मावडी..! भाग- ३

19 Mar 2024 18:25:08
 
मावडी..! भाग- ३
मावडी..! भाग- ३
   सूर्य अस्ताला गेला तसं प्रवीण अन् त्याची माय लहानग्या बहिणीला घेऊन मांगखेडा या गावी पोहचले. दुष्काळ असल्यानं प्रवीण अन् त्याच्या मायच असं गावात येणं काही वेगळं वाटावं असं गावकऱ्यांना काहीही वाटत नव्हतं. कारण पंचक्रोशीतील सभोवतालच्या अनेक गावांची लोकं मांगखेडा या गावी दुष्काळात पोटाला आधार म्हणून कामाला आली होती.
   मांगखेडा या गावाला समृध्द लोकांची परंपरा होती. गावाने आपल्या राज्याला चांगली मंडळी दिली होती, त्यामुळं गावात विकास कामाच्या योजना अन् त्यांना लागून असलेल्या कामांची कमतरता नव्हती. त्यात गावाला खेटून फॉरेस्टी असल्यानं फॉरेस्टीमध्येही  कित्येक कामं बारा महिने चालायची. नालाबंडींग, पाठ बांधणी असो की रानाच्या वाटा करून घेणं असो अशी सगळी कामं मांगखेडा या गावी चालू होते. त्यामुळे गावात कामाला तोटा नव्हता, गावची अन् शेजारील दोन-चार गावांची अशी दोन-एकशे लोकं इथे पोट भरीत होती.
   प्रवीण अन् त्याची माय मावडीला घेऊन वेशीला आली, तेव्हा गावच्या खालच्या अंगाला टाकलेल्या झोपड्यांमध्ये ढनाढना चुल्ही पेटल्या होत्या, अन् त्यावर भाकरी थापण्याचा आवाज दूरपर्यंत येत होता. अंधार सरला तसं लोकं भाकरी खाऊन पारावर गप्पा झोडायला आली, तेव्हा प्रवीण अन् त्याच्या माय, बहिणीला पाहून लोकांनी त्यांची विचारपूस केली.
   कळपातून हरवलेल्या एखाद्या मेंढरास पुन्हा मेंढ्यानी कळपात घ्यावं तसं गावकऱ्यांनी, बाहेरून पोट भरायला आलेल्या लोकांनी तिघांना वस्तीला घेतलं. रात्रीचं जे काही थोडफार जेवून खाऊन उरलं होतं ते त्यांच्या समोर वाढून दिलं अन् लोकांनी त्यांची विचारपूस केली. त्यांची एकूणच अवस्था बघून आश्रयाला असलेल्या लोकांनी त्यांच्या मुकादमशी बोलून कामाचं हो करून घेतलं अन् राहण्यासाठी त्यांना आसरा दिला.
   त्या दिवशीची अवघड रात्र प्रवीण अन् त्याच्याभोळ्या आईसाठी खूप मोठी होती. हळूहळू रात्र सरली अन् मग हळूहळू लोकांच्या विसाव्याला राहून असा महीनाही कधी सरला त्यांना कळलं नाही. हळूहळू त्यांची कोपी त्यांनी बांधून घेतली होती अन् त्यांचं काम करून ती राहू लागली होती. एकएक दिवस करत उन्हाळ्याचे चार महिने सरून गेले होते, हळूहळू आश्रयाला आलेली लोकं त्यांच्या वाटेनं निघून जात होती.
   चार महिने या गावाने त्यांचं पोट भरले असल्यानं परतीच्या वाटेला आपले पालं घेऊन जात असताना महादेवाच्या देवळात दानपेटीत लोकं पाच पन्नास टाकीत होते अन् मगच आपल्या गावाकडे जात होते. हळूहळू वस्तीवरील सर्व लोकं आपल्या गावाकडे निघून गेले. बरसदीच्या दिवसांत पंचक्रोशीत चांगला पाऊस झाल्याने सगळीकडे रानातील कामे सुरू झाली होती अन् फोफावलेला दुष्काळ संपुष्टात आला होता.
   पाऊस आला, दुष्काळ गेला, बरसदीची कामे सुरू झाली पण प्रवीण, मावडी अन् त्यांची भोळसर माय अजून याच गावाला पोट भरत होती. लोकांच्या रानात खपत होती. अन् आता आपल्या गावाकडे जाऊन मजुरी करण्यापेक्षा इथे काय वाईट हा विचार करून ते इथेच लोकांच्या रानात रात्रंदिवस राबू लागले होते. दोन-साल चार साल असं करत करत आठ वर्ष निघून गेली होती. रोजचे काम अन् घर संसार करून प्रवीणची आई आता दिवसेंदिवस तब्येतीने खराब होत चालली होती.
   मावडी पण आता बरीच मोठी झाली होती. माय कामाला जायला निघाली की, मावडी सगळं कसं भराभर आवरून काढायची. हातासरशी असलेली कामे धुणी, भांडे ती निगुतीने पूर्ण करायची. हळूहळू सगळं काम झालं की शाळेलासुद्धा जायची. प्रवीणसुद्धा आता दहावी उत्तीर्ण झाला अन् तो ही मायला हातभार म्हणून लोकांच्या इथे काम करू लागला होता.
   कुठे खत टाकायचं काम असेल, कुठे मिस्तरीच्या हाताखाली रोजाने जाणं झालं असं बरंच काम तो करत होता, अन् मायच्या फाटक्या संसाराला हातभार लावत होता. हळूहळू या सगळ्यातून वेळ काढून, गावातील इतर पोरांच्याप्रमाणे, तो ही आता पोलीस भरतीच्या तयारीला लागला होता. कॉलेज करत सुट्टीच्या दिवशी दिवसभर कामधंदा वेळ काढून, तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी मैदानी चाचणीसाठी तयारी करू लागला होता.
   सांजेला जेवण झालं, की पारावर गावच्या मुलांशी गप्पा झोडत न बसता, तो गावात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाजूला असलेल्या, एका खोलीत सगळ्या मित्रांच्या समवेत अभ्यास करत होता. पुन्हा पहाटे उठून आवरसावर करून धावायला जात होता, छाती फुटेस्तोवर ढोर मेहनत करत धावत होता.
 
   डोंगर टेकड्याची रान पालथी घालत होता. या सगळ्यात त्याला त्याच्या भोळ्या मायची अन् त्याची लहानगी बहीण मावडीची त्याला साथ होती अन् त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा परिस्थितीशी दोन हात करत लढत होता.
क्रमश:
भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0