अंतःस्वर - कविता स्वरयोगिनीची!

16 Mar 2024 18:19:34
 
       अंतःस्वर - कविता स्वरयोगिनीची!
                                                                                         अंतःस्वर - कविता स्वरयोगिनीची!
   नुकतेच, आ. पद्मविभूषण स्वरायोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले हे आपण जाणतोच. 'कविता' हा त्यांच्या आयुष्यातील एक कोवळा केशरधागा! त्यांच्या स्वराइतकाच शुद्ध, तरल, अर्थपूर्ण आणि आर्तमधुर! या निमित्ताने, प्रभा अत्रे यांच्या कवितेचं हे स्मरण...
   पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे या आपल्या सर्वांना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका म्हणून सुपरिचित आहेतच. आपल्या अवीट गोडीच्या गायनामुळे रसिकमनात एक सादर आपुलकीचं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. त्यांची तृप्त करणारी गायकी ही जगद्वीख्यात आहेच, पण त्याचसोबत त्यांचं कवितालेखनही तितकंच तरल, भावरम्य आणि आर्तमधूर आहे. सहज आणि सुरेल आहे. कदाचित त्यांंची कविता जनमानसात गाण्याइतकी पोहोचलेली नाही. पण म्हणून तिचं मोल यःकिंचित नाकारता येत नाही. प्रभा अत्रेंची कविता म्हणजे काय? तर त्यांच्या एका संग्रहाचं शीर्षकच हे सांगून जातं. अंतःस्वर! त्यांची कविता हा त्यांचा आतला, शब्दबद्ध झालेला स्वरच आहे! त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर
"माझी लेखणी.. माझी कविता.. माझ्या गाण्याचाच एक आविष्कार आहे"
त्यांच्या इतर विषयावरिल कविता आहेतच, पण बहुतांशी कविता या संगीत साधनेच्या कोवळ्या-कठिण वाटेवरच्या आहेत, स्वरसूरांशी आणि आतल्या स्वतःशीही संवादणा-या आहेत. अनुभूतींचा सतेज गाभारा तितक्याच आर्ततेने मांडू पाहणा-या आहेत. त्यांमधला आकृत्रिम प्रवाह सुखावणारा तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त समृद्ध करणारा आहे, काहीतरी देणारा आणि जाणिवांच्या प्रकाशात न्हाऊ घालणारा आहे. काही कविता गाण्याशी वा संगीतानुभूतीशी निगडीत असल्या, तरी त्या केवळ गायक वा संगीतरसिकांसाठी नाहीत, तर जगणा-या प्रत्येकासाठी आहेत. त्यांमधलं गाणं म्हणजे प्रत्येक कलाकाराची त्याची त्याची कला आहे असं वाटतं. कुणासाठी ते जीवन असेल किंवा कुणासाठी आपला ईश्वरही! प्रभा अत्रे स्वतः आपल्या कवितांना 'चिंतनिका' म्हणतात. काय सुंदर संज्ञा आहे! या संज्ञेतच त्या कवितेचा गाभा आहे असं वाटतं. चिंतनातून आलेली आणि चिंतनशील करणारी अशी त्यांची कविता एक तहान घेऊन येते. एक अनिवार ओढ आणि समर्पणाची उत्कट आकांक्षा घेऊन येते. अशी आतल्या वाटेवरुन चालणारी ही कविता म्हणजे अंतःस्वरच आहे.
आज, प्रभा अत्रेंच्याच काही कविता.
सुरांची साधना
पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखीच
उमटत असताच
मिटून जाणारी
   केवळ चार ओळींत सुरांची साधना मांडणारी ही कविता. 'अल्पाक्षरं रमणीयं' या उक्तीचं आदर्श उदाहरण म्हणता येईल अशी. ती साधना कशी आहे? तर पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखी(च!) उमटत असतानाच मिटून जाते अशी. सोप्या शब्दांत मांडलेला फार मोठा आशय यातून नकळत कळून जातो. संगीतक्षेत्राशी आपला फार संबंध नसला, तरी त्यातील आर्तता जाणवते. शब्दचित्र डोळ्यांसमोर उभं राहतंच, पण त्याचसोबत ती रेष तशीच रहावी याची अनिवार तहान जाणवते. हा दुराग्रह नाही, पण प्रत्येक प्रामाणिक साधकाचा अट्टाहास आहे. आणि त्याचसाठी वारंवार ओढलेली रेष, व्रतस्थपणे अखंड ठेवलेला साधनेचा सूर, आणि पुढे आयुष्य आणि साधना यांमधली मिटून गेलेली रेष! हे संचितच या शब्दांमागे आहे.
नादसमुद्राच्या तळाशी शोधते आहे सुरांचे मोती
गाणा-या यात्रिकाच्या हाती
कुणी दिल्या या विझलेल्या वाती?
गळ्याला डागून दिलाय सुरांचा मोह
आत्म्यापासून हाकेच्याच अंतरावर
भितीचे डोह
उल्कापाताची साक्षात्कारी चांदणी
तळहातावर गोंदवून मी
हलकेच पुन्हा निघून जाते
नाद समुद्राच्या तळाशी
   ही कविता आपल्याला नादसमुद्राच्या काठाशीच घेऊन जाते. दिसू लागतो एखादा सच्चा साधक, नादसमुद्राच्या तळाशी सुरांचे मोती शोधण्यात अभिरत असलेला. आकाशातील रंगछटांची बदलती क्षणभंगूर उधळण, ऋतुंचं येऊन, झुलून, झुलवून जाणं, याचा त्याला काही फरक पडत नाही. खोल तळाशी असलेले मोती शोधण्यात तो इतका गुंग झालाय की देहभानाच्या सीमाही पुसट होत जातायत. तो एक यात्रिक आहे. तोही गाणारा. म्हणूनच तर सुरांच्या मोतींची ओढ त्याला इतकी उत्कटपणे लागली आहे. पण प्रखरपणे जाणवताहेत त्याच्या हाती दिलेल्या विझलेल्या वाती. कुणी दिल्या? हा सतावणारा प्रश्न आणि त्या चेतावण्याची आकांक्षा. ही आकांक्षा का असावी? आणि तीही इतकी उत्कट? कारण गळ्याला डागून दिलाय सुरांचा मोह! तो मोहही किती सकारात्मक वाटतो! त्याच्यापायी सुरु असलेली साधना आणि आतून प्रकाशून जाण्याची तहान. अशावेळी आत्म्यापासून हाकेच्याच अंतरावर भितीचे डोह आहेत! ती भिती हरवून जाण्याची आहे? काहीतरी निसटून जाण्याची आहे? की साधनेच्या मार्गावरील आकर्षक प्रलोभनांनी होणा-या घाताची आहे? की सर्वांचीच? माहित नाही. पण भितीच्या भावनेला अचूक शब्द नसतो. तोच भाव या शब्दांमधल्या अवकाशात दरवळतो आहे. पण असं जरी असलं, तरीही ध्येय सोडलेलं नाही. प्रेरणा तशीच लख्ख जागी आहे. नव्हे जागी ठेवली आहे. अंतःप्रेरणेचा झरा निष्ठेने आणि नेटाने अखंड ठेवला आहे, म्हणूनच तो अंतःस्वर पुनःपुन्हा खुणावतो आहे. म्हणूनच.. हातावर गोंदवली आहे चांदणी. केवळ चांदणी नव्हे, तर उल्कापाताची साक्षात्कारी चांदणी! तो साधनेच्या मार्गावर योग्य दिशेने नि गतीने चालत असण्याचा साक्षात्कार असावा वा साध्यच्या अस्तित्वाचा, समीपत्वाचा संजीवक साक्षात्कार असावा, तोच सगळ्या भितींवर मात करवून घेऊन पुन्हा घेऊन जातो नादसमुद्राच्या तळाशी. तेही हलकेच! कसलाही गाजावाजा न करता. कारण, अवघं श्रवण अंतःस्वराशी इतकं एकरुप होऊन जातं, की बाहेरचे मोहाचे निनाद, निरर्थकाचे आकर्षक आवाज, सारे काही नसल्यात जमा होतात. ती योगिनी नादसमुद्राच्या तळाशी पुन्हा जाते. आपल्याच आतल्या डोहात देहाची दिंडी पंढरीची वाट श्रद्धेने चालते. पैलावरचा स्वर हळूहळू व्यापू लागतो सबाह्य. आतले कान तृप्त होतात, मन अमन होऊन जातं. त्याची खुण पटू लागते.. दिंडी, पंढरीत विरघळून जाते..
~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0