तुज सगुण म्हणू की निर्गुण रे?

25 Feb 2024 09:00:00

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे?
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे?
भारतीय संस्कृतीने 'ईश्वरप्राप्ती' हे कायमच आपलं ध्येय मानलं आहे. मग त्यासाठी मार्ग कुठलाही असो. सर्व जीवांची गती शेवटी त्या एका ईश्वराकडेच, ही आपली श्रद्धा. रक्तातून वहाणारे श्रद्धा-तंतू, मातीतून नित्यनव्या होणार्‍या संस्कृतीने जोपासलेले त्याचे हिरवे ओले कोंभ, घरातूनच झालेले त्याच्या जोपासणीचे संस्कार, अगदी स्वतःच्या अनुभवांनी लागलेली त्याची गोडी आणि शास्त्र ग्रंथांनी त्याला दिलेली अथांगाची दिशा.. असा श्रद्धेचा परिपोष भारतीय मनाला काही नवा नाही. तो पिढीजात आहे. घरंदाज आहे. पण त्याचवेळी विश्वात्मक देवाची पूजा बांधणारा आहे. भारतीय भावविश्वातील श्रद्धा इतकी सहज आणि प्रवाही असताना ती डोळस देखील आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर ज्याच्याविषयी प्रेम व्यक्त करायचं, जो उपास्य आहे, तो ईश्वर नेमका कसा आहे? हा प्रश्न अनादी काळापासून पडत आला आहे. तो आहे का आपल्यासारखा दोन हात, दोन पाय, एक चेहरा असलेला? की पुराण कथांमधला चतर्भुज, चतुर्मुख वगैरे? की त्याचं रूप हे अरुपच आहे आपल्याला न कळणारं.. आपल्या ओंजळीत न मावणारं.. विचारांच्या कक्षेत न सापडणारं.. शब्दांच्या साच्यातून निसटून जाणारं.. कितीतरी प्रश्न आणि न संपणारी प्रश्नांची आवर्तनं. तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रवाहांनी या प्रश्नांचे उत्तर आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न केला. कुणी त्याला सगुण म्हटलं, कुणी निर्गुण. कुणी साकार तर कुणी निराकार. आणखीही बरंच. पण एकाहून अधिक प्रवाहांशी संपर्क येऊन सामान्य माणसाचं संभ्रमित मन भांबावून जाईल. कदाचित या प्रश्नांनी दडपण येईल त्याच्या मुग्धपणावर! ज्ञानेश्वर माउली मात्र हे सगळे प्रश्न सामान्य सकळांसाठी अत्यंत सहजपणे सोडवून देतात. तेही मोजक्या शब्दांत आणि केवळ एका अभंगातून!
महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची बाब आहे. शंकराचार्यांच्या पूर्वी असलेले दैवतांमधील वाद आपण जाणतोच. वर म्हटल्याप्रमाणे तेराव्या शतकात सुद्धा लोकदैवातांवरून असे वाद असण्याची शक्यता आहे. पिढीजात आलेल्या पांडुरंगाच्या कथा ऐकून त्याची भक्ती करावी आणि सहज एखाद्या दिवशी कोणा वेदांती प्रवचनकाराचं प्रवचन ऐकून ईश्वर निर्गुण निराकार असल्याचा प्रभाव मनावर पडावा.. असं होणं त्या काळात अगदीच शक्य होतं. बरं, ईश्वर निराकार मानावा तर दिसत नाही आणि सगुण साकार म्हणून पुजावा तर निराकाराच्या प्रभावी दडपणाखाली मनात शंका नर्तन करू लागतात! ही सामान्य माणसांची स्थिती तेव्हा असू शकेल हे नाकारता येत नाही. या सर्व प्रश्नांचं निरसन किती अलवारपणे केलं आहे माउलींनी! ही उकल समजावून सांगणारा अभंग म्हणजे, 'तुज सगुण म्हणून की निर्गुण रे!'
तुज सगुण म्हणों की निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
माउली सुरुवात करतात ती एका प्रश्नाने. तुला काय म्हणू रे? सगुण म्हणू की निर्गुण? हा प्रश्न ईश्वराला जरी केला असला, तरी सामान्य श्रोत्यांना आकर्षून घेणारा आहे. त्यांच्या मनात केव्हा पासून ही शंकांची दरी आहे. प्रवासाची इच्छा असूनही वाट न सापडू देणारी ही दरी. अल्पाक्षरी सुरुवात पण फार महत्त्वाची वाटते आणि लगेच माऊलीच उत्तर देऊन टाकते - बघा, सगुण काय किंवा निर्गुण काय दोन्हीही म्हणजे एक गोविंदच आहे! हे ऐकून एखादी मालन सहज हर्षित होऊन जावी आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याने तिने मनोभावे जात्यापाशी त्या गोविंदाला नमस्कार करावा हा त्याचा परिणाम त्या काळातील समाजावर झाला असणार. हा नमस्कार मात्र अधिक जाणता असेल. सगुण आणि निर्गुण दोन्हीही तो एकच आहे हे जाणतेपण आता तिच्यापास असेल. भक्तीमध्ये जाणतेपणाची अट नाही, पण 'कर्माचे डोळे ज्ञान' हे माऊलींचं सूत्र भक्तीचा लागू आहेच ना..
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥
श्रुती म्हणजे वेद. हे आपल्या धर्माच मूळ आहे. धर्माचं मूळ जेव्हा अवघ्या विश्वाचं मूळ शोधू जातं, तेव्हा त्यालाही हात टेकावे लागतात! ईश्वराचा शोध घेताना साक्षात वेद म्हणतात की ईश्वर म्हणजे हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. ज्याचा अनुमान श्रुती ग्रंथांना देखील लावता येत नाही असा हा गोविंदा आहे बरं! या दोन ओळींचं मानसशास्त्रीय अवलोकन करता वाटतं, की नकळतपणे या दोन ओळी लिहिणं म्हणजे सामान्य सकळांच्या मनातील खंत कमी करण्याचा खरंतर घालवण्याचा प्रयत्न आहे. "तो देव सगुण की निर्गुण हे आमच्यासारख्या साध्या लोकांना काही कळतंच नाही बघा" असं समजून स्वतःला गौण समजणाऱ्या भक्तांना सांगितलं आहे, की अहो प्रत्यक्ष वेदांना तो कळत नाही तिथे तुमची आमची काय गती? तुम्हाला त्याचा अनुमान बांधता आलं नाही तरी ठीक. पण अर्थात, तुम्हाला येत नाही हे ठीक कारण तुमची पात्रता नाही असं म्हणून माउली थांबत नाही. कारण शेवटी ती माऊली आहे ना! आपल्या बाळाला वरचा लाडवाचा डबा काढता येत नाही हे पाहून योग्य वेळी आईच डबा काढून लाडू हाती ठेवते अशी ही माउली. वेदांना सुद्धा न कळलेलं विश्वमाधुरीचं रहस्य आपल्या ओंजळीत अगदी सहज ठेवते. त्यात कुठलाही अभिनिवेश वा उपकार करण्याचा भाव नाही. कारण पुन्हा एकदा ती माऊली आहे हेच!
ईश्वर सगुण निर्गुण दोन्ही, म्हणजे मग तो दिसतो की नाही हो? जाणवतो की नाही? कसा जाणवतो? स्थूल रुपात की सूक्ष्म रूपात? राहून राहून काही प्रश्न पडू शकतात. तरी ते मागे न ठेवता पुढे अगदी लगेच सांगून टाकतात
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूलसूक्ष्म एक गोविंदु रे ॥२॥
तुज आकार म्हाणों की निराकररे ।
साकारु निरुकारु एकु गोविंदु रे ॥३॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥
वाटतं, की कुठलाही भेद करू नका कारण शेवटी सगळं म्हणजे हो एक गोविंद आहे. असं सांगू शकत होती की माउली. मग का केलं नसेल असं? माऊलींना थोडीच दीर्घ लेखनाचा सोस होता? याचं कारण म्हणजे सोपं करून सांगण्याची माऊलीची हातोटी. तिला माहीत असलेली आपल्या लेकरांची क्षमता आणि त्यामुळे महत्त्वाचा म्हणजे समोरच्याला ईश्वर कळावा, कुठलीच शंका राहू नये हा जिव्हाळा. स्थूल सूक्ष्म, साकार निराकार, दृश्य अदृश्य, या सर्व कोट्यांचा उल्लेख करून शेवटी सारं काही तो एक गोविंद आहे असं सांगितलं आहे. इथे मानसशास्त्राच्या दृष्टीने देखील उल्लेखनीय बाब अशी, की 'एक गोविंदु रे' या शब्दांची प्रत्येक चरणातील पुनरावृत्ती. या अभंगातून माऊलीला काय सांगायचंय? खरंतर 'एक गोविंदु रे' हेच. पण सगळ्या शंका उद्धृत करत आपल्या मनावर शेवटी 'एक गोविंदु रे' हे ठसविण्यासाठी ही पुनरावृत्ती. शेवटच्या चरणात माउली लिहिते
निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥५॥
राम जनार्दन यांनी म्हटल्याप्रमाणे गुह्य प्रकट करणे हा माऊलीचा स्वभावच आहे. इथे सुद्धा ईश्वराचं गुह्य प्रकट केल आहे. माऊलीने आपल्यासाठी खुलं केलं. पण अभिजात शालिनीता माऊलीच्या अंगभूत स्वभाव असल्याने, हे जे मी बोललो माझ्या सद्गुरूंच्या अर्थात निवृत्तीनाथांच्या प्रसादाने हे सांगायला माउली विसरत नाही. किंबहुना आवर्जून कृतार्थपणे सांगते. शेवटच्या चरणात मात्र 'एक गोविंदु रे' ऐवजी 'विठ्ठलु रे' हा झालेला बदल तितकाच महत्त्वाचा. कारण तो गोविंदच विठ्ठल होऊन पंढरपूरी निवास करतो आहे हे सर्व संतांनी अगणित वेळा सांगितलं आहे.
या भागातल्या 'एक' हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो. त्याचं कारण असं की सगुण निर्गुण, दृश्य अदृश्य, अशा दोन दोन कोटी सांगितल्या असल्या तरीही, त्या दोन दिसत असल्या तरी त्या म्हणजे एक गोविंद आहे हे माऊलींच प्रतिपादन दोनाकडून एकाकडे अर्थात द्वैताकडून अद्वैताकडे नेण्याचा हा सोपा प्रवास, म्हणून एक महत्त्वाचा आहेच. पण सोबतच एका गोविंदावाचून जगामध्ये दुसरं काहीच नाही ते सांगणं अध्याहृत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे 'तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग' इथे सुद्धा 'एक' हा शब्द याच अर्थाने आहे. हे संपूर्ण जग म्हणजे त्या एकाचाच विस्तार आहे. मग तो सगुण निर्गुण अशा अनेक प्रकारे झाला असता तरी शेवटी एकाचाच विस्तार आहे हे महत्त्वाचं. ईश्वराचं अवघं तत्वज्ञान किती सहज आणि सोपं करून सांगितलं माऊलींनी!
माऊलीची ही जिव्हाळ हातोटी पाहून, निर्गुणाला पडलेलं सगुणाचं सुंदर स्वप्न म्हणजे ज्ञानेश्वर माउली! असं आपोआप वाटू लागतं..
~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0