तुझ्यामाझ्यातले तुझेमाझेपण...
प्रेम हा शब्द विलक्षण आहे.. कितीतरी सूक्ष्म भावना, सूक्ष्म विचारांच्या ऐक्यातून प्रेमाचा उदय होतो. माणसाचं मन तरल आहे. या सूक्ष्म विचारांच्या , सूक्ष्म भावनांच्या विश्वात गढून जाणं हा तर त्या मनाचा आवडता छंद आहे. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला आवडणं हीच मुळात किती सुंदर गोष्ट आहे.. ही आवड जोपासताना आपण त्या व्यक्तीच्या कधी प्रेमात पडलो हे आपलं आपल्यालाही कळत नाही. हे न कळणं हेच प्रेमात महत्वाचं असतं. हे न कळणं म्हणजेच व्यवहार विसरणं.. प्रेम ही भावना व्यवहारापेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच ती भावना विलक्षण आहे. कुणी कुणासाठी काय केलं याचे हिशोब मांडण्याची तिथे गरज उरत नाही.. मुळातच तिथे गरज हा शब्द उरत नाही.. गरजेपलीकडे कुठेतरी एखादी व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. सहवासाची ओढ लागते तिथेच प्रेम बहरु लागतं. सहवासाप्रमाणेच स्पर्श देखील हवाहवासा वाटतो. या स्पर्शात प्रणय असला तरी स्पर्शाचं एक पावित्र्य असतं. चपला घालून देवळात जाता येत नाही. चपला काढून , हातपाय स्वच्छ धूवूनच आपण त्या प्रसन्न मूर्तींचं दर्शन घेतो तेव्हा मनाला समाधान वाटतं. स्पर्शाचंही तसंच आहे. प्रीतीच्या मंदिरात वासनेच्या चपला घालून गेलं की पावित्र्य भंग पावतं. तेव्हा वासनेचा त्याग करून स्पर्शाच्या पावित्र्याचा मान राखणं हेच प्रेमाला अभिप्रेत आहे. प्रेयसीचा पहिला स्पर्श प्रत्येक प्रियकरालाच हवाहवासा वाटतो. त्या स्पर्शाची ओढ किंवा तो स्पर्शाचा कैफच वेगळा असतो. पण त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्शात जशी प्रणयाची ऊब असते , तसा आपलेपणाचा किंबहुना वात्सल्याचा झराही असतोच. ज्याला प्रणयाबरोबरच हे वात्सल्य जाणवतं , तेव्हा त्याला प्रेयसीविषयी वाटणा-या प्रेमाबरोबरच ह्रदयातल्या एखाद्या जाणिवेत तिच्याविषयी आदरही वाटतो. हा आदर कायमच जिवंत असणं हेच त्या प्रियकराच्या प्रेमाचं पूर्णत्व असतं.. त्यामुळे आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला नुसता हात लावणं याला स्पर्श म्हणताच येणार नाही. समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर आणि आपलेपणाच्या भावनेचा गोड झरा ह्रदयात प्रवाही असणं याला अधिक महत्व आहे आणि तोच स्पर्श सार्थ आहे. प्रेमात कितीतरी गोष्टी असतात. एकमेकांना असणारी एकमेकाची ओढ, गुलाबी स्पर्श, मोग-याचा गजरा, चाफ्याचा गंध, अथांग समुद्राच्या हातात हात गुंफलेला किनारा, वा-याची झुळूक, लटका राग, खोटं खोटं भांडण, पहिला पाऊस, प्रणय विरह या आणि अशा कितीतरी गोष्टींची नावं सांगता येतील. काही गोष्टी प्रेमाचं प्रतीक, काही नातं, काही आपलेपणा शोधतात. पहिली भेट म्हणजे प्रेयसी आणि प्रियकरानं आपल्या प्रेमाला बांधलेलं जणू तोरणच असतं.. भेटवस्तू, कविता, भेटकार्ड यातून प्रेम व्यक्त करता येतं... तसं पुष्कळदा त्याग हे देखील प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे. त्याग प्रेमाला नवा अर्थ प्राप्त करून देतो. हल्ली प्रेमात मनातलं ओळखण्याला उगीचच एक महत्व प्राप्त झालंय. ती अवास्तव अपेक्षा आहे. खरंतर असं एका दिवसात जोडीदाराच्या मनात काय चाललंय हे ओळखायला कुणी मनकवडं नसतं. एकेका स्पंदनाला जोडीदाराचं स्पंदन भेटल्याशिवाय अर्थपूर्ण सहवास घडत नाही.. या सहवासातूनच हळूहळू मनातलं ओळखता येऊ लागतं. हल्ली 'वन मन्थ ॲनिवर्सरी' , 'फर्स्ट ॲनिवर्सरी' असं साजरं करुन प्रेम व्यक्त करण्याची पद्धत रुढ झाली आहे. यात गैर असं काहीच नाही. पण प्रेम साजरं करण्यासाठी विशिष्ट अशा दिवसावर आपण अवलंबून राहतो आणि नेमकं काहीतरी महत्वाचं काम हाती येतं आणि 'सेलिब्रेशन' होत नाही. मनाला रुखरुख लागून राहते. म्हणूनच प्रेमाच्या आणि भेटीच्या प्रत्येक क्षणी आयुष्य उधळून देणं म्हणजेच प्रेम साजरं करणं.. एकमेकांसाठी असलेले क्षण एकमेकांसाठीच जगणं ही आभाळाहूनही मोठी गोष्ट आहे.. भेटीतला एकेक क्षण वेचून तो जोडीदाराच्या ओंजळीत ठेवणं इतकं साधं सोपं प्रेम साजरं करता यायला हवं.. एकरुप होणं म्हणजे प्रेम.. ही एकरुपता मनापासून असायला हवी.. प्रेमात छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधता येतो. एखाद्या उदास क्षणी तिचा किंवा त्याचा चेहरा पाहिला तरी चांदण्यांना स्पर्श करण्याची उमेद मिळते. म्हणूनच प्रेम ही सर्वश्रेष्ठ भावना आहे. जे जगासमोर व्यक्त करता येत नाही ते जोडीदाराला मोकळेपणाने सांगता येतं, शब्दांशिवाय हातात हात गुंफून मौनात कितीतरी बोलता येतं.. एका ह्रदयाच्या फुलाचा दुस-या ह्रदयाला गंध येतो.. एकमेकांना एकमेकाची सवय लागते.. विरह साहवत नाही ..अशा प्रेमाची निश्चित व्याख्या करता येत नाही.. पण अनेक भाषांतल्या अनेक कवी मंडळींनी आपापल्या परीने शब्दाशब्दातून प्रेम फुलवलं आहे. त्यामुळे कवितेविना प्रेम अपुरं आहे असं उगीचच वाटत राहतं आणि कविता सुचते :'सहज प्रिये पाहिलेस तू एकवार माझ्याकडे ,मनास या जाणवले किती तुझे आपलेपण ..नयन हे नयनी गुंतले , अधीर जाहली दो ह्रदये ,बिलगले मला तुला तुझ्यामाझ्यातले तुझेमाझेपण...'- गौरव भिडेपुणे.१० फेब्रुवारी २०२४