परंतू यासाठी येणारा खर्च खूप होता अन् प्रवीणची माय अन् मावडी लोकांच्या इथे कामाला जाऊन हा सर्व खर्च करू शकणार नव्हती. कारण कामाला जायचं तर रोजंदारीवर शेतात फार अशी कामं नव्हती. त्यात यंदाच्या सालाला दुष्काळ असल्यानं त्यात अजून भर पडली होती अन् सामान्य माणसांचं जगणं "आगीतून फुफाट्यात जाऊन पडावं" तसं झालं होतं.
यात आता मावडी अन् तिची दुखेरी माय यांच्यावर प्रवीणच्या उपचाराचा खर्च सुरू झाला होता. खाजगी रुग्णालयात खूप पैसा लागत असल्यानं अन् आता तो खर्च पेलवत नसल्यानं प्रवीणचा उपचार आता तालुक्याला असलेल्या सरकारी रुग्णालयात सुरू झाला होता. परंतु तिथं असलेला सुविधांचा अभाव अन् होणारी गैरसोय यामुळे प्रवीणच्या शरीराची अजून हेळना होत होती. त्याला मिळत असलेले उपचार त्याच्या शरीराला लागू पडत नव्हते अन्; यामुळं प्रवीणची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याचा दुःखेरी पाय काटकीसारखा बारीक बारीक पडत होता अन् आता तर त्या पायात त्रानही उरला नव्हता.
प्रवीणला रुग्णालयात भेटायला येणारे गावातील लोकं, प्रवीणचे मित्र प्रवीणची ही अवस्था बघून निःशब्द होऊन जायचे. त्यांना प्रवीण व मावडी अन् आईचे कोणत्या शब्दात सांत्वन करावे हे नाही कळायचं. कारण एकूण प्रवीणच्या आयुष्यात आलेलं हे खूप मोठं संकट त्याला आयुष्यातून उठून जायला भाग पाडत होते. परंतु प्रवीण या वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होता.
त्याचे मित्र जेव्हा त्याला दवाखान्यात भेटायला यायची तेव्हा त्यांचं पोलीस भरतीच्या तयारीसाठी सुरू असलेले प्रयत्न बघून त्याला आपलं पोलीस भरतीचे भंग स्वप्न आठवू लागायचे अन् मग तो त्याच विचारांनी खचून जायचा. कधीतरी आपल्याला आयुष्यभर अपंगत्व आल्यास काय..? हा प्रश्न त्याला खूप सतवत रहायचा अन् प्रवीण हा विचार करून करून आसवं ढाळत बसायचा.
परिस्थितीसुद्धा तशीच झाली होती काहीही बदल अन् काही ठीक होईल असं प्रवीणच्या आयुष्यात होतांना दिसत नव्हते. अलीकडे उपचारांनी थोडीफार बरी झालेली प्रवीणची आई प्रवीणच्या अपघातानंतर पुन्हा तब्येतीने अजूनच खालावत चालली होती. सोबत तिच्यात असलेला भोळसटपणा अजून दिवसेंदिवस वाढत चालला होता, जे खूप दुःखद होते. त्यात आता प्रवीणच्या आईलासुद्धा प्रवीणच्या दुखण्याने घेतलेल्या धास्तीने दवाखन्याच्या चकरा सुरू झाल्या होत्या.
सरकारी दवाखाना म्हंटले तरीही थोडाफार पैसा लागत होता. घरातील दोन्ही कर्ते माणसं आजरपणात अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असल्यानं आता घरातील कामाची सर्व जबाबदारी मावडीवर आलेली होती. ऐन तारुण्यात असलेली अन् लग्नाच्या उंबरठयावर उभी असलेली मावडी आता मात्र लोकांच्या इथे रोजाने रोजंदारीवर काम करत होती, लोकांचे बांध खुरपत होती.
लोकांच्या या तिच्या वाईट काळातही तिच्यावर असलेल्या वाईट नजरा खालावत नव्हत्या. परंतु मावडी या वाईट लोकांच्या सगळ्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करत आपलं कामाशी काम करत आपल्या आई अन् भावाच्या उपचारासाठी चार पैसे जोडत होती. हळूहळू उपचाराने अन् मावडीच्या दिलाश्याने मावडीची आई पुन्हा आता पूर्ववत होत होती अन् हळूहळू ती ही मावडीसोबत संसाराला हातभार लागावा म्हणून पुन्हा एकदा मावडीसोबत काम करायला म्हणून लोकांच्या वावरात खपू लागली होती.
या काळात पदरच्या जमून ठेवलेल्या काही पैश्यात प्रवीणचे पहिले ऑपरेशन पार पडले होते. प्रवीणच्या हालचाली हळूहळू वाढल्या होत्या पण; अजून दोन ऑपरेशन करायचे अन् त्यासाठी येणारा खर्च खूप होतो. तो कसा करायचा हा प्रश्न आता मावडी अन् तिच्या आईला सतावत होता.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.