साबुदाण्याची खिचडी..

युवा विवेक    05-Oct-2024
Total Views |


साबुदाण्याची खिचडी..

सोशल मिडीया हल्ली बराच 'ॲक्टिव्ह' झालाय. फावल्या वेळात पूर्वी राहिलेली वैयक्तिक कामे, वाचन वगैरे काहीतरी केले जाई. हल्ली हा फावला वेळ देखील सोशल मिडीयानी आपल्या नावावर करुन घेतला आहे. फेसबुक, ऑरकुट वगैरे माध्यमे किंवा अगदी वाॅट्सअप ॲप सारखे माध्यम सुद्धा सुरुवातीच्या काळात संपर्क साधण्यासाठी, नवनवीन मित्र-मैत्रीणी जोडण्यासाठी वापरले जात असे. पुढे इन्स्टाग्रामसारखे ॲप आले. तेव्हा नटनट्या, खेळाडू यांची पेजेस निर्माण होऊ लागली. त्यांना फाॅलो करण्याचे प्रमाण वाढू लागले. पुढे तर सर्वच क्षेत्रांतील मंडळींनी आपापली पेजेस, यू ट्यूब वर चॅनेल निर्माण करुन नवनवीन माहिती देण्यास सुरुवात केली. खाद्यपदार्थांचे क्षेत्र ब-यापैकी खव्वयांनी फाॅलो करण्यास सुरुवात केली. रोजच्या जेवणाव्यतिरिक्त किंवा जेवणाला पर्याय म्हणून कितीतरी पदार्थ लोकांनी करुनही पाहिले. उपवासाचे पदार्थ या घटकाने तर त्यात बाजी मारली! अगदी बेसिक म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीपासून उपवासाच्या मिसळीपर्यंत कितीतरी पदार्थ साहित्य आणि कृतीसह सोशल मिडीयावर येऊ लागले. मला वाटतं, अलीकडच्या काळात देवापेक्षाही लोक हे पदार्थ खायला मिळतात म्हणून उपवास करत असावेत.. पूर्वी साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी म्हणून आम्ही उपवास करत असू. आता निरनिराळ्या पदार्थांसाठी उपवास केला जातो.

हल्ली रील नावाच्या प्रकारानी सोशल मिडीया काबीज केलेला दिसतो. सोशल मिडीयाच्या जगात 'थोडक्यात पण महत्त्वाचे ' अशी एक स्पर्धा या रीलमुळे रोजच घडते आहे. व्यायामाचे प्रकार देखील दोन मिनिटात उरकता येतात, हे त्या रीलनेच आपल्याला पटवून दिले आहे. उपवासाचे पदार्थ किंवा एकंदरीतच सगळे पदार्थ 'झटपट' आपण बघतो. पण या झटपट कृतीने साबुदाणा या पांढ-याशुभ्र पदार्थावर अक्षरशः अन्याय केला आहे. मधे मी एक रील बघितले. साबुदाण्याचा नवीन पदार्थ अशीच त्याची सुरुवात होती. मेथीचे पराठे आपण करतो तसेच काहीसे साबुदाण्याच्या पीठापासून 'आगळेवेगळे पराठे ' त्यात करुन दाखवले होते. साहित्य दहा-बारा सेकंद, कृती वीस सेकंद आणि केलेला पदार्थ कसा आगळेवेगळा नि पौष्टिक आहे हे सांगायला वीस सेकंद असे वेळेचे उत्तम व्यवस्थापन त्या रीलचे केलेले असले तरी तो व्हिडिओ पाहिल्यावर जरा रागच आला. प्रत्येक बाबतीत नावीन्य शोधलंच पाहिजे का, असं त्या वेळी वाटून गेलं. परंपरेला काही अर्थ आहे. मधे तर कुणीतरी अमुक एक पदार्थ पायाखाली तुडवून साबुदाणा तयार केला जातो असाही एक व्हिडिओ प्रसृत केला होता. तेव्हापासून साबुदाणा या पदार्थाविषयी मला अधिकच दया वाटू लागली आहे. साबुदाण्याची बाजू त्याच्याइतकीच पांढ-याशुभ्र पद्धतीने मांडणारे व्हिडिओ देखील प्रसिद्ध होऊ लागले असल्याचे पाहून समाधानही वाटते. त्यातील एका व्हिडिओत साबुदाण्याची खिचडी पौष्टिक असल्याचे पाहून मला अतीव आनंद झाला. या 'पौष्टिक'तेचा तेव्हापासून मी थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रचार-प्रसार करु लागलो आहे.

साबुदाण्याची खिचडी खाण्याइतकीच करायलाही फार सोपी आहे. सात-आठ तास चांगला भिजलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, तूप, मीठ, जिरे, आवडीप्रमाणे बटाटा आणि चवीनुसार साखर इतक्या जिन्नसात सुरेख चवीची खिचडी तयार होते. वरुन खोबरं नि कोथिंबीर, लिंबाची फोड असेल तर मग खिचडी खायला चांगली रंगत येते. या अशा पूर्णान्नाला पर्याय शोधणे मनाला पटत नाही. पण खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणणारी काही माणसे असल्यामुळे पर्याय उपलब्ध करावेच लागतात. तेव्हा फारतर खिचडीऐवजी साबुदाण्याचा वडा किंवा साबुदाण्याचे थालीपीठ हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. हे पदार्थ वेगळे असले तरी त्याची चव खिचडीसारखीच असते. हल्ली तर म्हणे उपवास थाळी देखील मिळते आणि ती देखील अमर्यादित! पण त्यातही खिचडी हा पदार्थ असल्यामुळेच त्या थाळीला शोभा येत असावी.. उपवासाच्या दिवशी केल्या जाणा-या न्याहारीला किंवा जेवणाला फराळ म्हणतात. फराळ शब्द उच्चारला की, डोळ्यासमोर प्रथम येणारा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी!

पुण्यात सकाळी न्याहारीच्या पदार्थांचे पुष्कळ स्टाॅल असतात. तिथेही हा पदार्थ आवर्जून मिळतो. पण काही न्याहारीवाल्या मंडळींनी खिचडीवर सांबार देऊन आपले 'बिझनेस एथिक्स' मोडले आहेत, ही गोष्ट मनाला फार लागून राहिली आहे. खिचडी हा केवळ खोबरं, कोथिंबीर किंवा दह्याबरोबर खाण्याचा पदार्थ आहे, असे मी ठामपणे सांगतो. हाॅटेलमधे रोज नसले तरी मंगळवार, गुरुवार नि शनिवारी साबुदाण्याच्या खिचडीला स्थान आहे. हल्ली नावीन्यपूर्णतेच्या चक्रात उपवासाचे पदार्थ अडकले आहेत. दिवसेंदिवस या चक्राचा वेग वाढतो आहे. अशावेळी साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी म्हणून उपवास करणा-या उपासकांची जबाबदारी आता वाढली आहे. या नावीन्यपूर्ण खाद्यजगतात साबुदाण्याच्या खिचडीची पारंपरिकता जपणे हे आता कर्तव्य होऊ लागले आहे..

- गौरव भिडे