शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले.. हे गीत आपण अनेकदा ऐकले असेल. शब्दांशिवायही मनातल्या भावना मनापर्यंत पोहोचवता येतात, असा साधा सोपा अर्थ पाडगावकर आपल्याला या गीतातून सुचवतात. मौनातला हा भावनांचा संवाद पाहून शब्दही त्यात हळूच विरघळत असावेत. या गीताचा केंद्रबिंदू प्रेम हा आहे. प्रेमाच्या नात्याचेच ते गीत आहे. प्रेमात दोन जीवांना एकमेकांचा अधिक सहवास लाभतो, सहवासाची सवय होते नि ती सवयच मग एकमेकांच्या सा-या भावनांना साद घालू लागते.. हळूहळू शब्दांची गरज कमी होत जाते नि शब्दांच्या पलीकडले शब्दांवाचूनच कळू लागते. असे असले तरी त्या दोन जीवांच्या प्रवासाची बरीचशी सुरुवात शब्दांच्या गावीच झालेली असते. शब्दांचा संबंध भावनांशी असला तरी त्या-त्या नात्यातील देवाण-घेवाणीशी अधिक असतो. काही नात्यांना शब्दांची मर्यादा असते. तर काही नात्यांत विशिष्टच उच्चारले पाहिजेत असे बंधन नसते. या शब्दांचा उगम प्रथम मनात होतो. पण मनातला प्रत्येक शब्द ओठावर येईलच असे नाही. अशावेळी तो शब्द कदाचित पुन्हा मनात आपल्या जागी जाऊन बसत असावा. काहीवेळा वाटतं, भावना नावाच्या डोंगरातून शब्दांची नदी वाहते. पण तिचा मार्ग मात्र नियतीने आखून दिलेला असतो.
शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरले पाहिजे. असं काही जण म्हणतात. पण असे असले तरी या शब्दांची काहीवेळा गंमत असते. कोणत्या वेळी कोणता शब्द सुचेल ते सांगता येत नाही. एखाद्या वेळी नेमका शब्द सापडत नाही! कुणी सहज आपल्याला म्हटले, " चला, आपण थोडावेळ गप्पा मारु.." की नेमके आपल्याला गप्पा मारण्याइतकेही शब्द सुचत नाहीत नि एखादा विषय बोलता बोलता निघतो अन् त्याच्या गप्पा होतात तेव्हा शब्दांचा नुसता पाऊस पडतो. म्हणूनच काहीवेळा वाटतं, पावसाचं घर जसं आभाळ आहे, तसंच मन हे शब्दांचं हक्काचं घर आहे. ओठांवर राहण्यापेक्षाही शब्दांना मनातच रहायला अधिक आवडते. पण त्यांची ही आवड आयत्या वेळी आपली मात्र पंचाईत करते. एखादा माणूस अबोल असतो. पण त्याच्या मनात कितीतरी शब्दांची जा-ये सुरु असते. मन म्हणजे हे शब्दांचं घर अगदी लहान असतं. या लहानशा घरात कितीतरी शब्द राहतात. त्यांची नावेही कितीतरी असतील. हसरे शब्द, रडके शब्द, बोलके शब्द, चांगले शब्द, बरे शब्द, खरे शब्द, खोटे शब्द, फिके शब्द, गडद शब्द... अशी शब्दांची किती नावे सांगता येतील! प्रत्येक शब्दाची त-हा वेगळी, स्वभाव निराळा.. मग त्यांचे वाद नि भांडणे रोजच होत असणार. पण म्हणून ते काही घटस्फोट घेत नाहीत किंवा एकमेकांना सोडूनही जात नाहीत.. भांडण अगदी भातुकलीच्या खेळासारखं पण एकत्र राहणं मात्र त्यांचं आभाळासारखंच असतं. शब्दांचं हे अवघं कुटुंब मनात एकत्र नांदते.
या निर्जीव शब्दांना सजीव करणारे आपण असतो आणि त्यांना भावना अर्थ देतात. काही जणांना अखंड बोलत राहण्याची, काही ना काही लिहित राहण्याची सवय असते. पण अशा माणसांपासून दूर पळण्याच्या आपण कायम तयारीत असतो. खरंतर अशा माणसांशीच आपण अधिक संग केला पाहिजे. या लोकांना शब्दांचं वरदान लाभलेलं असतं. अशी माणसं आपल्याला नवे विषय, नवे शब्द, नव्या भावना देत असतात. त्यांचा स्वीकार करावा. आपल्या मनातल्या शब्दांना हे नवे पाहुणे शब्द भेटतात तेव्हा उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. विचारांना आकार मिळतो, भावनांना झळाळी येते. शब्दांचं कुटुंब सदैव वाढतं ठेवायला हवं म्हणजे मग मनात जुन्या-नव्या शब्दांची मैत्री होते. आपला नि शब्दांचा स्नेह वाढू लागतो. नेमक्या वेळी नेमके शब्द ओठावर येऊ लागतात. वेगवेगळे सदस्य असलेलं हे कुटुंब तुमच्या-माझ्या नि प्रत्येकाच्याच मनात असतं. कदाचित, सदस्यांच्या संख्येत फरक असेल.. शब्दांच्या या कुटुंबाकडून एकत्र कसं रहावं हे आपल्याला समजतं.
या कुटुंबियांची एक गंमत म्हणजे एकमेकांना कसे वागावे याबाबत ते उपदेश करीत नाहीत. तरीही कुणी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध वागत नाहीत. भावनेचा रंग पाहून आपापल्या स्थानाहून शब्द ओठावर येतात. तसेच, कधी ओठांवर यावे आणि कधी येऊ नये याचेही भान त्यांना असते. म्हणूनच, दिलेला पैसा नि वस्तू मागे घेता येत असेलही पण एकदा दिलेला शब्द मागे घेता येत नाही.. यासाठीच दुसरी व्यक्ती कोणते किंवा कसे शब्द उच्चारते याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या मनातल्या शब्दांची एकमेकांशी सांगड घालता आली तर या कुटुंबात आणखी एकोपा राहील.
- गौरव भिडे