लावण्य भक्ती

28 Apr 2024 07:01:30

लावण्य भक्ती


देहलावण्याला पडलेलं आपल्या अटळ क्षणभंगुरतेचं स्वप्न आणि त्यातूनच जागून आलेली सावळ्या सुंदराची गाढ अनिवार तहान म्हणजे कान्होपात्रा. एका गणिकेची लावण्यवती मुलगी आपल्या देहाचं आकर्षण तर सोडूनच पण देहभानचा कठिण उंबरठाही ओलांडून विठ्ठलाची श्रेष्ठ भक्त होते हे किती असामान्य आहे! जात, वर्ण, वंश या कशालाच भक्तीमार्गात स्थान नाही याची उदाहरणं वारकरी संप्रदायात ठायीठायी मिळतात. पण कुणालाही अचंबा वाटेल असं लोकविलक्षण उदाहरण म्हणजे संत कान्होपात्रा. स्वतःच्या आईचाही विरोध पत्करून विठू-मार्गावर हरवून गेलेल्या कान्होपात्रामेचा प्रवास घरातूनच किती अवघड होता! विठ्ठल नामात हरवून गेली असली तरी समाजाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल हे वेगळं सांगायला नको. पण अर्थात, कान्होपात्रामेची दृष्टी विठ्ठलाशी एकरूप झालेली असताना इतरांच्या विकारी डोळ्यांचा फरक पडणार होता तिला? पण संत मंडळींत मात्र कान्होपात्रेला कुठलाही विरोध न होता सहजी स्थान मिळावं ही परंपरेची उदात्तता आहे. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' याचा हा समाजसंजीवक प्रत्यय या भूमीने अनुभवला आहे. समानतेचा मूलमंत्र आध्यात्मिक लोकशाहीच्या माध्यमातून माउलींपासून इथे नांदत आला आहे. कान्होपात्रेने व्यक्त केलेला आध्यात्मिक अनुभव, विठ्ठल गुणवर्णन, भक्तीचं आणि नामाचं माधुर्य आर्त आहेच, पण सोबतच 'नको देवराया अंत आता पाहू' ही तिची याचना देखील तितकीच करुणार्त आणि हृदयद्रावक आहे. पण अर्थातच, शोकांत नाही! तिच्या विठ्ठलाला 'करुणा येऊ दे कांही' हे विनवणारा अभंगही असाच आहे. आयुष्यातील 'त्या'च्या हवेपणाची तहान आणि त्यामागे जाणवणारी त्या त्या क्षणांची क्रूर झळ यातून खुणावत राहते. अशाच प्रेमाच्याही कळकळीने त्यांनी विठ्ठलाच वर्णन केलेलं आहे. सर्वच संतांनी विठ्ठलाच वर्णन अमर्याद भावमयतेने केलेलं आहे. पूर्वसुरींचे वर्णनाचे अभंग माहीत असूनही केलेलं आहे. कारण देव एकच असला तरी प्रत्येकाची दृष्टी, प्रत्येकाचा अनुभव, त्यातून प्रतीत झालेलं त्याचं सहजलावण्य संतांनी सहज स्फुर्तीने आणि लोभस प्रेमाने व्यक्त केलेलं आहे. प्रत्येकाने म्हणूनच या अथांगाटा थांग आपल्या अभंगांतून घेतलेला आहे. असाच कान्होपात्रेचा एक अभंग..

विठू दीनांचा दयाळ ।

वागवी दासाची कळकळ ।।१।।

विठ्ठल हा दीनांचा दयाळ आहे. दासाची कळकळ तो स्वतः अनुभवत असतो. कान्होपात्रेचे जन्मसंदर्भ बघता, ती दीन होती यात संशय नाही. पण त्याने तरीही तिच्यावर दया केली, तिची कळकळ स्वतः वाहून नेली. हा स्वानुभवाचाच तर उद्गार आहे! मानसिक, शारीरिक, सामाजिक सगळ्याच स्तरांवरील कळकळ तिचा विठू कौतुके वागवतो आहे. म्हणूनच अनुभवातून आलेलं हे विठू वर्णन.

देव कृपावंत मोठा ।

उणें पडों नेदी तोटा ।।२।।

म्हणूनच तो मोठा कृपावंत आहे. त्याची कृपा अशी क्षणाक्षणाला प्रत्ययाला येणारी, त्याच्यासारखी सगुण होणारी आहे. अशा देवाची भक्त होणं ही बहुतां सुकृतांची जोडीच आहे. हा कृपा करतो म्हणजे काय करतो, तर रक्षण करतोच पण कमी पडू देत नाही, तोटा होऊ देत नाही. पण त्याच्या कृपेसाठी सुद्धा किती ज्वलंत कळकळ सोसली आहे कान्होपात्रेने! इतकी वेगळी वाट चालून गंतव्यासाठी स्वतः तावून सुलाखून निघून मग ती लिहीत आहे या गाभाऱ्यातले उजेड. अर्थात, वाटेवर वाटलेले उणे, तोटे सगळ्याचे अन्वयही नंतरच कळले असणार! वाटेवरच्या आपल्या श्रद्धा ढासळू नयेत म्हणूनच तर लिहिलं नसेल ना, हे त्याच्या कृपेच आश्वासन?

देव भक्तांचा अभिमानी ।

वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।

हे विधान किती महत्त्वाचं आहे! भक्तांना स्तिमित करुन आनंददायी ठरणारं आहे. भक्तांना देवाचा आधार असतोच, त्याची कृपाही हवीच असते. ते शरणागत सुद्धा असतात. हा देव आपला आहे याचा सार्थ अभिमानही त्यांना असतो. पण कान्होपात्रा म्हणते की देव भक्तांचा अभिमानी आहे. त्यालाही भक्तांचा अभिमान आहे! तो माता पिता आहेच, त्यानुसारच जसा आई वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान असावा तसा त्यालाही आहे! त्याच्या दृष्टीत असणारं भक्तांबद्दलचं प्रेम आणि आदर केवळ तीन शब्दांत कान्होपात्रा सांगते! असा हा देव म्हणूनच भक्तांची सकळ चिंता अखंड वाहत असतो.

तो इतकं सगळं करतो म्हटल्यावर त्याला द्यावं तरी काय? कणभर तरी उतराई होण्यासाठी आपल्याकडे काही आहे? असा स्वाभाविक प्रश्न पडला असावा कान्होपात्रेला. पण उतरही तिला ठाऊक आहेच. कारण, 'तुझीं वर्में आम्हां ठावीं' हा तिचाच प्रेमपूर्वक दावा आहे!!

देव भावाचा भुकेला ।

कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।

विठ्ठल भुकेला आहे तो भावभक्तीचा. हे ऐकून, किंबहुना या विठ्ठलाच वर्णन करून, या विठ्ठलाला इष्ट मानून कान्होपात्रेला आनंद झाला आहे. हा आनंद किती? तर जन्मानंतरीचे सुकृत फळाला आल्यामुळे हे विठ्ठल चरण पाहता आले असं तिने म्हटलेलं आहे. हा आनंद अर्थातच, या देहासोबत संपू द्यायचा नाहीय तिला. म्हणूनच कान्होपात्रेने आपल्या अभंगांतून पुन्हा गर्भवास मागितलेला दिसतो. या जन्मात कोणत्याही कुळात, बंधनात जन्माला आली असली, तरी विठ्ठलचरण देखिल्याचा आनंद मिळालेला आहे. पण इथेही न थांबता 'जन्मोजन्मीं देखेन विठ्ठलचरण' हा कान्होपात्रेचा विश्वास आहे. हाती नसलेल्या जन्मापेक्षा, हाती असलेल्या कर्माला दिलेलं महत्व, आणि त्यातून आर्त जिद्दीने साधलेलं साध्य.. ही कान्होपात्रेच्या अभंग चरित्रातून कुठल्याही क्षेत्रातील कुणालाही मिळणारी संजीवक प्रेरणा आहे.

कान्होपात्रा नावाच्या अक्षय प्रेरणेचं हे नमनपूर्वक स्मरण!

 

~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0