आधी केलेचि पाहिजे!

19 Oct 2024 16:03:22


आधी केलेचि पाहिजे!

भाषा ही जननी आहे, हे वाक्य आपण कित्येकदा वाचले आहे आणि ऐकलेही आहे. कदाचित भाषेविषयी निबंध लिहिताना ते कुणी दहावीच्या परीक्षेत लिहून निबंधाला शोभाही आणली असेल. पण निबंधाला शोभा आणण्यापुरतीच भाषेतील अशी काही वाक्ये वापरावीत, एवढीच आपली जबाबदारी आहे का? याचा विचार करण्याची गरजच आपल्याला अलीकडे वाटेनाशी झाली आहे. हल्ली संपर्काची साधने वाढली आहेत. त्यातून अनुकरण करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. केवळ मातृभाषाच नव्हे, तर अन्य भाषेतील शब्दांचे संक्षिप्त रुप वापरण्याची जणू एक चढाओढच निर्माण झाली आहे. नवनवीन भाषांचा आपल्याला परिचय होत आहे. मुळातच, कोणतीही भाषा शिकणे स्वागतार्हच आहे. परंतु, कोणतीही भाषा शिकण्याकरिता मातृभाषेचे उत्तम ज्ञान असणे अगदीच आवश्यक असते. याचाच बहुतेक आपल्याला विसर पडलेला दिसतो. असे असले तरी मराठी ही माझी मातृभाषा आहे, असे अभिमानाने सांगणारे अजूनही अनेकजण आहेत हीच काय ती समाधानाची बाब! परंतु, भाषा तेवढ्यानेच टिकेल का? आपले राहते घरही कोरड्या अभिमानाने टिकत नाही. त्याची निगा राखावी लागते, योग्य वेळी डागडुजी करावी लागते. भाषेचेही तसेच आहे. केवळ मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी मराठी माझी माय आहे, मराठी अस्मिता जपली पाहिजे वगैरे भाषणे करुन नि ऐकून मराठी भाषा टिकायची नाही. त्याला कृतीची जोड हवी.

भाषेचे संवर्धन हा महत्वाचा विषय असला तरी तो अभ्यासाचाही एक विषय आहे. मराठी भाषेला आपण आईचा दर्जा दिलेला आहे. आपली आई आपल्याजवळ असावी याकरिता आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजी यांचा उपयोग होईल का? भाषा जतन केली जाते ती तिच्या साहित्यात.. मराठी भाषेला साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. संतसाहित्यपूर्वपासून ते अधुनिक साहित्यापर्यंतचा मराठी भाषेचा प्रवास जाणून घ्यायचे म्हटले तर शंभर वर्षांचे आयुष्य देखील पुरायचे नाही. या साऱ्या साहित्यावर तत्कालीन परिस्थितीचा, संस्कृतीचा, व्याकरणाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे, त्यात आपोआपच एक अर्थपूर्णता निर्माण झाली आहे. संत साहित्यात सर्वच संतांनी भाषेचा आणि बोलीचा परिणामकारक वापर केलेला आढळतो. पुढे छपाई यंत्रांचा शोध लागला. तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीचा प्रचार-प्रसार सुरू झाला. सुरुवातीस भाषांतरित साहित्य निर्माण होऊ लागले. पुढे वेगवेगळे शब्दकोश, संदर्भग्रंथ तयार होऊ लागले तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याला मातीतले साहित्य म्हणता येईल असे साहित्य तयार होऊ लागले. आज ललित, वैचारिक, वैज्ञानिक वगैरे साहित्यात असंख्य ग्रंथाची भर पडत आहे. शासन देखील आता कंबर कसून मराठी भाषा संवर्धन आणि जतन करण्याच्या कामास लागले आहे. अशीच कंबर कसण्याची जबाबदारी तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाची आहे. मराठीचे भवितव्य टिकवण्यासाठी कृतीयुक्त सहभागाची गरज आहे.

 

मराठी भाषेची विविध काव्यसंमेलने साऱ्या महाराष्ट्रातच होत असतात. काही ठिकाणी काव्यरसिक मोठ्या संख्येने हजेरी लावतही असतील.. परंतु ह्या काव्यरसिकांचे वय बरेचदासाठी ओलांडलेले असते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात तर लेखकाची स्नेही मंडळी सोडल्यास कुणी हजेरी देखील लावत नाही. मराठी साहित्य संमेलनातही प्रतिष्ठित मंडळी आणि अनेक वृद्ध मंडळीच बरेचदा पहायला मिळतात. तरुणांनी याकडे एकदाही का पाहू नये? केवळ शनिवारी आणि सुट्यांच्या दिवशी दारुच्या मेजवान्या करणे, फिरावयास जाणे आणि सोमवार आला म्हणजे ठरलेल्या वेळी कचेरीत जाणे, हीच तरुणांची जगण्याची पद्धत झाली आहे. कित्येक मराठी वाचनालये वाचकांअभावी आणि सभासदांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सा-या जबाबदा-या मराठी माणसाच्याच नव्हेत काय? केवळ शासनावर आपण मराठीच्या भवितव्याची जबाबदारी टाकून भागणार नाही. वरीलप्रमाणे अनेक कार्यक्रम आपल्या परिसरात होत असतात. अनेक वाचनालये आणि त्यातील पुस्तके तुमची-माझी वाट पाहत आहोत. एखाद्या दिवशी आंदोलने आणि मोर्चा काढण्यापेक्षा रोज पुस्तकाचे एक पान वाचले आणि पुस्तक वाचून झाल्यावर त्याचा अनुभव एकमेकांना सांगणे ही छोटीशी गोष्टदेखील भाषेच्या संवर्धनासाठी आपण करु शकतो. माझ्या मराठीच्या भवितव्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मला जमेल त्या पद्धतीने आणि प्रयत्नाने मी जरुर पार पाडीन, असा साधा निश्चय आणि प्रत्यक्ष कृती इतकेच भाषेच्या संवर्धनासाठी पुरेसे आहे.. आणि म्हणूनच, "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!">

- गौरव भिडे
Powered By Sangraha 9.0