सुगीचे दिस..! भाग - १२

29 Feb 2024 11:34:01
 
सुगीचे दिस..! भाग - १२
सुगीचे दिस..! भाग - १२
जसं जसं आम्ही पाटलांच्या वावराची वाट जवळ करत होतो तसंतसं भुईला फुफाट्यात रोवलेल्या आमच्या पावलांच्या खुणा मागे आधिक स्पष्ट दिसू लागल्या होत्या. अन् त्या आमच्या उज्वल भविष्याचं प्रतिनिधित्व करत त्या करत होत्या. मावळाचा चाळ मागे पडला अन् पहाटेची दहा वाजून गेले, काहीली काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांनी पुन्हा तुटायला सुरु केलं होतं.
माळावर काही वेळ बसून जवळच्या पाणपोईवर आम्ही पोटभर पाणी रिचवले अन् पुन्हा फुफाट्यात माखून गेलेल्या रानवाटा जवळ करून लागलो. इस्माईल अन् मी निवांत खाऊन झालेल्या बुंदीबद्दल बोलत बोलत चालत होतो. इस्माईलची माय, शांता मामी, अन् माय कांद्याच्या वाट्याबद्दल बोलत होत्या.
गप्पा मारत पाटलांच्या वावरात आम्ही केव्हा पोहचलो कळलं नाही. वावरात भोळ्या राजू आमच्या आदी पोहचला होता, आज कोणत्या हालतीत कांदे काढून झाले पाहिजे अशी ताकीद पाटलांनी त्याला भरलेली दिसत होती. आम्ही आलो तसं त्याने केळीत भरून विहिरीतून पानी आणले अन् आम्ही पाणी पिऊन कामाला लागलो. मी अन् इस्माईल कापून ठेवलेला कांदा कांद्याच्या पोळीवर नेऊन टाकू लागलो, माय अन् शांता मामी ते कांदे चराचर कापू लागले.
भोळ्या राजू गुरांना चारापाणी करून आमच्या मदतीला आला अन् तोही डालग्यात कांदे घेऊन वाहू लागला. तो असं सोबत काम करू लागला तर चारच्या सुमाराला आमचं कांद्याचे उक्त्यातील काम संपेल असा अंदाज येत होता. कालच्या झालेल्या वावधनामुळे भोळ्या राजूची अन् पाटलाची झालेली फजिती भोळ्या राजू त्याच्या भाषेत आम्हाला रंगवून सांगत होता. आम्ही पण त्याला हसून काम करत होतो.
कांदे कापून झाली तसं दुपारचा एक वाजून गेला होता. आता फक्त कापलेल्या कांद्याची पोळीवर वाट लाऊन मोकळं व्हायचं राहीलं होतं. मग दुपारची भाकर खाऊन हे काम एका झटक्यात पूर्ण करू असं भोळ्या राजू म्हंटला अन् आम्ही भाकरी खायला म्हणून बावडीवर येऊन बसलो.
भोळ्या राजूने बावडीतून पाणी काढले अन् सगळे फडक्यातून भाकरी काढून खायला बसलो. भोळ्या राजूने गुरांना वैरण दाखवली होती ती ही वैरण खात रवंथ करत बसली होती. गुरांच्या गळ्यातील लोखंडी, पितळी घंटीची किणकिण ऐकत आम्ही जेवण करत बसलो होतो. दुपारच्या सप्त्याला जायला जमलं अन् काल्याचे कीर्तन हाती लागले तर बरं होईल असं मायच्या अन् मामी त्यांच्या गप्पा चालू होत्या.
भाकरी खात असताना दुरूनच पाटलांच्या बुलेटचा आवाज आला, आमच्या गप्पा शांत झाल्या. पाटील आले अन् पाटलांनी झालेलं काम बघून खुश होऊन मला शाब्बासकी दिली,आमच्यात बसून ते ही भाकर खायला बसले. अन् काल रात्री झालेली भोळ्या राजूची अन् त्यांची फजिती सांगू लागले. गावातील सप्त्याचा विषय निघाला, लवकर काम आटोपले तर सप्ता हाती लागेल असं पाटील बोलून त्यांच्या कामाला निघून गेले अन् आम्हीही भाकरी खाऊन जराही वेळ विसावा न घेता कामाला लागलो.
भोळ्या राजू पुन्हा एकदा गुरांना चारापाणी दाखवून आमच्यासोबत कामाला लागला. तो आम्ही वाहून आणेलेल्या कांद्याला पोळीवर टाकून व्यवस्थित पोळी रचून घेत होता. आम्ही सगळे कांदे वाहून आणत होतो, तीन वाजले भोळ्या राजूने पाण्याची केळी भरून आणली. आम्ही पुन्हा पोटभर पाणी कामाला बिलगलो. एका तासात सगळे कांदे वाहून झाले होते.
पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकी दहा-दहा किलो बारके, दुबळके कांदे खायला म्हणून घरी घेऊन जाणार होतो. मग माय, इस्माईलची माय अन् शांता मामी ही घरून आणलेल्या गोण्यात कांदे निवडायला लागली. आम्ही पावसाचा दिसत असलेला अंदाज पाहून भोळ्या राजूला मदत म्हणून कांद्याला पाथीने अन् ताडपत्रीने झाकू लागलो.
चारचा पार कलला अन् आम्ही निघायला म्हणून तयार झालो. भोळ्या राजूने सगळ्यांना दहा-दहा किलो मोजून कांदे दिले होते. मायना एका गोनीत आमचे वीस किलो कांदे भरले अन् ती गोनी घेऊन माय रस्त्यानं चालू लागली. पाटलांच्या वावरापासून ही गोणी आमच्या झोपडीपर्यंत घेऊन जाणं अवघड असं काम होतं. पण; पर्याय नव्हता,कांदे घेऊन जावे लागणार होते.
रस्त्यानं दोन ठिकाणी धावीन लागत होती तिच्यावर गोणी घेऊन चालण्यात फार त्रास होणार होता अन् एव्हढे ओझे घेऊन मायची मान पण अवघडून आली होती. तेच गणित इस्माईलच्या मायचे पण झाले होते पण पर्याय नव्हता पोटाला खायला कांदा पण लागणार होता.
खडका खुडकाच्या वाटा जवळ करत आम्ही कसेतरी कांदे घेऊन चालत होतो. अखेर धावन आली तिथं आम्ही एक शक्कल लढवली अन् डोक्यावर असलेल्या गोण्या घरंगळत तश्याच खाली सोडून दिल्या बऱ्याच दूर धावन संपेपर्यंत त्या तश्याच लुंडकत गेल्या. मग आम्ही हळूहळू खाली उतरलो नदीच्या अंगाला असलेलं पाणी पिऊन पुन्हा मायच्या डोक्यावर कांद्याची गोणी देऊन आम्ही चालू लागलो.
फुफाट्याच्या वाटा जवळ करत आम्ही गावाजवळ पोहचलो होतो, मात्र गावात सगळं आवरले असावं असे दिसून येत होतं. काल्याचे कीर्तन संपून सांजेला पंगती बसल्या होत्या. आईचा अन् मामींचा हे सगळं बघून हिरमोड झाला होता पण; कामामुळे आम्हाला पर्याय नव्हता. गावातली सगळी लोकं आमच्याकडे मूर्ख आहोत आम्ही अश्या भावनेनं बघत होते.
झोपडी पहूर आलो अन् मायने डोक्यावर आणलेली कांद्याची
सुगीचे दिस..! भाग - १२अंगणात टाकली. मी कडीकोंडा खोलून मायला तांब्याभर पाणी आणून दिले, तिनं एका दमात ते पिऊन घेतलं. मी अंगणातील कांद्याची गोणी झोपडीत नेऊन ठेवली, मी ही हातपाय धुवून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला मायच्या संगतीने बघत बसलो होतो. आजच्याने आमचे यंदाच्या सालाचे सुगीचे दिस संपले होते.
समाप्त..!
भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0