‘A View To A Kill’

26 Nov 2024 12:50:52


‘A View To A Kill’

 

नवीन वर्षाचा पहिला कसोटी सामना सिडनीमध्ये १-१ च्या बरोबरीने सुरू होणार होता. सिडनी मैदानाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटचा इतिहास वसलेला आहे. दोन्ही संघांकडे सिरीजमध्ये अजेय बढत घेण्यासाठी ही चांगली संधी होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन नवीन, तर दोन प्रसिद्ध खेळाडू खेळत होते. फास्ट बॉलर नवदीप सैनी आणि फलंदाज विल पुकोस्की यांना त्यांची ‘Test Cap’ मिळाली. त्याचसोबत जगातले दोन सर्वोत्तम ओपनर्स डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा हे त्यांच्या संघांमध्ये वापसी करत होते.

 

चौथ्याच ओवरमध्ये सिराजने वॉर्नरला माघारी पाठवले, पण यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकामागे एक पार्टनरशिप्स होत गेल्या. भारतीय संघ दुसरी विकेट शोधत होता. पुकोस्कीने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात अर्धशतक केले. नवदीप सैनीने पुकोस्कीलाच बाद करीत त्याची पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी विकेट घेतली. स्टीव स्मिथ मैदानात आला. आत्तापर्यंत स्मिथसाठी ही शृंखला फलदायी ठरली नव्हती, पण यावेळी त्याला काहीतरी वेगळं, काहीतरी मोठं करायचं होतं. पहिल्या दिवशी ५५ ओवर्समध्ये ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सच्या नुकसानावर १६६ धावा केल्या होत्या.

 

दुसऱ्या दिवशी २०६ धावा असताना जडेजाने लाबुशेनला ९१ धावांच्या वैयक्तिक स्कोरवर माघारी पाठवले. काही वेळाने वेडही माघारी परतला. वेडच्या पाठोपाठ एक एक करून ऑस्ट्रेलिया विकेट्स गमावू लागली, पण स्मिथ अजूनही मैदानावर होता. त्याने २०१७ नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात शतक पूर्ण केले. जडेजाच्या एका अविश्वसनीय थ्रोने स्मिथ धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ ३३८ धावांवर बाद झाला.

 

भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीसाठी आले. दोघांनी संघाला एक चांगली सुरुवात दिली. ७० धावा असताना रोहित बाद झाला. गिलने त्याचे अर्धशतक केले आणि लगेच विकेटही गमावली. भारतीय संघांनी ८५ धावांवर दोन्ही सलामी फलंदाज गमावले होते. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस संघाने ९६ धावा केल्या.

 

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीस पुजारा आणि रहाणे चांगल्या लयीत दिसत होते, पण काही वेळाने संघाच्या ११७ धावा असताना रहाणे बाद झाला. विहारीही थोड्या वेळाने धावबाद झाला. पुजारा संयमाने खेळत होता. पुजारा जितका वेळ मैदानात असतो, तितका वेळ प्रतिस्पर्धी वैतागलेले असतात हे सर्वांनी बघितले आहे. त्याने १७४ चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केले. हेजलवूडने पंतची विकेट घेतली. त्याच्या पाठोपाठ पुजाराही बाद झाला. काही वेळाने अश्विनही धावबाद झाला. एकामागे एक विकेट्स पडत होत्या आणि जडेजा सगळ्यांची ये-जा बघत होता. बुमराह धावबाद झाला आणि भारताच्या नावे एक रेकॉर्ड आला, एका इंनिन्ग्समध्ये ३ रनआउट! जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली. अखेरीस २४४ धावांवर भारतीय संघ बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडे एक चांगली ९४ धावांची बढत घेतली होती.

 

जेव्हा प्रतिस्पर्ध्यांकडे एक चांगली बढत असते, तेव्हा पुढील इंनिंगमध्ये ते अजून आक्रमक खेळतात. ३५ धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर बाद झाले. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे एकूण १९६ धावांची बढत होती. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. लाबुशेनने अर्धशतक झळकावले आणि ७३ धावांवर सैनीने त्याला माघारी पाठवले. त्याच पाठोपाठ वेडही माघारी गेला. स्मिथनेही अर्धशतक केले आणि अश्विनने त्याला माघारी पाठवले. कॅमरन ग्रीन त्याची ताकद सगळ्यांना दाखवत होता. टीम पेन आणि ग्रीनची भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती. शेवटी ८४ धावांवर ग्रीन बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव ३१२ धावांवर घोषित केला. आता भारताला जिंकण्यासाठी ४०७ धावांची गरज होती.

 

भारताची इंनिंग सुरू झाली. पुन्हा एकदा रोहित आणि गिल एक चांगली भागीदारी करू लागले. ७१ धावा असताना गिल माघारी परतला. रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि लगेच माघारी परतला. भारतीय संघाने ९१ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. पुजारा आणि रहाणेने टिकून पुढे दिवसाअखेर आणखी एकही विकेट जाऊ दिली नाही.

 

पाचव्या दिवशी भारताला जिंकायला ३०९ धावा हव्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स! पुजारा एका बाजूने टिकून खेळत होता. या धावसंख्येच्या पाठलागाची सुरुवात झाली आणि दुर्दैवाने कर्णधार अजिंक्य रहाणे लगेचच बाद झाला. ऑस्ट्रेलियाची बाजू अजून बळकट झाली. रिषभ पंतला हनुमा विहारीच्या पुढे पाठवण्यात आले. पुजारा मैदानात असल्याने प्रतिस्पर्धी वैतागतात आणि याचा फायदा सोबतच्या फलंदाजाला मिळतो. पंत काही वेळ त्याच्या स्वभावाविरुद्ध म्हणजे डिफेन्स करून खेळत होता. पण ३०-४० बॉल खेळल्यानंतर पंत आक्रमक झाला. त्याने नेथन लायनला पुढे येऊन एक चौकार आणि षटकार मारला. आता पंत त्याच्या लयीत आला होता. मैदानात ‘रिषभपंती’ सुरू होती. त्याने अर्धशतक पूर्ण केले. टिकून आणि मारून खेळणारी ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरत होती.

 

पहिले सेशन संपले. आता जिंकण्यासाठी २०१ धावांची गरज होती. दोघांनीही त्यांच्या खेळ तसाच चालू ठेवला. पुजारानेही त्याचे अर्धशतक केले. सगळा माहोल बदलत होता. भारत वापसी करत होता! रिषभला आता सामना जिंकायचा होता. तो ९७ धावांवर खेळत होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभ आउट झाला. आता हनुमा विहारी मैदानात आला. त्याला त्याचे संघातील स्थान प्रबळ करणाऱ्या खेळीचा शोध होता. याहून चांगली संधी त्याला मिळणार नव्हती. पुजारा आणि विहारी दोघेही चांगले खेळत होते. दोघांकडेही एक मोठी भागीदारी करून खेळ भारताच्या दिशेने झुकवण्याची संधी होती, पण एक धाव घेताना विहारीला दुखापत झाली. त्याला नीट पळता येत नव्हते. तरीही त्याने मैदानातच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याला लय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. याच थोड्या वेळात पुजारा बाद झाला. जडेजाला पहिल्या डावात दुखापत झालेली असल्याने त्याच्याऐवजी अश्विन मैदानात आला.

 

इथे ऑस्ट्रेलियाला खेळ जिंकल्यासारखेच वाटत होते. उरलेल्या फलंदाजांना घाबरवणे, कदाचित दौऱ्यात आणखी एखादी दुखापत करणे एवढाच खेळ आता त्यांच्या हिशोबाने राहिला होता. बरेचदा क्रिकेटमध्ये असे ‘हिशोब’ चालूनही जातात, पण ही वेळ वेगळी होती. अश्विनलाही पाठीची दुखापत झाली होती. दोघांमधील एकाला नीट धावता येत नव्हते, तर दुसऱ्याला नीट उभे राहता येत नव्हते. भारतीय संघात सातत्याने दुखापतग्रास्तांची संख्या वाढत होती. त्यात ऑस्ट्रेलियाची अशी बॉलिंग बघून त्याचे जिंकणे जवळपास निश्चित वाटत होते. आता दोघांकडेही डिफेन्स करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. अश्विन आउट होण्यापासून वाचत होता, पण शरीरावर लागणाऱ्या चेंडूंपासून नाही. भारतीय संघ आता किती वेळ टिकून राहतो, हे या दोघांच्या सहनशक्तीवर अवलंबून होते.

 

दोघांनीही साधारण ५०-६० बॉल्स प्रत्येकी खेळले होते. तरी अजून ३० ओवर्स टिकायचे होते. हे सगळं बघून सामना जिंकणे तर दूरच पण सामना वाचवणेदेखील असंभव वाटत होते. जर तुमचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया असेल, तर स्लेजिंग होणे जवळपास निश्चितच असते. आधीच दुखापत, समोर जगातला सर्वोत्तम गोलंदाजीचा मारा आणि स्लेजिंग या सगळ्या गोष्टी झेलत अश्विन आणि विहारी खेळत होते. या दोघांचा ताळमेळ इतका चांगला झालेला की, दोघे चेस्टगार्डची अदलाबदली करत होते. ऑस्ट्रेलियासाठी ही वेळेची बरबादी होती; आणि त्या वेळी वेळच सर्व काही होतं! दोघांना चारही दिशांनी घेरले होते. टीम पेन, लाबुशेन, वेड हे सगळे या दोघांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. भारतासाठी ही या शृंखलेतील सगळ्यात कठीण परीक्षा होती. या दोघांना मानसिकदृष्ट्या सशक्त राहायचे होते, अजून फक्त काहीच वेळ! दोघांनीही संघासाठी त्यांची ‘बेस्ट’ खेळी दिली. हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विनने भारताला सुरक्षित केले. ऑस्ट्रेलिया पूर्णपणे ‘सदम्यात’ होती. अश्विनने एकूण १२८ चेंडू खेळून ३९ धावा केल्या, तर हनुमा विहारीने १६१ चेंडू खेळून २३ धावा केल्या. दोघांनी मिळून एकूण ४२.४ ओवर्स खेळून काढल्या ज्यात फक्त ६२ धावा केल्या.

 

पूर्ण जग अश्विन आणि विहारीच्या धैर्याला सलाम करत होते. जिंकणे किंवा हरणे याच्या पलीकडे गेलेल्या या सामन्यात एकाग्रता, दृढता आणि खेळभावना यांचे असे उदाहरण सर्वांनी बघितले, जे याआधी कधीच बघितले गेले नव्हते.

   

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0