दिशाहीन माध्यमे..
अलीकडच्या काळात या माध्यमांमध्ये काहीशी नकारात्मकता जाणवते. संदेशवहन, जनजागृती या उद्देशांचा विसर पडतोय. सामाजिक शांततेच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. आंदोलने, हिंसाचार, राजकारण, स्वतःच्या आवडीनिवडी कशा श्रेष्ठ आहेत हे पटवून देणे इत्यादीमुळे मनात सतत अस्थिरता जाणवते.
Total Views |
दिशाहीन माध्यमे..
पूर्वी पत्र हे लोकप्रिय माध्यम होते. आपल्याला एखादी भावना किंवा विचार दुस-या व्यक्तीपर्यंत पोचवावासा वाटला तर तो पत्रातून लोक पोचवत असत. प्राचीन काळी निरोप्या संदेशवहनाचे काम करत असे. एका गावाहून दुस-या गावाला जाऊन संबंधित व्यक्तीला संदेश देण्याचे काम चाले. पुढे पत्रासारखे लिखित माध्यम आले. त्यानंतर टेलिग्रामचा शोध लागला. पुढे टेलिफोन आले. अशी काळानुरुप माध्यमे बदलत गेली. या सर्व माध्यमांचा मुख्य उद्देश संदेश पाठवणे असाच होता. त्यामुळे साधने बदलली तरी स्वरुप फारसे बदलत नव्हते. नभोवाणी आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून स्वरुप बदलण्यास दिशा मिळाली. नभोवाणी किंवा दूरचित्रवाणीवर सुरुवातीला बातम्या दाखवल्या जात असत. श्रृतिका, नाटिका असे पंधरा वीस मिनिटांचे कार्यक्रम सुरू झाले. श्रोत्यांच्या आवडीला महत्व मिळू लागले. त्यांच्या फर्माईशी आणि सूचनांचा विचार केला जाऊ लागला. रेडिओवर शेतीविषयक, स्त्रीविषयक, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम, गाणी, नाट्यवाचन यासारखे मनोरंजक कार्यक्रम सुरू झाले. पुढे दूरचित्रवाणीवर मालिका सुरू झाल्या. चित्रपटगृहाव्यतिरिक्त दूरचित्रवाणीवरही चित्रपट दाखवले जाऊ लागले. या माध्यमांचा संदेशवहन हा प्रमुख हेतू असला तरी कालानुरूप त्याचे स्वरुप बदलत गेले. ही सर्व पारंपारिक माध्यमे आहेत. त्यांचा वापर कमी होत असला तरी लोकप्रियता कमी झालेली नाही. रेडिओवर किंवा दूरचित्रवाणीवर सकाळी-संध्याकाळी ठराविक वेळी लागणा-या बातम्या लोक न चुकता अजूनही ऐकतात. त्यामुळे मूळ संदेशवहनाचा उद्देश रेडिओसारखे माध्यम अजूनही विसरलेले नाही. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या अमूलाग्र बदलामुळे माध्यमांच्या संख्येत वाढ होत राहिली, होते आहे. या माध्यमांचा सुरुवातीला संदेशवहन आणि सामाजापर्यंत अधिक माहिती कमी वेळात पोचविणे हा हेतू होता. पुढे ऑरकुट, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्राम ॲप यासारखी नवनवीन समाजमाध्यमे येतच राहिली. आता तो वापर अन्न, वस्त्र, निवारा यासारखाच मूलभूत गरज म्हणून केला जातो. ते बरोबरही आहे. आपण कायम अधुनिक काळानुसार बदलले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच जगाशी संपर्क साधणे सोयीचे आणि सोपे होणार आहे. या माध्यमांचे स्वरुप मात्र झपाट्याने बदलत आहे. हा स्वरुप बदलण्याचा वेग पारंपारिक माध्यमांपेक्षा दुप्पट आहे. लोकप्रियतेविषयी वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्याचा वापर रोजच लाखो लोक करत असतात. आधुनिक माध्यमे वापरणे महत्वाचे असले तरी ती वापरण्यापूर्वी त्याचा हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे. संदेशवहन हा तर कुठल्याही माध्यमाचा प्रमुख हेतू असतोच. पण त्याचबरोबर जनजागृती, साक्षरतेस सहाय्य, माहितीची देवाण-घेवाण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर ही त्याची कार्ये आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी संचारबंदीच्या काळात शिक्षण, ज्ञान- तंत्रज्ञान, पाककला, संगीत, साहित्य इत्यादीसाठी या माध्यमांचा उत्तम उपयोग झाला. अलीकडच्या काळात या माध्यमांमध्ये काहीशी नकारात्मकता जाणवते. संदेशवहन, जनजागृती या उद्देशांचा विसर पडतोय. सामाजिक शांततेच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. आंदोलने, हिंसाचार, राजकारण, स्वतःच्या आवडीनिवडी कशा श्रेष्ठ आहेत हे पटवून देणे इत्यादीमुळे मनात सतत अस्थिरता जाणवते. या माध्यमातून जनजागृती बरोबरच समाजाला दिशा देणे, नवा विचार मांडणे हे महत्वाचे आहे. परंतु, माझा नेता कसा उजवा आहे, माझा पक्ष कसा योग्य, आंदोलने, जातीभेद, महापुरुषांचा अवमान इत्यादी गोष्टी माध्यमांवर शेअर केल्या जातात. शेअर केलेल्या माहितीविरुद्ध कोणी बोलले की, त्याच्या बोलण्याचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार न करता ती व्यक्ती विरोधी विचारांची असे ठरवून त्या व्यक्तीशी मैत्री तोडण्यात लोक धन्यता मानतात, हे अतिशय चिंताजनक आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आधीच लोक विभक्त झालेले असताना मैत्री हा एक आधार आहे. त्याचाच दोर कापून माणसाला माणसापासून लांब करणे हे अगदी अयोग्य आहे. माझा पक्ष कसा योग्य आहे ही मांडणी म्हणजे निव्वळ जाहिरात आहे! व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. त्या हक्काची दुसरी बाजू म्हणजे कर्तव्य आहे. हे कर्तव्य म्हणजे, दुस-या व्यक्तीच्या विचारांचा आदर करणे. त्या व्यक्तीचे विचार गैर असतील तर अतिशय सामान्य आणि शिष्टाचाराच्या सौम्य भाषेत त्या व्यक्तीस सांगितले पाहिजे. शिव्या देणे किंवा अवमानकारक बोलणे ही सायबर हिंसा आहे.. त्यामुळे ज्यांना हक्क हवा आहे त्यांनी आधी आपली कर्तव्य जाणणे, आपण सोशल मिडियाचा वापर कशासाठी करतो आहोत याची स्वतःच्या मनाला प्रामाणिक जाणीव असणे आवश्यक आहे. ती जाणीव हरवलेल्या व्यक्ती सोशल मिडीयाचा हवा तसा वापर करून समाजाला अशांततेच्या मार्गाने पुढे नेत आहेत. अशा व्यक्तींपेक्षा अशा वृत्तीपासूनच आपण लांब राहिलो तर दिशाहीन होत असलेल्या माध्यमांना दिशा सापडण्यास सुरुवात होईल. समाजाला दिशा देणं याकडे एक सामाजिक कार्य म्हणून आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी सोशलमिडीयाचं आभाळच आपल्याला तंत्रज्ञानानी उपलब्ध करुन दिलेलं आहे. साहित्य, संगीत, कला-क्रीडा, शिक्षण या घटकांसाठी अधिकाधिक प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर वाढला तरच माध्यम म्हणून त्याला काही अर्थ प्राप्त होईल. युवाविवेक, विवेक सारखी मासिके, त्यांचे विविध चॅनल्स साहित्याचा प्रसार करत आहेत. यातून ज्ञान आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यामुळे समाजाला दिशा मिळेल. अनेक कवी आणि लेखक या माध्यमातून एकमेकांना भेटत असल्यामुळे त्यांचा संवाद वाढतो आणि यातून निश्चितच काहीतरी समाजोपयोगी, मनोरंजक घडेल आणि सकारात्मकता वाढेल. दुस-या व्यक्तीच्या अंगीदेखील आपल्यासारखीच कला आहे आणि त्याचा आपण आदर करावा या वृत्तीत वाढ होईल.दिशा ओळखण्यासाठी आणि दिशा दाखवण्यासाठी मनाचं होकायंत्र सदैव जागृत हवं..- गौरव भिडेपुणे१६ मार्च २०२४