समाधान..

14 May 2024 15:18:35


समाधान...

सुखापेक्षाही माणसाला किंवा या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाला समाधान हवं असतं. शिक्षण, नोकरी, विवाह, मूल होणं, पैसा मिळणं, घर घेण्याचं किंवा काहीतरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणं या आणि अशा काही बाबींमुळे माणसाला समाधान मिळतं. समाधान ही सुखामागून येणारी अवस्था असली तरी दु:खानंतरही काही वेळा समाधान वाटतं. ते म्हणजे असं की, समजा घरी चोरी झाली पण किमती वस्तू बँकेच्या लाॅकरमधे होत्या; किंवा अपघात झाला पण हातावर जीव निभावला.. दु:खानंतरचं हे समाधान म्हणजे वाईटातून चांगलं शोधणं! समाधान कृतीतून व्यक्त होतं. आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण मनापासून हसतो. हे हसणं म्हणजेच समाधान आहे. समाधान काही पैशाने विकत घेता येत नाही किंवा आपल्याकडे असलेलं समाधान विकताही येत नाही. ते मिळवावंच लागतं. म्हणूनच त्याची किंमत अधिक असते. हे झालं भौतिक समाधान.. काही जणांना देवाचं दर्शन लवकर मिळतं, एखादं भजन किंवा स्तोत्र अपेक्षेपेक्षा लवकर शिकल्यावर किंवा अगदी एखादं गणित जमलं तरी विद्यार्थ्यांना आणि ते शिकवणा-या शिक्षकाला समाधान वाटतं. एखादी व्यक्ती आपलं नाव गुलदस्त्यात ठेवून कुणा आश्रमाला देणगी देते. त्या देणगीचा मुलांना शैक्षणिक साहित्य आणायला उपयोग होतो आणि ती मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला जे समाधान मिळतं, ते ख-या अर्थाने मिळणारं समाधान असतं. दुस-या व्यक्तीसाठी काही करावंसं वाटणं, त्यामुळे ती व्यक्ती यशस्वी होणं आणि त्या यशाचं आपल्याला समाधान वाटणं हे शरीराबरोबर ख-या अर्थाने मनही जिवंत असल्याचं लक्षण आहे. भौतिक समाधान किंवा मिळणारं समाधान हे संस्कार, स्वभाव आणि मनातील निरनिराळ्या भाव-भावनांवर अवलंबून असतं. हे झालं भौतिक किंवा मिळणारं समाधान! पण याहूनही एक समाधान असतं आणि ते म्हणजे मानण्यातलं समाधान.. खरंतर समाधान मानण्याशीच निगडित आहे. भौतिक समाधान प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. पण जे मिळालंय त्यात समाधानी असणं हा आयुष्यातला सुखी राहण्याचा सोपा मार्ग आहे.

दात नसलेल्या तोंडातून एखादा जुन्या पिंपळासारखा वाटणारा म्हातारा आपल्या आयुष्याचं आणि समाधानाचं तत्वज्ञान सांगतो तेव्हा ते आभाळाइतकं खरं असतं. एक किंवा दोन खोल्यात (ती खोली देखील बरेचदा पूर्वी वाड्यात भाड्याने घेतलेली...) आठ-दहा जणांचा संसार त्या म्हाता-याने केलेला असतो. "आता हे पिझ्झा-टिझ्झा आलंय.. नाहीतर आमच्या वेळी मधल्या वेळच्या भूकेला माझी बायको आमच्या पोरांना चुरमुरे भाजून द्यायची... ते गरमगरम चुरमुरे खाल्ल्यावर भूक भागायची ते आता तुझा पिझ्झा खाऊन भागत नाही.." वगैरे सांगताना काटकसरीत जीवन जगलो याचं समाधान त्याच्या चेह-यावर दिसतं... आपल्याकडे पिझ्झा नसला तरी गरमगरम चुरमुरे आपण भाजून खाऊ शकतो. थोडक्यात, आपली भूक भागवू शकतो, असं त्या माणसाला आपल्याला सुचवायचं असतं. शेजारच्याचा किंवा अगदी सख्ख्या भावाचा पगार आपल्याला आपल्यापेक्षा कायम जास्तच वाटत असतो. पण आपल्यालाही पगार मिळतो आणि जो मिळतो तो गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे , असं म्हणणारा म्हणजेच समाधान मानणारा माणूस त्या जास्त पगार मिळणा-यापेक्षा अधिक सुखी असतो. समाधान मानणे हे म्हटले तर अवघड आहे, म्हटले तर सोपे आहे. अवघड अशासाठी की, तुलना करणे आपल्याला सोडता येत नाही. समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा अधिक मिळालेलं सुख आपल्याला पाहवत नाही... पण त्यातूनही आपण थोडंसं सोपं बघावं. आपल्या क्षमता, कुवत स्वतःला ओळखता आली तर समाधान मानणे सोपे होईल. एखाद्या माणसाची क्षमता सहा तास काम करण्याची असेल तर त्याला सहाशे रुपये, तर एखाद्याची आठ तास काम करण्याची क्षमता असेल तर त्याला आठशे रुपये मोबदला मिळेल आणि ज्याला आठशे रुपये मोबदला मिळेल त्याची कुवत सहाशे रुपयांपेक्षा अधिकच असणार! त्यामुळे तुलना, कुवत, क्षमता या संकल्पनेतून समाधानाचा विचार करणं आवश्यक आहे.

पण काहीवेळा हे समाधान मानणं माणसाला निष्क्रिय करत असतं. त्यामुळे समाधान मानणे, या गोष्टीलाही मर्यादा हवी. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुणाची भूक चुरमु-याची असते, तर कुणाची पिझ्झा खाण्याची... पण भूक असते म्हणून माणूस खाऊ शकतो. भूकच लागत नाही याचं समाधान मानणं हे योग्य ठरणार नाही. तसेच, प्रश्न आहे म्हणून उत्तराचं समाधान आहे. प्रश्नच पडत नसतील तर उत्तराचं समाधान मिळणार नाही. त्यामुळे प्रश्नच पडत नसतील तर आपण जे मानतोय त्याला आयुष्याचं समाधान म्हणता येईल का, आयुष्याची निष्क्रियता म्हणता येईल, याचा प्रत्येकानी विचार करायला हवा. पण हा विचार न करता आपण तुलना करतो आणि समाधान नावाची साधी-सोपी संकल्पना आपण गमावून बसतो. समाधानात दडलेलं समाधान आपल्याला शोधायचं आहे. आयुष्य आणि समाधान यांचा सुवर्णमध्य साधता आला तर, समाधानातलंही समाधान आपल्याला नक्की मिळेल...

-
गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0