माझ्या २० वर्षाच्या आयुष्यात २० वेळा आलेल्या प्रत्येक दीपावलीचं शब्दचित्र थोडक्यात मांडायचं झालं तर ते असं असेल! यंदा मात्र हे चित्र बदललं! आपण काढेललं प्रत्येक रंगीत चित्र हे तसंच राहत असलं तरी आयुष्याचं चित्र बऱ्याचदा, अगदी क्षणाक्षणाला बदलत राहतं. दिवाळी असो किंवा आणखी कोणता सण असो, ज्या जागेला आणि ज्या माणसांना आपण 'घर' आणि 'घरचे' म्हणतो अशा माणसांपासून लांब राहून सण साजरा करणं याला स्वातंत्र्यापेक्षा, एकांतापेक्षा एकाकीपणाचं आणि हतबलपणाचं विशेषणच लावता येतं. लहान होते तेव्हा कोणीतरी एखाद्या सणाला घरी नसेल, परगावी असेल तर फार अप्रूप वाटे. बाहेर गावी, वेगळ्या माणसांसोबत एखादा सण साजरा करताना कोणाला पाहिलं की एकदा असं काहीतरी अनुभवायला हरकत नाही असं वाटून जाई. पण हा प्रसंग जेव्हा माझ्याच आयुष्यात येऊन उभा राहिला तेव्हा प्रत्येक सणाच्या दिवशी गेल्या वर्षी आपण या वेळी ते काम करत होतो, अमुक वेळी त्यांना भेटलो होतो असा विचार निदान ५० वेळा तरी डोकावून गेला. शिक्षणासाठी, कामासाठी परगावी येणं म्हणजे निदान सणाच्या दिवशी तरी आपण आपल्या घरी परत जाऊ अशी आशा मनात ठेऊनच प्रवासाला निघणं. पण एकदा घराबाहेर पडून गावाची वेस ओलांडली की अनेक गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या होऊन जातात. त्यामुळे या वर्षी अनेक सण मी नव्या शहरात, नव्या माणसांसोबत साजरे केले. नव्या पद्धती, नवे विचार, नवे अनुभव, नव्या आठवणी! नव्याचं नवेपण खरं सांगू तर सुरेख होतं. चार गोष्टी वेगळ्या शिकता येणं आणि करता येणं याला जगणं म्हणतो ना आपण? पण दिवसाअखेर घरचे विचार डोक्यात फक्त डोकावत नाहीत तर अंथरूण पांघरूण घेऊनच येतात वस्तीला! बरं आपल्याला काय वाटतं वगैरे हा भाग निराळा पण जेव्हा आपली प्रेमाची माणसं आपण तिथे नसण्याबद्दल बोलू लागतात तेव्हा ' फक्त असण्याला ' सुद्धा किती महत्त्व असतं याची जाणीव होऊ लागते. आपण नसण्याने काय आणि कसं बदलतं हे जेव्हा दिसून येतं तेव्हा एकाकीपणाची जागा हतबलपणा घेतो. पुढच्या वेळी काहीही झालं तरी हे चित्र आपल्याला हवं तसंच असलं पाहिजे असं मनाला, बुद्धीला, देवाला, नियतीला आणि आणखी ज्या ज्या गोष्टी आपलं आयुष्य कसं असेल हे ठरवतात त्यांना ठणकावून सांगितलं जातं.
या सगळ्यात एक मात्र आहे की असे दिवस संपण्याआधी हरवलेला उत्साह, आशा, आनंद, हसू हे सगळं परत कशाने येत असेल तर ते आपल्या माणसांसोबत आपलं जे नातं जोडलं गेलेलं असतं त्यामुळे. ते घट्ट असेल, खरं असेल, प्रेमाचं असेल तर अंतर कितीही असलं तरी आपल्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाही. यंदा माझ्यासाठी दीपावली व्हिडिओ कॉल्सनी भरून गेलेली होती. ज्या ज्या क्षणाला माझा धीर संपत आहे असं वाटून जायचं तेव्हा तेव्हा नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांपैकी कोणा ना कोणाचा फोन किंवा मेसेज आलेला दिसायचा. मला वाटतं की शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये, दोन्हीमध्ये समान ताकद असते. आणि या दोन्ही ताकदी एकत्र आल्या की कोणत्याच नात्याबद्दल कोणतीच शंका राहत नाही. माझ्या आणि माझ्या प्रेमाच्या माणसांमध्ये भलेही अंतर होतं पण शंका मात्र आता काडी मात्रही उरलेली नाही. भलेही या वर्षी सण साजरा करताना माझी माणसं माझ्या आजूबाजूला नव्हती, पण माझ्याकडे मला माझी म्हणता येतील अशी माणसं मात्र नक्कीच होती.
मला वाटतं की आपल्या माणसांपासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला हे कुठे ना कुठे जाणवत असेल. ही कृतज्ञता मनात बाळगून आपण जगत राहतो पुन्हा आपल्या माणसांना भेटू त्या दिवसाची वाट बघत! कारण आपल्याला एक खात्री नक्की असते की ज्या दिवशी आपण पुन्हा आपल्या माणसांसोबत असू तो दिवस आपण आणि ते सगळेच जण सण असल्या सारखा साजरा करतील! आवडते पदार्थ बनतील, किस्से सांगितले जातील, हसून हसून सगळेच जण हळूच रडायला लागतील. असं चित्र समोर दिसू लागलं की साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा या पंक्ती वर जितका विश्वास आहे तितकाच विश्वास वाचताना कितीही बालिश वाटत असलं तरी ' पुन्हा भेटू आपल्या लोकां, तोचि दिवाळी दसरा ' याही वाक्यावर बसू लागतो!
~ मैत्रयी रश्मी मकरंद सुंकले