सुगीचे दिस..! भाग - ७
भोळ्या राजू त्याची कपडे अन् त्याची बासनं धुवून, झुळक्या बावडीतून पाणी काढून घमील्यात ओतून गुरांना दाखवीत होता. सोबतच पाटलांशी कामाच्या बाबतीत बोलत होता, पाटील त्याला प्रश्न करत अन् तो दोन- चार शब्दात पाटलांच्या प्रश्नांचे उत्तर देत असे.
एरवी भोळ्या राजू फार बडबड्या साऱ्या गावाला बोलून गाभण करेल इतका बडबड करत असे. बरं त्याला बोलायला कुठले विषय शोधायची गरज नसे की, कुणी मित्र शोधायचीही गरज नसे. चालत्या बोलत्या अनोळखी वाटेवर चालणाऱ्या माणसांशी लगट करून तो बोलत असे. त्याचा भोळसर चेहरा बघून मग गावच्या वाटेला जाणारे लोकंही थांबून मग त्याच्याशी दोन-चार गोष्टी करून घेत असे.
गप्पा करायला कुणी नाहीच भेटलं तर मग तो हनुमान देवाच्या मंदिराला असलेल्या ओट्यावर जाऊन बसे अन् मोठ्यानं हनुमान चालीसा घोकीत असे. दोन-चार अक्षरंही धड न येणारा भोळ्या राजू हनुमान चालीसा तर इतकी सुंदर म्हणत असे की, लोकं त्याच्या तोंडाकडे बघून हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं समजत. पण; त्याला हनुमान भक्तीचे खूप वेड होते, त्याला वाटायचं माझी ही प्रामाणिक भक्ती कधीतरी फळाला येईल अन् माझी सर्व प्रश्न नकळत सुटत जाईल. त्यामुळं तो हे सगळं खूप मनोभावे करत असायचा.
दर शनिवारी शिवनामायच्या एका अंगाला असलेल्या मुरमट खदानीत असलेल्या ढवळ्या रुईच्या फुलांचा अन् त्या झाडाच्या पानांचा हार करून तो देवाला वाहत असे. दर शनिवारी पहिला हार घालण्याचा मान गावाने भोळ्या राजूला दिला होता, एरवी मग इतर दिवशी गावची लोकं हार घालीत.
दर शनिवारी पहाटेच सात वाजता भोळ्या राजू मंगळी आईच्या डोहात अंघोळ करायचा एरवी हाफ चड्डी अन् बंडी घातलेला राजू शनिवारी मात्र सोवळे नेसायचा. मग एका हातात ती माळ, फुलं अन् एका हातात दोन अगरबत्त्या घेऊन तो हनुमान देवाच्या देऊळकडे जायचा, मग मनोभावे हनुमान देवाची पूजाअर्चा करायचा.
पहाटेच माईक न घेता खूप गोड आवाजात हनुमान चालीसा पठण करायचा. मग मागुन येणारी लोक त्याच्या या हनुमान चालीसा पठनाला उपस्थित राहायचे. मग कुणी नारळ अन् कुणी साखर घेऊन आलेलं असायचं हनुमानाला नारळ फोडले की त्याची खांडकं करून त्यात साखर टाकून भोळ्या राजू सगळ्या उपस्थित लोकांना वाटून द्यायचा, मग तिथेच पारगभर गप्पा झोडीत बसायचा.पाटलांच्या वावरात सुरू असलेल्या कामाचे गणितं जुळवत लोकांना सांगायचा.
लोकं पाटलांची गुपितं त्याच्या भोळ्या स्वभावामुळे भोळ्या राजूकडून काढून घ्यायची अन् मग भोळ्या राजूची पाटील बोल लाऊन खरडपट्टी काढीत असे.
दुपारचा पार कलून गेला उतरतीची उन्हं मळ्याला आली होती अन् इतकावेळ झुळक्या बावडीपाशी पसरलेले पाटील वावरात भटकत भटकत आम्ही कांदे काढीत होतो तिथं आले. भोळ्या राजू मागे पडलेल्या कांद्याच्या पाथीला माळरानात गंजी करून ठेवत होता. पुढे पाथीचे ते गवत वाळून गेलं की कांदा काढल्यावर त्याला उभ्या वावरात तो जाळून टाकणार होता. पण आम्हाला काही दोन जुड्या तो पाथीच्या देणार नव्हता. पाटलांनी त्याला तसं सांगितलं असावं, नाहीतर भोळ्या राजू त्यांची चड्डीसुद्धा लोकांनी गोड बोललं तर काढून देईल इतका भोळा होता.
पाटील आमच्या कांदे काढायच्या टोळीकडे आले तसं सगळे गपगुमान होऊन कांदे काढू लागले. आमच्या टोळीच्या मुकरदंम बाई म्हणजे शांता मामीला पाटील बोलते झाले अन् मी अन् इस्माईल नजर खाली घालून जमिनीतील कांदे उपटू लागलो होतो. काय शांता अक्का कसा हायसा यंदाच्या सालाला कांदा पाटलांचा, हाय का साऱ्या गावात टाप पाटलांच्या कांद्यासारखी पोचायची कुणाच्या कांद्यात. यंदाच्या सालाला मोप खर्च केला आहे शांता मामी कांद्याला लाखूच्या वर खर्च झाला हाय. बस तुमच्या आशीर्वादाने पाटलाचा पैका व्हावा कांद्याचा. पुन्हा दोन तीन बीघे जमीन घेतो बघा यंदाच्या सालाला मामी.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.