न लपवलेला खजिना..

युवा विवेक    16-Nov-2024
Total Views |


न लपवलेला खजिना..

 
बसस्टाॅपवर प्रत्येकच माणूस कधीतरी गेलेला आहे, कधी बसस्टॉपवर गेल्या गेल्या बस मिळते तर काहीवेळा बसची वाटही पहावी लागते. बसस्टॉप या जागेची गंमत म्हणजे ज्याला आपण 'ओळखीची नाती' म्हणतो ती त्या जागेवर अधिक जुळतात. बसची वाट पाहणे हा देखील ओळख होण्याचा किंवा करुन घेण्याचा एक मार्गच म्हणता येईल. असाच एकदा बसस्टॉपवर मी बसची वाट बघत होतो तेव्हा साठी ओलांडलेले दोन आजोबा मला तिथे दिसले. त्यातले एक आजोबा बरेचदा तिथे असतात. वेळ घालवण्यासाठी त्यांनी बसस्टॉपची निवड केली असावी. दुसरे आजोबा बहुदा बसच्या प्रतीक्षेत होते. बस यायला अर्धा तास तरी होता. बसच्या वेळापत्रककर्त्याची चांगलीच खरडपट्टी केली आहे या विषयापासून सुरु झालेल्या गप्पा दोघांनाही आपापल्या बालपणात घेऊन गेल्या. वय वाढलं तरी आठवणींचं वय वाढत नाही, ही माणसाला मिळालेली मोठी देणगीच आहे.. बघता बघता त्या दोन आजोबांनी जणू काही खजिनाच उघडला होता आणि त्या खजिन्यातून आठवणीचा एक एक पक्षी ओठांच्या खिडकीशी येऊ पाहत होता.

खरंच काही माणसांजवळ आठवणींचा खजिना असतो. खजिना बरेचदा कुठेतरी पेटीत दडवून ठेवलेला असतो. ती पेटी गुप्त ठिकाणी कुठेतरी दडवलेली असते. तो शोधणं हा मोठा 'टास्क'च असतो! पण आठवणींच्या खजिन्याची पेटी मात्र गुप्त नसते आणि त्याला कुलूपही लावावे लागत नाही. पण खरंतर त्याला अदृश्य कुलूप असतं पण त्याची किल्ली आपल्याजवळ नसते. एखादी घटना, प्रसंग किंवा अगदी सहज रंगलेल्या गप्पांमधे ती किल्ली असते. आठवणींच्या खजिन्याच्या पेटीचं कुलूप कसं आणि केव्हा उघडलं हे आपल्याला कळतही नाही. लहान मूल खेळण्याच्या पेटीत हात घालून आपल्याला एकेक खेळणे जसे आपल्याला दाखवते तसं त्या पेटीतला एकेक खजिना आपण दुस-याला उलगडून दाखवत असतो. तो दाखवत असताना असंख्य शब्द आणि हास्याच्या फुलांबरोबर डोळ्याची ओलावलेली कड आपल्याला साथ देत असते. आपल्या आठवणींच्या पेटीत समोरच्या माणसासमवेत आपणही अगदी दंग होऊन जातो. गुप्तधनाचा खजिना सापडणाऱ्या काही वेळा त्या धनाच्या उपभोगाबरोबर तळतळाटही भोगावे लागतात. पण आठवणींच्या खजिन्याला खरेपणाचा सुगंध असतो. म्हणूनच त्या पेटीतला दरवळ कधीही संपत नाही. खरेपणाच्या सुगंधामुळेच हा खजिना कुणालाही लपवावासा वाटत नसावा.. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, कधी रोज तर काहीवेळा क्षणभरातही या खजिन्यात नव्याने भर पडत असते आणि गंमत म्हणजे या पेटीतली जागा कधी संपत नाही. जगण्याच्या अनेक कल्पना, अनेक स्वप्ने, प्रत्यक्षातलं जगणं, जगताना आलेल्या अडी अडचणी, त्यावर केलेली मात, भेटलेली माणसं, जोडलेली, तडा गेलेली, पुन्हा नव्याने जोडलेली नाती, पुस्तके, देव, निसर्ग, नियती असा भौतिक नि अभौतिक जगाचा खजिना आठवणींच्या पेटीत सामावलेला असतो. बाल्य, तारुण्य, गृहस्थाश्रम, नवबाल्य (म्हातारपण) या जगण्याच्या चारही अवस्थांच्या वैभवाचा अर्थ या खजिन्याला प्राप्त झालेला असतो. त्यामुळे, आठवणींचं वय वाढत नसलं तरी वयानुरुप त्या परिपक्व होत असतात.

विशेष म्हणजे या खजिन्याचा उपयोग स्वतःपेक्षा काहीवेळा दुसऱ्यालाच अधिक होतो. कुणीतरी कुणापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. कुणी चार कमीही पाहिलेले असतात. चार पावसाळे जास्त पाहिलेल्याच्या खजिन्यातल्या धनाचा उपयोग कमी पावसाळे पाहिलेल्याला आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी, जुन्या-नव्याची सांगड घालण्यासाठी होतो. म्हणूनच, खजिन्यातले धन अगदी सहज हस्तांतरित करता येते नि ते धन कुणाला हस्तांतरित केले तरी आपल्या खजिन्यातले धन कमीही होत नाही. या खजिन्यातूनच एखादे भाषण किंवा एखादे पुस्तक जन्माला येते. म्हणूनच, ह्या खजिन्याची रचना हीच मुळी ईश्वराची मोठी किमया आहे. अलीकडच्या या धकाधकीच्या युगात ह्या खजिन्यातले धनच खरा आनंद देत असते; नाहीतर तासनतास आपण आठवणीत श्वासाची जाणीवही न होण्याइतपत रमून गेलो नसतो! या खजिन्याच्या पेटीचे आपण एकमेव मालक असलो तरी एकमेव चालक मात्र नसतो, हे मान्य केले पाहिजे. एखादी आठवण दाटून येण्यासाठी देखील तशी परिस्थिती समोर निर्माण व्हावी लागते.

हा न लपवलेला आठवणींचा खजिना कुठेही उघडता येत असला तरी तो उघडण्याच्या जागा किंवा वेळा बऱ्याचदा ठरलेल्या असतात. बसस्टॉप, प्रवास, कौटुंबिक प्रसंग व सोहळे, बँका, उपहार गृह वगैरे ठिकाणी तर ही पेटी हमखास उघडली जाते. त्या त्या वेळी ती अदृश्य किल्ली अदृश्य कुलूप उघडून आठवणींचा पट समोर मांडते...

-
गौरव भिडे