा उल्लेख श्रीमंत असा केला जातो. त्यातूनच उपभोगवादाचा जन्म झाला.


आपल्या शेजारच्या घरी आपल्यापेक्षा एखादी वस्तू अधिक असते. ती वस्तू आधुनिक असेल तर त्याचं आपल्याला आकर्षण वाटतं. ती वस्तू आपल्याकडे पण असली पाहिजे, असं आपल्याला वाटू लागतं. ती वस्तू घेण्यासाठी आपण धडपड करायला लागतो. दुकानदार तोंडाला येईल ती किंमत सांगतो. मग आपण योग्य भाव करतो आणि कुठूनतरी पैसा उभा करुन ती वस्तू आपण विकत आणतो. नंतर आपल्या कानावर येतं की, ती वस्तू आपल्या शेजा-याला त्याच्या आप्तेष्टांनी भेट दिली आहे. पण आपण अजूनच सुखावतो. पैसा उभा करुन ती वस्तू आपण आणल्यामुळे त्या शेजा-यापेक्षा आपण एक पाऊल कसे पुढे आहोत, हे जगाला सांगत सुटतो. राहणीमानाचा दर्जा उंचावला याचं आपल्याला समाधान वाटतं. पण या सगळ्यात त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज होती का, हा साधा सोपा विचार आपण सुशिक्षित असूनही करत नाही! किंबहुना, त्या वस्तूची आपल्याला गरज नसते. पण जगातल्या प्रत्येक वस्तूचा वापर केला अर्थात मी उपभोग घेतला याचं आपल्याला समाधान वाटतं. पैसा उभा करताना आपल्याला त्रास झालेला असतो. कदाचित, कर्ज काढावं लागलेलं असतं. पण कर्ज काढणे ही अलीकडच्या काळातील एक महत्वाची गोष्ट झाली आहे. कर्ज आणि गरज यांचं साधं सोपं नातं तोडून कर्ज आणि उपभोग असं नवं नातं जोडतो. विचार करणे, विचारातून गरज शोधणे आणि गरजेतून नवीन वस्तू घेणे हा क्रम हल्ली नकोसा झाला आहे. अनुकरण नावाची डोळ्यावरची पट्टी आपल्याला उपभोगवादाकडे घेऊन जाते. अनुकरणही आपण फक्त पैसा, वस्तू यांचं करतो. शिक्षण, विचार यांचं अनुकरण आपल्याला करावंसं वाटत नाही. कारण, पैसा आणि वस्तू दिसतात. विचार अदृश्य असतात. दिसणे आणि असणे यांच समतोल न साधता आपण 'दिसणे' निवडतो. इथे उपभोगवाद जिंकतो.


शनिवार आणि रविवार हे दिवस आपण पार्टीसाठी ठेवलेले आहेत. तिथे दारु पिणे हे राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक आहे. निर्व्यसनी व्यक्ती ही त्या पार्टीत हमखास बावळट ठरते. महाविद्यालयीन युवकात हल्ली गुटखा खाणारी, मद्यपान करणारी , गांजा ओढणारी मुले व मुली सर्वोत्तम मानली जातात. याचा परिणाम म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रे भरलेली आहेत. आपला पाल्य छान रहावा याकरिता हजारो रुपये पाॅकेटमनी देणारे पालक पुढे आपला पाल्य व्यसनी झाल्याचं खापर सरकारी यंत्रणांवर फोडतात. शासनाने महाविद्यालय परिसरात गुटखा विक्रीस बंदी करावी म्हणून कित्येक आंदोलने होतात. पण आंदोलनकर्त्यांपैकी एकालाही हजार रुपये पाॅकेटमनीच्या खर्चाचा हिशेब पालकांनी आपल्या पाल्यांना विचारावा यासाठी आंदोलन करावेसे वाटत नाही. चुकांचे खापर फोडण्यासाठी आपण दगड शोधतो. इथे उपभोगवाद जिंकतो!


आपलं शरीर देखील गरजेपेक्षा अधिक काही मागत नाही. एखाद्या दिवशी आवडता पदार्थ जेवणात असतो. पोट भरलेलं असलं तरी न थांबता आपण तो पदार्थ खातच राहतो. गरजेपेक्षा अधिक अन्न पोटात गेलं की अपचन होतं. आवड आणि भावना या गोष्टींना निश्चितच महत्व आहे. आवडीप्रमाणे आपण खरेदी केलीच पाहिजे. पण गरज आणि आवड यांचा आपल्याला मेळ साधता यायला हवा. हरवलेल्या सद्सद्विवेकबुद्धीला आपण नव्याने शोधलं पाहिजे. फुलाचा दरवळ दूरवर जाण्यासाठी पाकळी-पाकळी उमलून त्यात चैतन्य भरावं लागतं. हे पाकळी-पाकळीतलं चैतन्य आपण जेव्हा मिळवू तेव्हा आपल्या यशाचा दरवळ दूरवर निश्चितच पसरेल. यासाठी उपभोगवादावर सद्सद्विवेकबुद्धीने मात आपल्याला करता येईल.. तुमच्या-माझ्या मनातल्या चैतन्याच्या गाभा-यात असलेल्या विचार नावाच्या ईश्वराचं नाव दानव होण्यापूर्वीच पावलं उचालयला हवीत...


- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0