ट्रेंडिंग श्रीराम?

04 Feb 2024 09:00:00
 
ट्रेंडिंग श्रीराम
ट्रेंडिंग श्रीराम?
प्रभू श्रीरामचंद्र हा भारताचा आणि खरंतर भारतीयत्वाचा आदर्श आहे. रामायण हे केवळ महाकाव्य नाही तर तो आपला दिव्येतिहास आहे, आणि म्हणूनच श्रीरामचंद्र हे त्यातील पात्र न राहता तो भारतभूमीत साकार झालेला प्रकाश आहे! मर्यादा पुरुषोत्तम आहे! अर्थातच आपला आदर्श आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विशेषतः चार-पाच आठवड्यांपासून अयोध्येत श्री राम मंदिराची भव्य निर्मिती झाली असताना आणि राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, होत आहे, आणि आता झाली अशा सगळ्या टप्प्यांमध्ये गेले चार-पाच आठवडे श्री रामचंद्र हा मुद्दा खरंतर हे शब्द कुठल्याही समाज माध्यमामध्ये ट्रेंडिंग मध्ये दिसले याचे आपण साक्षीदार आहोतच. केवळ समाज माध्यमांवरच नव्हे तर भारतातील राज्याराज्यांमध्ये, शहरांशहरात, इतकंच नव्हे तर गावाखेड्यांमध्ये रस्त्या रस्त्यावर राममंदिर निर्मितीचा अभूतपूर्व उत्साह पाहिला मिळाला. प्रत्येक भारतीयाच्या मनामनात हा सोहळा होत होता. मग त्यामध्ये 'मेरे घर राम आयेंगे' किंवा 'राम आयेंगे तो' 'मंगल भवन अमंगल हारी' ही गाणी सर्वतोमुखी आणि सर्वत्र मोबाईलवर अखंडपणे ऐकू येत होती. येत आहेत. आज मंदिर निर्मितीला आठवडा होऊन गेला असला, तरीसुद्धा तो प्रभाव पूर्णपणे ओसरला नाही, ओसरणारही नाही हे नक्की! या सर्व गोष्टी सुरू असताना मधल्या काही काळात संपूर्ण देश कधी नव्हे इतका राममय झाला असताना 'ट्रेंडिंग श्रीराम' असं वाटणं स्वाभाविक आहे. पण वाटतं, की 'ट्रेंडिंग श्रीराम' या उक्तीत विरोधाभास आहे. कारण एखादी गोष्ट ट्रेंडमध्ये असणं म्हणजेच ती मुख्य प्रवाहात असणं, बहुतांश लोकसंख्येत चर्चिली जाणं, घेतली जाणं, वगैरे म्हणूनच हा शब्द श्रीरामांना कायमच गैरलागू ठरेल. एक वेळ 'श्रीराम' हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे, मंदिराचे फोटो ट्रेंडिंग आहेत किंवा श्रीरामाची अमुक अमुक गाणी ट्रेंडिंग आहेत असं म्हणणं ठीक. पण श्रीराम ट्रेंडिंगमध्ये आहे हे विधान संस्कृती निष्ठांना मान्य होणार नाही. कारण असं, की भारतातून प्रभू श्रीरामचंद्र कधीच वगळले जाऊ शकत नाहीत. ते अखंड मुख्य प्रवाहातच असणार आहेत. संस्कृतात म्हटल्याप्रमाणे - जिथे श्रीरामचंद्र असतात ते वन देखील राष्ट्र होतं, आणि जिथे ते नाहीत असे राष्ट्र देखील राष्ट्र उरत नाही! आणि एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे रामकथेशिवाय भारतीयता पूर्णच होत नाही मुळी! तेव्हा, ट्रेंडिंग हा शब्द देखील अस्तित्वात नसेल त्याचं मूळही नसेल तेव्हापासून श्रीरामचंद्र, रामभाव, राम आदर्श, या मातीत आणि मातीतल्या लोकांमध्ये नसानसांतून वाहतो आहे. मूळ रामकथा वाल्मिकींनी लिहिली असली तरी सुद्धा रामाप्रतीच्या आस्थेने, जिव्हाळ्याने, अभ्यासाने, आदर्शाने आणि आशीर्वादाने भारावून जाऊन किंवा प्रेरित होऊन भारतभर नव्हे तर भारताच्याही बाहेर अगणित रामकथा निर्माण झालेल्या दिसतात. अशी एकही भारतीय भाषा नाही जीत कुणी रामकथा लिहिली नाही. मग वाल्मिकी रामायणासोबतच प्रसिद्ध अशी कितीतरी रामायणं सांगता येतील. तुलसी रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, अद्भूत रामायण, मोल्ल रामायण, अशी ही यादी न संपणारी आहे. इतकंच काय लोकसाहित्यातही अनक्षर स्त्रियांनी ज्या ओव्या रचल्या आणि गायल्या त्यात ठिकठिकाणी रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण भ्राता, हनुमंत, डोकावत राहतात. श्रीराम भारतीय लोकांना इतका आपला वाटतो आणि म्हणूनच रामकथा म्हणजे त्याचं साक्षात जीवन इतकं जवळचं वाटतं, की आज भारतभरात अशी अनेक ठिकाणं सापडतील जिथे रामायणातील काही प्रसंग इथेच याच ठिकाणी घडले अन्यत्र नाही असं लोकं अभिमानाने आणि अगदी ठामपणे सांगतात. ऐतिहासिक संदर्भ आणि वाड्मयीन संदर्भ पाहता ते योग्य नाही असं म्हणता येतं. पण यामागील त्यांचा उत्कट स्नेहभाव मात्र इथे चिरंजीव आहे. या रामप्रेमाचं सुंदर दर्शन यातून घडतं ते मात्र नाकारता येत नाही! सांगण्याचा मुद्दा असा, की श्री रामचंद्र आणि रामकथा या देशात आणि सीमांबाहेर विस्तार होऊन आशियाई सांस्कृतीतच इतकी भिनलेली आहे.. तिचा अविभाज्य झाली आहे!
असं असलं तरी मंदिर निर्मितीचा कार्य त्याचं महत्त्व राखून आहे. कारण इतक्या मनामनात असलेली रामकथा आणि राम-आदर्श प्रकट होण्यासाठी, पुन्हा एकदा जाहीर होण्यासाठी आणि पुढच्या अनेकानेक नव्या पिढ्यांसाठी ही अस्मिता अखंडपणे प्रकट राहण्यासाठी राष्ट्र मंदिराची निर्मिती उपकारक आहे, यात तिळमात्र मात्र शंका नाही.
या मंदिर निर्मितीची 'मंगल भवन अमंगल हारी..' ही फलश्रुती आहे, जी अनेक अर्थांनी अनुभवास निरंतर येत राहील हे नक्की!
~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0