मला सिटी बस मिळाली होती, पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेनं बस धावत होती. मोबाईलमध्ये शेवटची ४ टक्के चार्जिंग राहिलेली. मैत्रिणीला ती वाट बघत राहील म्हणून बस मिळाली आहे असा टेक्स्ट केला. अन्; मी पुन्हा पुण्यात कधी येणं होणार ? कधी पुणे आपल्याला त्याचा एक भाग करून घेईल? कधी मला पुण्यात नोकरी भेटल ?
असे असंख्य प्रश्न अन् त्यांना मनाचीच उत्तरे देत, मी अंधारलेल्या वाटेत स्ट्रीट लाईटच्या उजेडात प्रकाशमय झालेलं पुणे शहर बघत प्रवास करत होतो.
तितक्यात मैत्रिणीचा टेक्स्ट आला, तिलाही कॅब मिळाली होती. अन् ती ही कदाचित काहीशा अनिच्छेनेच प्रवासाला लागली होती. दोन दिवसांचा पुण्यातील मैत्रिणीचा सहवास कायम आठवणीत राहील असा होता. पण आता विचार करून थोडीच पुन्हा भेट होणार होती.
रात्रीच्या दहाची "महाराष्ट्र एक्सप्रेस" मला माझ्या शहराला जाण्यासाठी भेटणार होती. पुण्याची ट्रॅफीक मला पुण्याला सोडवून जाऊ देत नसावी. आठ किमी अंतरासाठी एक तास मोजत मी अखेर ट्रेन सुटण्याच्या वेळी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अलीकडच्या स्टॉपवर पोहचलो.
रात्रीच्या या अंधारात दिशाभूल व्हावी अन् ओळखीचं झालेलं पुणे अनोळखी भासावं असं मला झालं होतं. रस्त्यांचा अंदाज घेत, लोकांना विचारत पंधरा मिनिटांत रेल्वे स्टेशनवर पोहचलो. जनरलचं तिकीट काढलं अन् मैत्रिणीसोबत ओझरत्या अन् अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या समवेत घेतलेलं "The Complete Sherlock Holmes" हे पुस्तक मी छातीशी धरून जनरल डब्ब्यात चढलो.
काही तांत्रिक कारणाने ट्रेन निघायला उशीर होत होता अन् इतकी धावपळ करत आलो अन् आता ती व्यर्थ ठरावी असं मला झालं. जनरलच्या डब्ब्यात आता फार गर्दी झाली होती, कसाबसा उभा असलेला मी आता अवघडून गेलो होतो. उभ्या ट्रेनमध्ये अजूनच गर्मी भासू लागली होती. अखेर ट्रेन सुरु झाली प्रवास सुरू झाला.
हळूहळू पुणे शहर अन् शहराला लागून असलेल्या मोठमोठ्या ईमारती मागे पडू लागल्या होत्या. नजरेत न मावणारा पुणे शहराचा आवाका जसजशी ट्रेन पुढे जात होती तसतसा तो आवाका नजरेत भरून जावा तसा दिसू लागला होता.
दौंड पास झालं अन् तसं ट्रेनमधील काही कामगार माणसं ट्रेनमधून उतरले. आता दरवाजा अन् बाथरूम यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बसायला जागा भेटली होती. वाऱ्याची झुळूक शरीराला स्पर्श करून जात होती, अन् आता जरासे बरे वाटत होते. हळूहळू एक एक स्टेशन मागेमागे पडत होते अन् प्रत्येक स्टेशनवर कुणी दोन-चार लोकं उतरत होती कुणी दोन-चार बसत होती.
अखेर तासभर उभे राहील्यानंतर मला सीटवर बसायला जागा भेटली, सीटवर बसून रेल्वेतील प्रवाश्यांना न्याहाळत बसलो होतो. माझ्या वयाची तरुण मुलं आता गेटवर बसून चिलीम ओढीत बसली होती. पुन्हा ट्रेनमध्ये इतकी गर्दी झाली होती की, बाथरूममध्ये जाणारे लोकं अक्षरशः त्या गर्दीतून पाय ठेवण्यासाठी अंदाज काढत चालत होती. यात चिलीम ओढणारी ती मुलं नशेत झिंगून गेल्यानं आता काहीबाही बरळत होती.
मी मात्र जागा भेटल्याने इतकावेळ छातीशी कवटाळून धरलेले "The Complete Sherlock Holmes" वाचत बसलो होतो. जवळच एक तिशीतील तरुणी बसलेली होती. माझं पुस्तक वाचणं बघून की, माझं इतरांशी बोलणं बघून ती माझ्याशी बोलायला लागली. अन् मग आमच्या गप्पा होत गेल्या, ती ही पुण्याला नोकरीच्या शोधार्थ आली होती. पण; याहीवेळेस तिला नोकरी भेटली नव्हती. परंतु घरी असलेल्या दोन मुलींचा विचार अन् आपण पुण्यात सेट झालो तर त्यांना ब्राईट फ्युचर देऊ शकतो. हा त्यांचा विचार ऐकून मी प्रभावित झालो होतो.
मग गप्पा सुरू झाल्या नर्सिंग झालेल्या कुठल्याशा प्रायव्हेट दवाखान्यात त्या नोकरी करत होत्या. त्यांचे मिस्टरही पुण्यात कुठल्याशा एमआयडीसीमध्ये कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. माझ्या हातातील शेरलॉक होम्स त्यांनी वाचायला मागितलं अन् मी पुस्तक देऊन मी पुन्हा जनरल डब्ब्यात होणाऱ्या लोकांच्या विविध विषयांवर होणाऱ्या गप्पा ऐकत बसलो होतो.
कुठल्याशा स्टेशनवर त्या मैत्रिणीनं मला चहा ऑफर केला अन् आम्ही चहा पित बऱ्याच गप्पा करून पुढे प्रवास करत राहिलो. आजवर रेल्वेत मला खूप छान अनुभव आलेले असल्यानं आमच्या बोलण्यात ते ही विषय होते. अन् सगळ्या अनुभवांवर मी केलेलं लेखनही त्यांना दाखवले, जे त्यांना भारीच वाटलं असावं असं त्यांच्या बोलण्यातून वाटलं. अखेर कुठल्याशा स्टेशनवर त्यांनी माझं पुस्तक परत करत Thanks म्हणून निरोप घेतला अन् ते उतरले.
आता सोबत यूपीच्या पन्नाशीत असलेल्या काही अंकल लोकांची सोबत होती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी रेल्वे माध्यमातून पोटापाण्यासाठी कित्येक राज्यात केलेला प्रवास. जनरल डब्ब्यात स्थानिक लोकांनी कित्येकदा त्यांना केलेली मारझोड हे सगळं ते मला सांगत होते.
हे सगळं त्यांना मला का सांगावं वाटलं असावं मला कळले नाही. पण; मी ऐकून घेत होतो अन् त्यांच्या आत असलेलं रितेपण कुठेतरी आज इतक्या दिवसांत ते या विषयावर मनभरून बोलत असावे.
बाराचा पार कलुन गेला होता, सगळा जनरल डब्बा शांत झाला होता. चिलीम ओढणारी ती मुलं मात्र नशेत तर्र झाली होती. अन् बिहारमधून कामाच्या शोधार्थ आलेल्या दोन तरुणांना चिडवत होती.
त्यातील एका मुलाला तर त्याच्या बायकोबद्दल नको ते बोलत होती. तो तरुण बिचारा लग्न होऊन पहिल्यांदा एकटा इतक्या दूर त्याच्या बायकोला सोडून कामाला आलेला होता. अखेर चिडवत चिडवत त्या मुलांनी त्याला मारलेसुद्धा. न रहावून आम्ही काही जणांनी त्यांना अडवले अन् त्या रडत असलेल्या मुलाला शांत करून माझ्याजवळ घेऊन मी बसून राहिलो.
त्याला बराचवेळ दिलासा दिला शांत केलं. त्यानंतर तो जे काही बोलला तेव्हा मला खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रातील तरुण पिढी किती वाया गेली आहे यांची खंत वाटली.तो जे काही बोलला ते इथे लिहूसुद्धा शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर तो बोलला. हमारे सेंदवा में अगर हमें कूछ काम होता. हमारे को खेती होती तो हम क्यू हमारी बिवी, हमारा परिवार, घरबार छोडके इतने दूर पैसा कमाने आते थे..! हम गरीब है, आज हमें रोजीरोटी के वास्ते महाराष्ट्र आना पड रहा हैं..!
लेकीन हरबार ट्रेन मैं हम आते हैं, तो यह ऐसे कूछ लडके हमें मारपीठ करते हैं, दमदाटी करते हैं, गलिया देते हैं..! हे ऐकून मला भयंकर वाईट वाटत होतं, एकीकडे पोटापाण्यासाठी ही मुलं शेकडो किलोमीटर दूर प्रवास करून आपल्या राज्यात येत होती. अन् आपलीच तरुण मुलं आता मी जेव्हा ट्रेनच्या जनरल डब्ब्यात बघितले बाथरूम अन् दरवाज्याच्या रिकाम्या जागेत ती लोळत पडली होती. त्यात काही इतर राज्यांची पण तरुण मुलं होती. पण; आजकाल ही आपली तरुण पिढी काय करतेय ? हा प्रश्न मला तेव्हा पडला होता.
अखेर पहाटेचे सहा वाजले होते अन् माझं स्टेशन आलं तेव्हा त्या दोघा मित्रांना बाय करून मी ट्रेनमधून उतरलो. ट्रेन निघाली होती ती दोघे मित्र मला ट्रेन दूर जास्तोवर बाय करत होती. मैत्रिणीला पोहचलो म्हणून टेक्स्ट केला अन् पुढे बसच्या प्रवासाला लागलो.
- भारत लक्ष्मण सोनवणे