खाऊची गोष्ट..

युवा विवेक    09-Nov-2024
Total Views |



शहाण्यासारखा वागलास तरच खाऊ मिळेल, हे वाक्य आपण लहानपणी ऐकलेलं असतं. शहाण्यासारखं वागून कित्येकांनी तो खाऊ पटकावलाही असेल.. म्हणजेच 'खाऊ' नावाच्या गोष्टीची ओळख आपल्याला अगदी बालपणीच होते. बालपणी अनेक लोक आपल्याला खाऊ देत असतात. कुणी बिस्कीट, कुणी खोब-याची वडी, कुणी आलेपाक तर हल्ली बरेचदा चाॅकलेटही देतात. आपण मोठे होत जाऊ तसं खाऊ ही संकल्पना आपण विसरत जातो. पण मला मात्र अजूनही कुणी खाऊ दिला म्हणजे तितकाच आनंद होतो! कुणीही दिलेला खाऊ मी अतिशय आवडीने खातो. या खाऊ नावाच्या संकल्पनेत अनेक पदार्थांची रेलचेल असते. लाडूपासून चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ खाऊ असतात. हल्ली पदार्थ नवनवीन येत आहेत. पण तरीही लाडू, आलेपाक किंवा खोब-याची वडी वगैरे पारंपारिक पदार्थ अजूनही आपुलकीने हातावर ठेवले जातात नि तितक्याच आवडीने ते खाल्लेही जातात. या प्रत्येक पदार्थाची म्हणजेच खाऊची छानशी आठवण असते, त्या आठवणीची गोष्ट असते. चांगला अभ्यास करणे, शहाण्यासारखे वागणे, आजीचे किंवा आजोबांनी सांगितलेले काम ऐकणे, निरागस असणे असे कितीतरी या खाऊच्या गोष्टीचे उगम असतात. आपल्या घरी कुणी काका, मामा, आत्या वगैरे आले की ते येताना आठवणीने आपल्यासाठी खाऊ आणत असतात. त्यांचं ते प्रेम नि आपुलकी पाहून आपल्याला तो खाऊचा पुडा किंवा डबा उघडून लगेच तो खाऊ आपल्याला खावासा वाटतो. पण तेव्हा आई मात्र आपल्याला रागावते नि म्हणते, पाहुणे गेल्यावर खाऊ खा. आत्ता स्वयंपाकघरात ठेवून ये बरं.. तेव्हा आपण थोडेसे हिरमुसतो. ही आठवण तर आपण सर्वांनीच अनुभवली असेल.

पूर्वी सारे लोक आपापल्या गावी राहत असत. दिवाळीनिमित्त, उन्हाळी सुटीत किंवा धार्मिक कार्याच्या निमित्ताने एकमेकांकडे येणे-जाणे होत असे. तेव्हा आपापल्या गावचा प्रसिद्ध असा खाऊ ते येताना आणत असत. खाऊविषयी तेव्हा अधिक आकर्षण असे. केळी, आंबे, फणस, साटं, लाडू, वडी, पेढे, जिलब्या, मुरमुरे, शेवचिवडा, दाणे, रेवडी, चिक्की, गोडी शेव, पेपरमिंट असे वेगवेगळ्या गावाहून येताना लोक खाऊ आणत. ते खाताना भारी मौज येई. ग्लुकोजचे बिस्किट नि रावळगावचे चाॅकलेट क्वचितच खाऊ म्हणून दिले जाई. बाकी बरेचसे पदार्थ घरी किंवा आठवडा बाजारातून आणले जात. गावची जत्रा असली म्हणजे तर खाऊला उधाण येई. एकावर एक रचून ठेवलेले पेढे, चुरमु-याचे लाडू, भाजके पोहे, आवळे, बोरं, चिंचा यांचे रचून ठेवलेले ढीग डोळ्यांना अगदी तृप्त करत. आईकडे आपण तो खाऊ हक्काने मागत असू. हळूहळू खाऊच्या पदार्थांचे प्रकार बदलू लागले. वेफर्स नि बिस्किटांचे निरनिराळे प्रकारांनी खाऊच्या गोष्टीत 'एण्ट्री ' घेतली. भेळ, सामोसा वगैरे मधल्या वेळची खाण्याला देखील खाऊ म्हणून जनमान्यता मिळू लागली. अलीकडे खाऊच्या गोष्टीत चाॅकलेटच्या बंगल्याची किंमत वाढू लागली आहे.

काही खाऊ विशिष्ट ऋतू आणि विशिष्ट वेळेत खाल्ले जात. चकली, चिवडा, लाडू, अनारसा, करंजी वगैरे पदार्थ दिवाळीत खायला मिळत. हल्ली हे पदार्थ बारमाही फळासारखे केव्हाही मिळतात. कैरीचे तक्कू करण्यासाठी गुढीपाडव्यापर्यंत वाट पहावी लागते. पुढे महिन्या-दोन महिन्यातच आमरस नावाची 'खास' डीश मिळते. मकर संक्रांतीला तीळगूळाच्या वड्या गारवा जरा कमी करतात. महाशिवरात्रीला मिळणा-या कवठाची चव निराळीच असते. रसाच्या गु-हाळात छनछन वाजणारा घुंगरु मनात गोडवा निर्माण करतो. दहीहंडीचा दहीकाला तर कृष्णाला देखील फार आवडतो. गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे उकडीचे मोदक खाल्ले म्हणजे दुपारीसुद्धा साखरझोप लागते! शाळेबाहेर मिळणा-या खारावलेल्या चिंचा, आवळे, पक्षी नि प्राण्यांच्या आकाराच्या गोळ्या, क्वचितच मिळणारा बर्फाचा गोळा बालपणाची रंगत वाढवतात, तर मिसळ तरुणपण सुखाचे करते. कडू औषधांच्या गराड्यात अडकलेले म्हातारपण जुना मित्र भेटलेल्या गप्पा आणि बटाटेवड्यात सहज विरुन जाते. आईसक्रीम नावाचा पदार्थ अबालवृद्धांचा आनंद द्विगुणित करतो. ही खाऊची गोष्ट मधल्या वेळच्या भूकेला जास्त रंगतदार होते. पैसे देऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ विकत घेऊ शकतो पण खाऊच्या गोष्टीला आकार मिळतो तो एखाद्या म्हातारीने आपल्या हातावर ठेवलेल्या खोब-याच्या प्रेमळ वडीमुळेच!

- गौरव भिडे