अलिप्त..

09 Dec 2024 15:10:53


अलिप्त..

अलिप्त या शब्दाचा शब्दकोषात अर्थ आहे. या शब्दाची व्युत्पत्ती कोषात व्युत्पत्ती देखील दिलेली असेल. पण आपल्या जगण्यात या अलिप्त शब्दाला सार्थ स्थान देणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. अलिप्त या शब्दाचा अर्थ अलग असा असून तो संस्कृतोत्पन्न आहे. हे असं अलिप्त म्हणजे अलग होऊन जगणं माणसाला कसं जमेल हाच मोठा प्रश्न आहे. पूर्णपणे अलिप्त होणं अशक्य आहे. ज्यांना सज्जन, साधू, संत वगैरे व्हायचं असेल त्यांनी अगदी पूर्ण अलिप्त व्हायला हरकत नाही. पण माणूस म्हणून जगताना या अलिप्त होण्यासाठी विशिष्ट वेळा, विशिष्ट गोष्टी, विशिष्ट विचार, विशिष्ट माणसे असेच काहीतरी निश्चित करावे लागेल. पण साऱ्यापासून अलिप्त राहण्याची मनाची तयारी पक्की हवी.

माणसाचे जीवन मोठे रहस्यमय आहे ते इतके की, पुढच्याच क्षणी काय होईल याचा अंदाज त्याला बांधता येत नाही. तेव्हा काही उत्तरे किंवा काही 'का'ची उत्तरे माणसाला स्वतःलाच ठाऊक नसतात. हल्ली दिनक्रम अगदी व्यस्त झाला आहे. काही जणांना तर दिवसाबरोबर रात्रीचाही हात धरुन चालावे लागते इतके काम असते. या धकाधकीच्या जीवनात विचार करणे, छंद जोपासणे, अगदी पाच मिनिटे केवळ स्वतःसाठी वेळ काढणे याचे महत्व कमी होत आहे. अर्थात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे हेच त्यामागे बऱ्याचदा महत्वाचे कारण असते. या साऱ्यामुळे शरीराबरोबरच मनालाही एक जखडलेपण आले आहे. यातूनच समोरच्याने विचारलेल्या प्रश्नाचा विचार करण्याऐवजी उत्तर देण्याची, कदाचित मनापासून इच्छा नसतानाही उत्तर देण्याची आपण जरा घाईच करतो, नाही का! ते उत्तर समाधानकारक नव्हते हे त्या व्यक्तीप्रमाणेच आपल्या स्वतःलाही जाणवते नि मग मनाची आणखी चिडचिड होऊ लागते. अशावेळी हा अलिप्त शब्द आपल्या मदतीला धावून येतो. प्रश्नातून आपल्याला अलिप्त होता येत नसले तरी प्रश्न विचारणाऱ्या, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीपासून आपल्याला अलिप्त होता येईल. अलिप्त होणे म्हणजे टाळणे असा मुळीच अर्थ नाही, तर अलिप्त व्हावे ते त्या व्यक्तीच्या नि आपल्या न जमणाऱ्या विचारातून कुणाकुणाला काही प्रश्न अर्थहीन चौकशीसारखे वाटत असतील, कुणाकुणाला त्या प्रश्नांचा मनस्तापही होत असेल. हल्ली 'तुला पैसे किती मिळतात, ते भविष्यात पुरतील का ', 'लग्न केव्हा करणारेस, तुम्ही उभयता मूल होण्याचा निर्णय केव्हा घेणार इथपासून ते अगदी आता निवृत्तीनंतर काय या प्रश्नापर्यंत कितीतरी प्रश्न यात सांगता येतील. यात विचारणाऱ्याचा उद्देश काही वेळा चांगलाही असेल. पण वर म्हटल्याप्रमाणे पुढच्या क्षणी काय होईल याची माहिती नसणारे रहस्यमय जीवन आपण जगत आहोत. तेव्हा या प्रश्नांची निश्चित उत्तरे आपल्याजवळ बरेचदा नसतात. अशावेळी समोरचा काय नि का विचारतो आहे या विचारातून अलिप्त व्हावे नि खुशाल निर्विकार उत्तर द्यावे. म्हणजे मग आपली चिडचिड कमी होते नि रागापासून आपण अगदी अलिप्त राहतो. हे प्रश्न खरंतर साधे किंवा रोजच्या जगण्यातीलच वाटत असले तरी लग्न होत नाही नि त्याचबाबत लोक सदैव विचारतात या एका प्रश्नानी बऱ्याच तरुण-तरुणींवर समुपदेशकाकडे, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची वेळ आणलेली आहे. तेव्हा प्रश्नाच्या उद्देशातून आणि गांभीर्यातून अलिप्त होता आले म्हणजे त्रासाची तीव्रता कदाचित कमी होईल..

या अलिप्ततेतून मोठे ध्येय साध्य होणार नाही. पण जगण्याचा आनंद घेता येईल.. अलिप्त कशातून व्हावे हे आपले आपणच ठरवायला हवे. पण अलिप्त न होण्याच्या जागादेखील आहेत. त्यातलीच एक जागा म्हणजे छंद.. छंदातून माणसाने अलिप्त होऊ नये. किंबहुना, स्वतःच्या छंदांशी छान मैत्री करावी. म्हणजे मग कशात गुंतायचे नि कशातून अलिप्त व्हायचे याचे उत्तर आपल्याला ते छंदच देतील! एखाद्या छानशा कवितेतून, गप्पा आणि गाण्यांच्या कार्यक्रमातून, एखादा खेळाचा सामना पाहण्यातून किंवा आवडतं गाणं सकाळी ऐकून त्याच्या ओळी आठवून आठवून गुणगुणण्यातून आपण हल्ली अलिप्त झालो आहोत. ह्या साऱ्या छान छान गोष्टीतून अलिप्त राहणं हेच आपल्या त्रासाचं, मनस्तापाचं, कामाच्या ताणाचं कारण असावं. ताणातून अलिप्त होण्यासाठी छंदांचा हात हातात घ्यायला हवा. पण आपण अगदी उलटच करीत आहोत. या जन्मावर या जगण्यावर शतदा काहीतरी छानसं गीत गुणगुणत रहिलं म्हणजे हळूहळू ताणतणावातून अगदी अलिप्त व्हायला आपल्याला जमेल..

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0