एक अनोखं विश्र्व..!

27 Nov 2024 14:28:42

 
एक अनोखं विश्र्व..!

 
जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही, तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट करायची नसते, तेव्हा त्या पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठलही सोयरसुतक नसते..!

आपण अनेकदा चालता बोलता म्हणून जातो की मनाच्या विरोधात जावून खूप काही आपण करू शकतो किंवा करायला हवं पण जेव्हा मनाच्या विरोधात जावून आपण काही गोष्टी करत असतो अन् त्यात जरी आपल्याला यश मिळत असेल, तरीही मनाला हवं असलेलं समाधान त्यातून आपल्याला भेटत नसते..!

अगदी आपण ठरवूनही किंवा मनाला कित्येकवेळा मारून त्याच्या विरोधात जावून कुठल्याही गोष्टी केल्या ज्या आपल्याला किंवा आपल्या स्वभावाला योग्य वाटत असल्या तरीही मनाला त्या पटत नसेल तर मानसिक समाधान आपल्याला मिळत नाही. हळूहळू अशा गोष्टींचा किंवा मनाला समाधान भेटणार आहे, अशा गोष्टी नाही भेटल्या की आपण आपोआपच मानसिक तणावात जातो अन् मानसिक आजाराचे निदान आपल्याला होते. यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नसते किंवा कोणाशी बोलायचीसुद्धा गरज नसते हे आपल्याला आपलेच आपोआप कळून चुकते..!

मनाच्या विरोधात जावून घेतलेले निर्णय एका स्टेपपर्यंत वाढले की मग मनाला घेऊन आपण फार विचार करायला लागतो मग आपलं मन आपल्याशी बोलू लागते. या स्टेपपर्यंत शक्यतो फार कुणी जात नाही, एक तर तो अर्ध्यातच आपल्याला संपवतो किंवा आपल्या मनाला मारत उभे आयुष्य काढण्याची तयारी तो ठेवतो..!

अन् उभे आयुष्य जो मनाला मारून काढत असतो खूप संवेदनशील किंवा चार चौघात न रमणारा असतो. त्याला माणसांचा सहवास नकोसा असतो, त्याला फक्त मनाशी संवाद करायला भेटेल अशा ठिकाणी तो तासंतास कोणाचीही उपस्थिती नसतांना, तो एकांताशी स्वगत करत, मनाशी मनाच्या गोष्टी करत, शून्यात हरवलेलं आपलं विश्व अन् भूतकाळात झालेल्या चुका आठवत त्याची वजाबाकी बेरीज करत बसलेला असतो..!

मनाला मारून जगणारे माणसं हे खूप आयुष्य जगतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांना कुणीही नको असते. कारण त्यांची प्रत्येक एक गोष्ट ठरलेली असते, प्रत्येक एका गोष्टी मागे त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. अशी माणसं वेळीच योग्य दिशेला गेली तर खूप पुढे जातात नाहीतर, त्यांचं हे आयुष्य फक्त प्लॅनिंग करण्यात जातं. ते ही इतक्या सर्व बारीक सारीक गोष्टीत की, ते एकांताशी सांजेच्या वेळी मनाशी स्वगत करत बसले तर ते बसल्या जागेवर आपण का बसलो आहे अन् समोर दिसणाऱ्या प्रत्येक ये-जा करणाऱ्या माणसांच्या आयुष्याचे संदर्भ ते लावत बसलेले असतात अन बहुतांश वेळा सत्तर टक्के त्यांचे हे हे संदर्भ अगदी बरोबर निघतात..!

कारण अशा मानसिकता खचलेल्या असो किंवा मनाला मारून जगत असलेल्या व्यक्तींचे आपल्या सभोवताली घडत असलेल्या एक अन् एक गोष्टीवर इतके बारीक लक्ष असते की, कधीतरी ते रस्त्यानं चालत असताना आपले पाऊल पाच पाऊले टाकल्यावर सहावे पाऊल बरोबर तितक्याच अंतरावर टाकते का याचे सुद्धा गणित ते चालताना वेळोवेळी घेत असतात...

वर सांगितल्याप्रमाणे ही असं आयुष्य जगणारी माणसं मुळातच खूप हुशार असतात. त्यांच्या आत अनेक अशा गोष्टी दडलेल्या असतात की, ज्या खूप काही वेगळ्या असतात, ज्यांचा उलगडा खूप सहज होवू शकत नाही.आपल्या या गोष्टी सांगायला त्यांना कुणी जवळचं विश्वासातले भेटले की ते त्या व्यक्तीच्या एका वाक्यावर त्यांचे कमीत कमी तीन वाक्य तरी बोलता त.कारण त्यांना आपलं ऐकून घेणारे अन् आपल्याला समजून घेणारं कुणी हवं असतं..!

हो ही इतके बोलणारी तीच माणसं असतात जी शब्दानेसुद्धा कुणाला बोलत नाही, ज्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे एक कथा असते, त्यांच्या प्रत्येक गोष्टी करण्यामागे एकच कारण राहते अन् खूप सर्व बारीक सारीक गोष्टींना घेऊन केलेलं प्लॅनिंग असते..!

 

- भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0