प्रिय बाईंस..

23 Jan 2024 12:16:36
 
प्रिय बाईंस.
प्रिय बाईंस..
प्रवीण दवणे हे नाव, किंबहुना मराठी वाड्मय विश्वातील हे समृद्ध दालन प्रत्येक मराठी रसिक-वाचकाला परिचित आहेच. त्यांची गीतं जशी अजरामर आहेत, तद्वतच त्यांच्या कविता आणि ललितही. मानवी जीवनातील सकारात्मकतेचा शोध त्यांच्या एकूण साहित्यातून प्रतिबिंबित होतो. त्यातून आनंदाचे प्रवाह जितक्या सहज ओघळतात, तितक्याच सहज उत्साही आशावादही आपल्या अंतरमनात रुजून जातो. मनाला मांगल्याची नवीशी अत्तर-पालवी फुलवण्याचं काम त्यांचं सबंध साहित्य अलवार करत राहतं, यात शंका नाही. त्यांच्या वाणीतली मृदूता शब्दांत आहे की शब्दांतली वाणीत.. माहित नाही. पण त्यामधील उत्कटतेचा उत्फुल्ल आविष्कार सुखद ठरतो. त्यांच्या मुक्तछंदातही एक मनोव्यापी लय असतेच, आणि एकूण कवितेत भावभावनांचे तरल तरंग लहरत राहतात. आज, अशीच एक आठवणींचं मोहळ जागवणारी त्यांची कविता, 'प्रिय बाईंस'
'शाळा' हा आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा टप्पा असतो, अनुभव असतो. केवळ प्राथमिक-माध्यमिक शिक्षणासाठी नव्हे, तर आपल्या भावविश्वाला घडवणारी आणि सर्वांग-समृद्ध करणारी ऊब आपल्याला तिथे मिळत असते. पण फक्त म्हणूनच शाळा परिपूर्ण होत नाही. ती परिपूर्ण होते, किंवा ती वास्तू 'शाळा' होते, ती शाळेतील शिक्षकांमुळेच. कारण विद्यार्थ्यांना घडवण्याचा हेतू तेच तर साध्य करतात. त्यांच्याप्रति कृतज्ञतेचा षडज पुढे आयुष्यभर लावला, तरी अपुराच पडतो! रक्ताच्याही पलिकडचं नातं ज्यांच्याशी आपसुक जोडलं जातं, अशा शिक्षिका म्हणजे बाईंबद्दलची ही कविता.
'शाळा' असं फक्त म्हटल्यावरही आपल्या आत जागं होणारं आठवणींचं जपून ठेवलेलं कोवळं संचित, म्हणजे कविताच तर असते!! आपण प्रत्यक्ष अनुभवलेली. आणि आता स्मृतींतून तिचंच रसग्रहण करत आयुष्याची कविताही साजेशी यमकं साधू लागते... कदाचित, याच विचारातून जन्माला आलेली ही कविता..
बाईंसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच!
आहे-नाही असा पाऊस, ओली कातर संध्याकाळ
क्षितीजदूर तारेवर, आठवणींची मोहनमाळ!
जवळचेही जग दूर, असा एक-एकटा क्षण
वणव्यामध्ये व्यवहाराच्या, तगमगणारे द्विधा मन
कवितेची ही चित्रमय सुरुवात कवितेचीच नव्हे तर भावनांच्या व्यक्त होण्याचीच पार्श्वभूमी सिद्ध करते. वाटतं, की 'तो' कुणीतरी विद्यार्थी.. ज्याचं शालेय जीवन पूर्ण होऊन आता मोठा काळ लोटला आहे, त्यांचं हे मनोगत. शालेय जीवन पूर्ण होऊन अगदी काहिच वर्ष लोटली तरी कधीकधी तीही फार मोठं वाटतात, हेही खरंच! पण तरीही.. एका कातर संध्याकाळी, मंदावणा-या संधिप्रकाशात एकटाच बसलेला, तो दिसत राहतो मनाच्या डोळ्यांना.. आणि जाणवत राहतात त्याच्याही मनातले आठवणींचे लोभस कवडसे. 'आहे-नाही असा पाऊस' यावरुन त्याच्या आयुष्यातील वातावरणाची अस्पष्टता असावी किंवा, कदाचित कुणाच्या/कशाच्या तरी असण्या-नसण्याची खंत असावी.. तेव्हा क्षितिजदूर पोहोचलेल्या भूतकाळाच्या तारेवर, किंवा क्षितिजदूर पोहोचलेल्या मनाच्याच तारेवर आठवणींची माळ जागी होते. त्या आठवणी 'बाईंच्या'.. प्रिय बाईंच्या! म्हणून ती माळही मोहनमाळ आहे! वाटतं, की ती तारही असणार ती तंबो-याचीच. त्या तारेतून बालपणीचे सगळे किलबिल स्वर निनादू लागले असतील. पुन्हा एकदा मोकळेपणाने संवादी झाले असतील. पण हा आठवणीचा क्षण एकटा होता. जवळचेही दूर वाटण्याचा, व्यवहाराच्या निष्ठुर वणव्यामधे मन द्विधा होण्याचा क्षण. अशावेळी लागणारी आधाराची स्वाभाविक तहान त्यालाही लागली. आणि आठवली ती शाळा, आठवल्या.. प्रिय बाई! कदाचित, कित्येक वर्ष त्याची भेटही झाली नसेल बाईंशी. पण त्यांचं नातं हे शारिर पातळीवर नाहीच मुळी. त्यांचेच तर संस्कार फुलवत तो आयुष्याची तेलवात रोज करतोय. स्मरणातून सान्निध्य साधलं जातंय. पण आज मात्र इतक्या प्रखरपणे झालेली आठवण.. बाईंचं त्याच्या आयुष्यामधलं स्थान न बोलूनही अधोरेखित करुन जाते.
अशावेळी आधाराचा, एक हात अलगद येतो
घसरणाऱ्या वाटेवरती, अगदी सहज सावरून घेतो!
पुन्हा समोर येते शाळा, खडू-फळा, पुस्तक, वही
कठोर कधी, कधी मृदू, समासातली तुमची सही !
प्रत्यक्षही असेल कदाचित, किंवा आठवणीतून आलेलाही.. बाईंचा तो आधाराचा हात अलगदपणे पाठीवर येतो. त्याच हातामुळे, त्याचा गणवेशच नाही, तर कणा आणि आयुष्यही मुलायम स्वाभिमानी झालं असेल! घसरणा-या वाटेवर मग तोच हात सावरुन घेतो. आयुष्याला पुन्हा एकदा नाविन्याचा आकार येतो! पण हो.. तो हात एकटा येत नाही. त्यासोबत शाळा, खडू, फळा, वही-पुस्तक सगळ्याचा दाट आंतरउमाळा जागा होतो. बाईंच्या सगळ्या कठोर-मृदू आठवणी ताज्या होतात, आणि समासातली त्यांची सहीही मनावर नव्याने कोरली जाते. ती लाल पेनातली सही, म्हणजे रक्ताच्याही पलिकडचं नातं सांगणारी प्रेमळ खुणच तर आहे!!
केव्हा वत्सल शाब्बासकी, तर कधी कडक उठाबशा
हातांवरच्या वळांनी तर- हाती दिल्या नव्या दिशा!
पुस्तकाची खिडकी उघडून, पंख दिलेत आकाशाचे
अक्षराच्या मूळात तुम्ही, बळ दिलेत, आयुष्याचे !
त्या बाई प्रिय आहेत, त्या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे. आणि बाईंचा प्रेमळ स्वभाव, म्हणजे त्यामधे प्रसंगी कठोर होणंही स्वाभाविकपणे आलंच. म्हणून त्याला जशी त्यांची वत्सल शाबासकी आठवते, तशाच उठाबशा आणि क्वचित हातावर उमटलेले वळही स्मरतात. 'वत्सल' हा किती नेमका शब्द आहे! ज्या शब्दाशी आपण केवळ आईलाच जोडतो, त्याच्याशी बाईंनाही जोडता येतं. त्याही वात्सल्यानेच तर मुलांना शिकवतात. केवळ नोकरी म्हणून न शिकवता, 'शिक्षक-धर्म' आचरताना त्यामधे वात्सल्याची आर्दता असते, म्हणूनच तर त्या 'प्रिय बाई' आहेत! 'हातांवरच्या वळांनी..' या ओळीतील संदर्भाची चमक तर आपाल्याला अक्षरशः स्तिमित करते. त्या वळांमधे शिस्त लावण्याचं असं सामर्थ्य असतं, की जणू त्यामुळे हातावरच्या रेषा बदलतात! भविष्याला नवा आकार येतो आणि आयुष्याच्या नव्या दिशा सहजी खुल्या होतात! त्यांनी रुजवलेलं पुस्तकांचं प्रेम आकाशात भरारी घेण्याचं बळ देतं, आणि अक्षराच्या मुळातून तर त्या आयुष्याचं मर्म त्या आपल्या ओंजळीत देत असतात. पुस्तकापलिकडे जाऊन शिकवणा-या बाईंचं जणू हेच तर ध्येय असतं!
कधी आई, कधी ताई, कधी चक्क मित्र झालात
जेव्हा काळोख धाक घाली, तेव्हा प्रेमळ ज्योत झालात!
त्याच प्रकाशात बाई, चालतो आहे पाऊलवाट
आठवणींच्या जगामधून, सोबत दावी तुमचा हात!
बाई शिक्षिका आहेतच, पण त्याचसोबत आई, ताई, मित्र, अशा सगळ्याच भूमिकांतून त्या वावरतात. कधी कुठली भूमिका घ्यायची याचा अचूक विवेक त्यांच्याकडे अखंड असतोच, आणि समजून घेऊन शिकवण्याची हातोटी जणू त्यांच्या हाडातच असते! मग अशा सगळ्या भूमिका प्रेमाने निभावताना, जेव्हा एखादा काळोख भिती दाखवतो, तेव्हा त्याला सामोरं जाण्याची, तो संपवण्याची ज्योत बाईच तर मनात जागवतात! ती ज्योतही प्रेमळ आहे! तिचा प्रकाश तर वाटाड्या आहेच, पण त्या ज्योतीसह एक आश्वासक ऊबही आहे. 'तो' कुणीतरी शाळेत असताना.. त्याच्या मनातील स्वतःबद्दलच्या साशंकतेची धुळ बाजूला सारुन ती ज्योत बाईंनी जागी केली होती. त्याला किती वर्ष लोटली असतील! पण आजही तो त्याच प्रकाशात चालतो आहे. आठवणींच्या जगात अगदी आजही त्याला त्या दिसतात.. भेटतात.. तेव्हा सायंकाळचा कातरपणा क्षणभर हिरवा होत असेल!
वादळवारा, काटेकुटे-म्हणून कुठले भय नाही
जपून ठेवली आहे मनात- ती वही! ती सही!!
शेवटी.. हिच तर जाणीव त्याच्या ओंजळीत दरवळतेय! की वादळवारा, काटेकुटे, आतुष्याच्या वळणांवर अगदी काहीही अनपेक्षित प्रकट होवो.. त्याला त्याचं भय नाही. कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं विवेकी धाडस त्याच्याठायी आहे, वाळवंटातही उमेदीची रुजवाई करण्याचा निर्धार आहे. कारण, 'ती' वही आणि 'ती' सही त्याने मनात अलगद जपून ठेवली आहे. यामधील 'ती' शब्दाचं प्रयोजन प्रत्येकासाठी आपापल्या वयक्तीक संदर्भांचे आठवगोफ घेऊन येणारं आहे. कवितेतील हे शेवटचं कडवं म्हणजे बाईंच्या आठवणीची, त्यांच्या कामाची फलश्रुतीच वाटते! आठवणींच्या गंधखुणा ओतप्रोत दाटून येतात.. ओघळणा-या अश्रूंना त्यांचाच सुगंध येतो..
~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0