फक्त तुझा पापा दे!

01 Oct 2024 15:34:27


फक्त तुझा पापा दे!

 
आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरणाऱ्या सक्षम हातांवर सुरकुत्यांची झलक दिसू लागायला लागते. शाळेतल्या आपल्या पहिल्या नाचाच्या वेळी कौतुकाने भरलेल्या डोळ्यांची नजर हळूहळू अंधुक होऊ लागते. साधारण तीन वर्षाचे आपण पन्नाशीतल्या आजीचा हात हातात धरून चालायला शिकतो. मात्र २० वर्षाचे आपण सत्तरीतल्या आपल्या आजोबांचा हात घट्ट धरून ते गर्दीत हरवू नयेत याची काळजी बाळगायला लागतो.

 
आपण मोठं होत असताना आई-बाबांव्यतिरिक्त आपल्यापेक्षा वयाने आणि अनु‌भवाने चौपट मोठे असणारे आजी-आजोबा अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात. या नात्यामध्ये वयाचा फरक फार असतो, पण आपलं लहानपण तेसुद्धा लहान होऊन जगत असतात. त्यामुळे वय, निदान आपल्या लहानपणी नात्याच्या आड येत नाही. मात्र जसजसे आपण मोठे होत जातो, घराबाहेर स्वतःचे स्वतः जाऊ लागतो, तसतसे 'वय' आणि त्यासोबत पिढ्यांमध्ये असलेला विचारसरणीतला फरक नात्याच्या आड येऊ लागतो. काळजीने दिलेल्या सूचनेला 'तुम्हांला काही कळत नाही' अशी उत्तरं मिळू लागतात. आपण केलेल्या 'औषध वेळेवर घ्या' अशा सूचनेला 'तू मला शिकवू नको' असं उत्तरं मिळू लागतं. एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा येथे सुरू होते आणि अशा वेळेला उभं आयुष्य इतरांसाठी जगलेल्या आपला म्हाताऱ्या बाळांना इतर कशाहीपेक्षा आपल्या शब्दांची, आधाराची गरज असते. बाहेरून आल्यावर आपण काय केलं? कॉलेज मध्ये काय शिकलो? सहलीच्या ठिकाणी काय पाहिलं? हे सगळं ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले असतात आणि अशा वेळी कुसुमाग्रजांची 'माझ्या सारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे' या ओळी आठवल्याशिवाय राहवत नाही.

 
आपल्या रोजच्या जगण्यात आपले आजी-आजोबा सोडून अनेक वृद्ध लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. काही वेळा मंदिराबाहेर एखादी आजी हार, फुलं, वेण्या विकायला बसलेली असते. एखादे आजोबा चहाच्या टपरीवर एकटेच चहा प्यायला आलेले असतात. बसमध्ये एखादी म्हातारी व्यक्ती बसण्यासाठी जागा शोधत असते. तर कधी एखादं म्हातारं जोडपं आपल्याला एखादा पत्ता विचारत येतं. या सगळ्यांकडे पाहिलं की आयुष्यभर एखाद्या गोष्टीच्या पाठी पळून झाल्यानंतरच्या सूर्यास्ताच्या प्रवासात घराकडे परतणाऱ्या पाखरांची, मंद वाऱ्याची आणि हे सारं न्याहाळणाऱ्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटणं किती साहजिक आहे याची जाणीव होऊन जाते.

 
आज म्हणे जागतिक दिवस साजरा केला जात आहे. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जिने वयाची ६० वर्षे ओलांडली आहेत. हा दिवस फक्त साजरा करावा की, त्यांचं आयुष्य आणि त्याचं त्यांचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व साजरं करावं ही कदाचित आपल्या निवडीचा भाग ठरेल. पण मला वाटतं, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अशा प्रत्येक अनुभवाच्या गाठोड्याला आपल्याला समजून घेता यायला हवं. त्यांचा हात प्रेमाने हातात घेऊन नात्यात आपलेपणा मुरू द्यायला हवा! तेव्हाच पिढ्यांमधील अंतर दूर होऊन नात्यातले अंतरसुध्दा कमी होईल!

 

- मैत्रेयी
Powered By Sangraha 9.0