अभी ना जाओ छोड कर..

युवा विवेक    19-Dec-2024
Total Views |


अभी ना जाओ छोड कर...

 

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी मॅच पावसाच्या प्रभावामुळे काल ड्रॉ झाली. या मॅचचा रिझल्ट लागल्यावर पत्रकार परिषदेत भारताच्या एका मॅचविनर, गेमचेंजर, हुशार, सृजनशील, गुणी खेळाडूनी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन अश्विन आजपासून भारतीय संघात दिसणार नाही हा विचार करूनच मन थोडंस अस्वस्थ झालं. मी बिशनसिंग बेदी, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंह यांना खेळताना प्रत्यक्षात बघितलं नाही, पण रविचंद्रन अश्विनला मी खेळताना बघितलंय. त्याच्या करियरचा काही भाग मला प्रत्यक्षात अनुभवता आला यातच मी स्वतःला भाग्यवान समजतो.

 

अश्विन म्हणजे भारताचा सर्वोत्तम स्पिनर, अश्विन म्हणजे खालच्या फळीतील एक महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्ट फलंदाज, अश्विन म्हणजे भारत सलग बारा वर्षे घरात एकही शृंखला न हरण्याचे कारण, अश्विन म्हणजे ११ शृंखलांचा ‘Player of the Series’, अश्विन म्हणजे नवनिर्मितीचे दुसरे नाव, अश्विन म्हणजे कर्णधाराचा सगळ्यात विश्वासू गोलंदाज आणि अश्विन म्हणजे अंपायरएवढेच किंबहुना त्याहून जास्त क्रिकेटचे नियम माहित असणारे एक चालते-बोलते पुस्तक..!

 

‘कल और आएंगे नग़्मों की खिलती कलियां चुनने वाले,
मुझ से बेहतर कहने वाले तुम से बेहतर सुनने वाले...’

याच ओळींना अनुसरून अश्विनच्या जागीही कुणीतरी येईलच. कदाचित तो खेळाडू अश्विनपेक्षा चांगलाही असेल, पण अश्विनने जे काही केले आहे ते करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्याला वेचावं लागलं. ३८ ते ४० हे वय साधारण इतर क्षेत्रांमध्ये उच्च पदं गाठण्याचं वय असतं. खेळाडूंचं, चाहत्यांचं आणि क्रिकेटचं हे दुर्भाग्य आहे, की खेळाडू या वयात आले की त्यांना क्रिकेटला निरोप द्यावा लागतो.

 

मी मुद्दाम या लेखात एकही आकडेवारी दिलेली नाही, कारण बरेच खेळाडू असे असतात ज्यांना समजून घेण्यासाठी फक्त आकडेवारी पुरेशी नसते. अश्विनसुद्धा याच निकाशातील खेळाडू! तो अजून २-3 वर्षे संघात थांबला असता, तर नक्कीच त्याने अनिल कुंबळेचा भारतासाठी सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड मोडला असता.

 

रविचंद्रन अश्विनने भारताला बरंच काही दिलं आहे. ‘The most intelligent Captain India never had’ म्हणजेच अश्विनने काल निवृत्तीची घोषणा केल्यावर आपोआपच तोंडातून शब्द निघाले की,
‘अभी ना जाओ छोड कर, के दिल अभी भरा नही..!’

   

- देवव्रत वाघ