गढवाली थाळी - काफली, चौसा

01 Feb 2024 09:00:00
 
गढवाली थाळी - काफली, चौसा
गढवाली थाळी - काफली, चौसा

गढवाल आणि कुमाऊ यांच्या पदार्थांमध्ये बराच फरक आहे. हे सगळे पदार्थ तुमच्यापर्यंत कसे पोहोचवायचे याचा विचार करत असतांना लक्षात आले कि थाळी ची कल्पना चांगली आहे. आपण सर्वानी राजस्थानी, गुजराती, मालवणी, जैन, मराठी, केरळ ची सद्या आणि अशा अनेक थाळी खाल्या असतील पण गढवालची थाळी सहसा पटकन कुठे मिळत नाही. त्यासाठी उत्तराखंड मधेच जावे लागेल. असो! गढवाली थालीत बरेच पदार्थ असतात पण काफली, पहाडी राजमा, चौसा याशिवाय थाळी पूर्ण होत नाही.

चौसा हा एका डाळीचा प्रकार आहे. उडद धुवून भाजून घेतात. उडदासोबत कधीकधी सोयाबीनही मिसळतात. हि डाळ शक्यतोवर दद्दू म्हणजे लोखंडाच्या कढईत भाजतात. त्यानंतर उडद बारीक करून घेतात. पूर्वी हि डाळ उखळात बारीक करायचे. धने, जिरे, लसूण, आलं, मिरे हे मसाले वाटून घेतात. कढईत मोहरीचे तेल/तूप गरम झाल्यावर त्यात जखिया म्हणजे रान मोहरी घालतात. लाल मिरच्या, हिंग, वाटलेला मसाला , हळद परतून घेतात. यात चोरू नावाचा पहाडात मिळणारा मसाला टाकतात. हे एक प्रकारचे खोड असते. दुणा नावाची पानेही फोडणीत टाकतात. त्यातच डाळीची पावडर मिसळतात. घट्टपणासाठी कणिक किंवा बेसन टाकून परततात. भाजण्यावर सगळी चौसाची चव अवलंबून असते. परतून झाले कि थोडे थोडे पाणी मिसळतात आणि गाठी होऊ नये याची काळजी घ्यावी. पातळसर डाळ झाली कि मीठ टाकून २० मिनिटे शिजवतात. आणि भातासोबत खायला देतात.

काफली अगदी पारंपरिक गढवाली पाककृती आहे. पालक धुवून बारीक चिरून घेतात. लसणाची पात किंवा लसूण चिरून घेतात. मोहरीच्या तेलात जखिया तडतडल्यावर त्यात लसणाची पात, मेथी, लसूण, किसलेलं आलं, हळद, धन्याची पावडर, लाल मिरची आणि चिरलेले टमाटे टाकून परततात. काही पध्दतीत मसाले आधी भाजून घेतात. टमाटे मऊ झाले कि पालक टाकून थोडी शिजवून घेतात. भिजवलेले तांदूळ वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवतात. याऐवजी बेसनही टाकू शकतो पण पहाडात तांदूळच टाकतात. पालक छान शिजल्यावर तांदुळाची पेस्ट टाकून नीट मिसळतात आणि थोडा वेळ शिजवले कि काफली तयार! ही भाजी रवीने घोटून तयार करतात. काफली सुद्धा मुख्यतः भातासोबत खातात. काफलीला काही लोक थेपली, धबडीही म्हणतात. काफली फक्त पालकची बनावत नाही तर गोड कारल्याची पाने, मुळ्याची पाने, मोहरीची पाने याचीही बनवतात. यात पहाडी पालेभाज्या मुख्यतः वापरतात.

चौसा म्हणजे मा कि डाल किंवा काली दालची पहाडी व्हर्जन. काफली हा पंजाबी साग किंवा मराठी पातळभाजीचा प्रकार आहे. काफली मुख्यतः हिवाळ्यात बनवतात कारण त्यावेळी खूप पालेभाज्या मिळतात. भारतीय भोजन किती परिपूर्ण आहे याची प्रचिती मला सतत येत असते. जवळपास जे पदार्थ मिळतात त्याचा वापर करून पौष्टिक जेवण बनवणे ही मानवी संस्कृती आहे पण भारतीय लोक हे जेवण जास्तीतजास्त चविष्ट बनवण्याचा प्रयत्न करतात.

पहाडी भागात माझे घर असावे. सकाळी अलार्म न लावता सकाळी सहा वाजता पक्षांच्या आवाजाने जाग यावी. वर्क फ्रॉम होम असले तर उत्तम किंवा जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन काम संपवावे. जेवताना बाहेरच्या लहानश्या शेतीतून भाज्या आणून जेवण बनवावे, सर्वानी गप्पा मारत जेवण संपवावे आणि चक्क १० वाजता मध्यरात्र झाली आहे असे समजून झोपी जावे. माझ्या शेकडो आयडियल स्वप्नांपैकी अजून एक स्वप्न! निसर्गाच्या जवळ राहणे कितीही हवेहवेसे वाटत असले तरी सोपे नसते हे मला माहित आहे पण टेक्नॉलॉजीने आज बऱ्याच गोष्टी शक्य होत आहेत तर हे का नाही? कदाचित असे होईलही. पाच सहा वर्षांनी असाच कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात, माझ्या घरी बसून मी लेख लिहीत असेन आणि त्यावेळी मी नोस्ट्रुडोमसची दूरची नातलग असल्याची फिलिंग येईल. हे घडेल कि माहित नाही पण निसर्गाकडे अर्ज करून ठेवला आणि वेळोवेळी त्यादिशेने पावले उचलली कि कधीतरी आपली फाईलही निसर्ग हातावेगळी करतो, या आशेवर तोपर्यंत राहावे इतकेच सध्या करू शकतो. तोपर्यंत आपल्या नेहमीच्या भाजीला फाटा देऊन पहाडी स्टाईलने भाज्या करून बघू शकतो.
--
Regards,
Sanika Bhokarikar
Powered By Sangraha 9.0