आनंदाचं जगणं..

दु:ख कुणाला नसतं? माणसालाच दु:ख आहे असं नाही. पशु-पक्ष्यांना दु:खं असतं, वृक्ष - वेलींना दु:ख असतं. या जगातल्या सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आपापलं दु:ख आहे.

युवा विवेक    03-Feb-2024   
Total Views |
 
आनंदाचं जगणं..
आनंदाचं जगणं..

दु:ख कुणाला नसतं? माणसालाच दु:ख आहे असं नाही. पशु-पक्ष्यांना दु:खं असतं, वृक्ष - वेलींना दु:ख असतं. या जगातल्या सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आपापलं दु:ख आहे. आपल्याला इतरांचं दु:ख कायमच आपल्यापेक्षा कमी आहे, असं वाटतं. इथेही आपण तुलना करतो आणि अजून दु:ख ओढवून घेतो. तुलना करणं हा गुण प्रत्येक व्यक्तीत असतो. म्हणजे खरंतर दोषच... पण आपल्यापेक्षा कमी असणा-या माणसाशी आपली तुलना करणं, हा त्यातल्या त्यात गुणच.. तुलनेच्या पलीकडे आणखी एक साधी सोपी पण म्हटलं तर अवघड गोष्ट आहे.. ती म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख होणं. नुसती ओळख होऊन उपयोग नाही; तर ती पुन्हा पुन्हा नव्याने व्हायला हवी. यातूनच आपल्याला बदलत जाणा-या प्रत्येक गोष्टीचा वेध घेता येईल.. जग बदलतंय, आपली वृत्ती, स्वभाव बदलतोय, आपण या बदलाचा कितपत स्वीकार करतोय अशा निरनिराळ्या बाबींची आपल्याला ओळख व्हायला हवी. नकारात्मक विचार सोडून द्या आणि सकारात्मक विचार करा असं विविध माध्यमातून आपल्या मनावर सारखं बिंबवलं जातं. ते अगदी योग्यच आहे. पण माणसाला सुखी व्हायचं असेल तर सकारात्मक किंवा नकारात्मक यापेक्षा प्रॅक्टिकल विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे. स्वीकार हीच सुखाची पहिली पायरी आहे.

सुखी होण्याची अपेक्षा ठेवणं किंवा इच्छा बाळगणं यात गैर काहीच नाही. 'पी हळद आणि हो गोरी' अशी आपल्याकडे जशी म्हण आहे तसं एका रात्रीत सुखी होता येत नाही. त्यासाठी पुन्हा दु:ख सोसणं आलंच. म्हणजेच सुख आणि दु:ख या भरती आणि ओहोटी सारख्या क्रिया आहेत. भरती-ओहोटी पैकी मला फक्त भरतीच हवी असंच समुद्र म्हणत राहिला तर जगबुडी होईल. त्यामुळे समतोल राखण्यासाठी भरती आणि ओहोटी या दोन क्रिया सारख्या प्रमाणात घडत असतात. त्या आहेत तशा मनापासून स्वीकारणं हेच जगण्याचं शाश्वत साधन आहे. सुखाचं दुसरं नाव म्हणजे आनंद. आपल्याला तो शोधावा लागतो. तो शोधण्याची सवय स्वतःला लावून घेतली म्हणजे दु:ख दूर होत नसलं तरी त्याचा विसर पडेल. छोट्या गोष्टी असतात पण त्यात किती आनंद असतो. अगदी दहा-बारा किंवा फारतर पंधरा-वीस पाकळ्या फुलाला असतात. पण त्याचा सुगंध आपल्या तन-मनाला साद घालतो, नवी ऊर्जा देतो. आकाशातून विमानाचा आवाज ऐकू आला की, आपण वर मान करून बघतो आणि बघितल्या क्षणी आपल्याला विमान दिसतं, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. लहान मूल हसलं तरी आभाळातून चांदण्यांचा पाऊस पडतोय असा आपल्याला भास होतो.. अशा किती किती गोष्टी असतात. आपल्या हातावर देवाचा प्रसाद कुणी ठेवावा तसा त्या गोष्टी आपल्याला आनंद देतात. हा आनंद आपण पुन्हा पुन्हा साठवून ठेवायला शिकलो तर आपलं जगणं हळूहळू आनंदाने भरुन जाईल!

'शब्दप्रभूंच्या सहवासात' हा साहित्यिकांची माहिती देणारा लघुपटांचा कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात झाला. ब-याच पुणेकरांनी त्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कितीतरी आज्या-आजोबा, मावश्या, काका-काकू यांच्या चेह-यावर दर पाच-सात मिनिटांनी हसू फुलत होतं. माणूस म्हातारं असलं तरी हास्य कधी म्हातारं होत नाही. त्याचं नवेपण किती सुखावणारं असतं. लघुपटांचं लेखन-दिग्दर्शन डाॅ. माधवी वैद्य यांनी केलं आहे. प्रत्येक लघुपटाच्या आरंभी तो लघुपट तयार कसा केला, त्याच्या गमतीजमती, आठवणी त्या रसिकांना सांगत होत्या. कवयित्री व गीतकार शांताबाई शेळके यांच्या लघुपटाची त्यांनी गंमत सांगितली. लघुपटाच्या चित्रिकरणाला नेसण्याच्या साड्या निवडणे, इस्त्री वगैरे करुन आणणे ही व्यवस्था देखील प्रकृती ठीक नसल्याने शांताबाई शेळके यांनी डाॅ. माधवी वैद्य यांना सांगितली. डाॅ. माधवी वैद्य यांनी आनंदाने ती देखील व्यवस्था बघितली. हे सांगताना डाॅ. माधवी वैद्य यांना किती आनंद वाटत होता हे त्यांच्या प्रसन्न चेह-यावरुन लक्षात आलं. आरती प्रभू यांच्यावरील लघुपट करताना अतुल कुलकर्णी यांची निवड केल्याचा आणि ती योग्य ठरल्याविषयीचे समाधान आठवणी सांगताना त्यांच्या चेह-यावर दिसत होते. डाॅ. माधवी वैद्य यांच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधतात. तेव्हा जाणवलं की, व्यक्ती मोठी असो, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी असो किंवा अगदी लहानातलं लहान मूल असो; छोट्या गोष्टीतून त्याला आनंद मिळत असतो. हा आनंद साठवण्याची सवय स्वतःला लावली की, जगणं आनंदाचं होईल. छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याची सवय जगणं सुसह्य करेल, आनंदाचं करेल..

- गौरव भिडे
पुणे
०३ फेब्रुवारी २०२४