वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात नोव्हेंबर २०२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियात ३ वन-डे, ३ टी-ट्वेंटी आणि ४ कसोटी सामने खेळण्यास सज्ज होता. आधी ४-५ दिवसांचा कठीण Quarantine आणि त्यानंतर खेळाचा सराव करून भारताने पहिला सराव सामना खेळला. टी-ट्वेंटी सिरीज संपली नव्हती त्यामुळे हा सामना खेळण्यासाठी भारताकडे फक्त १२ खेळाडू होते. कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शतक केले. दुसरा सराव सामना Pink Ball ने खेळला गेला. जे कसोटी सामने रात्री खेळले जातात त्यात नेहमीच्या Red Ball ऐवजी Pink Ball चा वापर केला जातो. दौऱ्याचा पहिलाच सामना Pink Ball ने असल्याने हा सराव सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह ने अर्धशतक तर हनुमा विहारी आणि ऋषभ पंतने शतक झळकावले. त्यावेळी ऑस्ट्रेलिया Pink Ball ने खेळताना सगळ्यात यशस्वी संघ होता.
दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून Batting चा निर्णय केला. तोपर्यंत भारताने विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली नाणेफेक जिंकून कधीही पराभव बघितला नव्हता. भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीसाठी आले. समोर मिचेल स्टार्क, पैट कमिंस आणि जोश हेजलवूड हे घातक गोलंदाजांचे त्रिकुट होते. मिचेल स्टार्कने इंनिंगच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉला बाद केले. स्कोरबोर्डवर ३२ धावा असताना मयंक अगरवालदेखील माघारी आला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानात होती. विराटने दौऱ्यामधील त्याच्या एकमेव कसोटी सामन्यातले अनेक क्षण स्वतःच्या नावावर कोरले. ‘Pujara Defends’ हे दोन शब्द ऐकून ऑस्ट्रेलियाचा संघ मागील दौऱ्यात पूर्णपणे थकला होता. पुजाराने मागील दौऱ्यात एकूण ११३५ चेंडू खेळून प्रतिस्पर्ध्यांचा संयम तपासाला होता. कोहली आणि पुजाराने अर्धशतकीय भागीदारी केली. संघाच्या १०० धावा असताना पुजारा बाद झाला.
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्य मैदानात पुरते सेट झाले. विराटने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून अशी फलंदाजी केली की ऑस्ट्रेलियाच्या संघाला वापसी करणे कठीण झाले. भारतीय संघाने १८८ धावांपर्यंत मजल मारली होती. पण एका रनसाठी विराट आणि अजिंक्यमध्ये ताळमेळाची गडबड झाली आणि विराट धावबाद झाला. जो खेळ पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला होता तो आता ऑस्ट्रेलियाकडे झुकला, खेळाची गतीच बदलली. रहाणेच्या मनात राहून राहून एक गोष्ट राहत होती की विराट त्याच्यामुळे धावबाद झाला. रहाणे याच विचारांमध्ये असताना ऑस्ट्रेलियाला त्याचीही विकेट मिळाली. रहाणेच्या पाठोपाठ भारताने हनुमा विहारीची विकेट गमावली. अश्विन आणि साहाने एक छोटी भागीदारी करून त्या दिवसाचा खेळ संपवला. पहिल्या दिवसाच्या खेळणे जणू २०२० ची गोष्ट थोडक्यात सांगितली. सगळं काही सुरळीत चालू असताना एक चूक; आणि भविष्य धोक्यात!
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. पहिल्या ५ ओवर्सच्या आत भारतीय संघ बाद झाला. संघाने एकूण २४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या २९ असताना त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले होते. जसप्रीत बुमराहने त्या दोघांना बाद केले. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण फलंदाज म्हणजेच स्टीव स्मिथला माघारी पाठवले. यानंतर ऑस्ट्रेलियाने एकामागे एक अशा ४ विकेट्स गमावल्या. त्यांची परिस्थिती १११ धावांवर ७ विकेट्स अशी झाली होती. पिचवर होता कर्णधार टीम पेन! २०१८-१९ मध्ये झालेल्या सँडपेपर प्रकरणानंतर याच कर्णधाराने संघ सांभाळला होता. इथेही संघ अडचणीत असताना पेनने डाव सांभाळला. अखेर १९१ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ बाद झाला. भारतीय संघाकडे ५३ धावांची बढत होती. इथपर्यंत भारतीय संघ खेळात पुढे होता; पण पुढच्या डावात असं काही झालं की त्या एका घटनेने पूर्ण भारतीय संघावर प्रश्नचिन्ह लावले.
भारतीय संघाची बॅटिंग सुरु झाली. ७ धावा फलकावर असताना भारताने पृथ्वी शॉच्या रुपात पहिली विकेट गमावली. मयंक अगरवाल आणि रात्रप्रहरी जसप्रीत बुमराहने त्यादिवशीचा खेळ सांभाळला. दिवस संपला. भारतीय संघाचा स्कोर होता ६ ओवर्स, ९ धावा आणि एक विकेट. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. संघाच्या १५ धावा असताना बुमराह बाद झाला. पुजारादेखील खाते न उघडताच माघारी आला. पुजाराच्या पाठोपाठ मयंक बाद झाला आणि स्कोर झाला १५ धावांवर ५ विकेट्स! १९ धावा फलकावर असताना विराटही बाद झाला. मैदानात काय चालले आहे हे कुणालाही कळत नव्हते. २६ धावा असताना रिद्धीमान साहा आणि रविचंद्रन अश्विन एका पाठोपाठ एक माघारी आले. ३१ धावा असताना हनुमा विहारीही बाद झाला. एकूण ३६ धावा असताना एक उसळत्या चेंडूने शमीच्या त्या हातावर वार केलं ज्या हाताने तो प्रतिस्पर्ध्यांच्या विकेट्स घेतो. शमीचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला पुढे बॅटिंग करता आली नाही आणि भारतीय संघ फक्त ३६ धावांवर all out झाला.
९० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज साध्य केले आणि पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. सगळ्या बाजूंनी भारतीय संघाची आलोचना सुरु झाली. भारतीय संघ ही शृंखला ४-० ने गमावेल अशी भविष्यवाणी अनेक दिशांहून ऐकू येत होती. भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यानंतर मायदेशी परतला. दुखापतीमुळे मोहम्मद शमीदेखील सिरीजमधून बाहेर पडला. भारतीय संघासाठी हा एक फार मोठा धक्का होता. अजिंक्य रहाणेकडे पुढील तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची कमान सोपविण्यात आली. संघावर लागलेले अनेक प्रश्नचिन्ह खेळाडूंना मिटवायचे होते. मेलबर्नच्या सामन्याला आता भारतीय दृष्टीने अजून महत्त्व आले होते. नक्कीच पुढचा सामना एक मैलाचा दगड ठरणार होता...!
- देवव्रत वाघ