उत्तराखंड - देवभूमी

19 Jan 2024 11:30:06
 
उत्तराखंड - देवभूमी
उत्तराखंड - देवभूमी

केरळ जर देवाचे घर असेल तर उत्तराखंड देवभूमी आहे. देवांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. देवांना इथेच का राहावेसे वाटले असावे याचे कारण या भूमीत पाय ठेवल्याक्षणी समजते. मानवाने निसर्गाला ओरबाडले, प्रदूषण वाढवले तरीही आजही इथे प्रसन्न वाटते. आजही इथे ढीगभर ऑक्सिजन असेल तर कोणे एके काळी, देवांच्या काळी किती प्रसन्न हवामान असावे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आजपासून उत्तराखंडमधील खाद्य संस्कृती आपण जाणून घेणार आहोत.

हिमालयाच्या कुशीत दडलेले उत्तराखंड! काही प्राचीन हिंदू साहित्यात या भूमीचा उल्लेख केदारखंड आणि मानसखंड यांचा एकत्रित प्रदेश असाही केला जातो. केदारखंड आज गढवाल आणि मानसखंड कुमाऊ या नावाने ओळखले जाते. पुराणात या प्रदेशाचा उल्लेख स्वर्गभूमी म्हणूनही केला आहे. इथले हिमालयाचे पांढरेशुभ्र बर्फाळ वातावरण, मोहक निसर्गसौंदर्य पाहूनच स्वर्गाची कल्पना सुचली असावी! उत्तराखंड इथे पूर्वीपासूनच संत, महर्षी यांचे वास्तव्य असायचे. निसर्ग आणि पहाडांचे आकर्षण संतांना पूर्वीपासूनच आहे. अशा ठिकाणी मनन, चिंतन, ध्यान आणि अभ्यास छान होतो. त्यामुळेच काश्मिरमध्येही कायम पंडित म्हणजे आजच्या भाषेत संशोधकांचे वास्तव्य असायचे. तसेच इथेही. उत्तराखंडचा इतिहास पाहिल्यास इथेच महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले म्हणतात. पांडवांचीही इथे वस्ती होती. गढवाल आणि कुमाऊं राज्यांच्या पहिल्या प्रमुख राजवंशांमध्ये BC 2 र्या शतकातील कुनिंदांचा समावेश होता, ज्यांनी शैव धर्माच्या सुरुवातीच्या स्वरूपाचे पालन केले आणि पश्चिम तिबेटसह मिठाचा व्यापार केला. गढवाल किटो हे उत्तरेकडील उच्च प्रदेशात आणि इतरत्र स्थायिक झाले आहेत, ते सध्याच्या भोटिया , राजी , बुक्शा आणि थारू लोकांचे पूर्वज असल्याचे मानले जाते. आठव्या ते १८व्या शतकापर्यंत चांद राजांच्या अंतर्गत कुमाऊँची भरभराट झाली आणि पहाडी चित्रकला १७व्या ते १९व्या शतकापर्यंत विकसित झाली. सध्याचे गढवाल सुमरा राजघराण्यांत एकीकरण झाले होते, जे ब्राह्मण आणि राजपूतांसह मैदानी प्रदेशातून आले होते. त्यानंतर नेपाळच्या गुरखा आणि ब्रिटिश लोकांनी इथे राज्य केले. स्वातंत्र्यानंतर गढवाल आणि कुमाऊ भाग उत्तरप्रदेशमध्ये विलीन झाले पण २००० मध्ये हे राज्य परत उत्तराखंड नांवाने वेगळे झाले.

इतिहास पाहता उत्तराखंडवर मुघलांचे राज्य कधीही नव्हते. इथली मंदिरे आजही त्यामुळेच भक्कमपणे उभी आहेत. जैन आणि बौद्धधर्माचीही अनेक मंदिरे इथे पाहायला मिळतील. इथल्या खाद्यसंस्कृतीवर पगडा असला तरी नेपाळ, तिबेट भागाचा असेल. हिमाचल प्रदेशमध्ये जसं आजही वैदिक काळातील पदार्थ लोक खातात तसं इथेही असावे. हळूहळू हे सगळे या सिरीजमध्ये उलगडेलच. इतिहासाची पाने चाळता चाळता मला राणी कर्णावतीचा उल्लेख दिसला. ही खाद्यसिरीज असली तरीही या पराक्रमी राणीबद्दल न लिहिता मी पुढे जाऊच शकणार नाही.

राजपूत राजा महीपत शाह यांचे शासन गढवाल राज्यावर होते. राज्याकडे नजर फिरवणाऱ्या मुघलांचा त्यांनी सामना केलाच पण तीन वेळा तिबेटवरही आक्रमण केले होते. १६३१ मध्ये रानभुमीवरच महीपत शाह यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर त्यांचा सात वर्षांचा मुलगा पृथ्वीपत गादीवर आला आणि सर्व कामकाजाची जबाबदारी त्यांची पत्नी राणी कर्णावती यांच्यावर आली. हिमाचलच्या राजघराण्याचा भाग असलेली राणी कर्णावती राज्य छान सांभाळत होत्या पण अर्थातच एक स्त्री असल्याने लोकांना हे फारसे आवडले नाही. या वेळी कुमाऊच्या राजाने मुघलांशी संगनमत करून गढवालवर हल्ला केला. राणी कर्णावतीने हा हल्ला परतवून लावला शिवाय शत्रूराज्यातील पकडलेल्या सैनिकांचे नाक कापले. त्यामुळे या राणीला नाक कटी राणीही म्हणतात. या युद्धादरम्यान राणीने बिंदेश्वर महादेवाच्या मंदिरात आश्रय घेतला होता. एका क्षणी राणीच्या सैन्याची बाजू कमकुवत पडू लागली त्यावेळी अचानक मोठमोठ्या गारांचा मारा सुरु झाला आणि मुघल सैन्य हैराण झाले. युद्ध जिंकल्यावर याला बिंदेश्वर महादेवाचा आशीर्वाद समजून राणीने मंदिराचा जीर्णोद्धार केला. असे विख्यात अंग्रेज़ विद्वान एडविन एटकिंसन ने ‘हिमालयन गजेटियर’ (Himalayan Gazetteer) या पुस्तकात लिहिले आहे. हे मंदिर पांडवांनी स्थापन केले असही म्हणतात. हे सगळे उत्तराखंडमध्ये घडत होते त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.

राजपूत राजांचे शासन असल्याने इथल्या खाद्यसंस्कृतीवर राजस्थानी पदार्थांचाही प्रभाव आहे. अर्थातच हा पहाडी भाग असल्याने इथे मिळणाऱ्या भाज्या, धान्य यांचा वापर जास्त आहे. गढवाल हे केवळ गढवाली सिल्क साडीसाठी प्रसिद्ध नसून त्यांचे वेगळे पदार्थही आहे. कुमाऊ आणि गढवाल यांच्या पदार्थांमध्ये थोडाफार फरक आहे, तो जाणून घेऊच! मंडवे की रोटी, झंगुरे की खीर, अरसा, चैसोणी, भांग की चटनी, कंगाली का साग, बाडी, फाणु का साग, गहत के परांठे हे इथले प्रसिद्ध पदार्थ आहे. या सगळ्या नावांपैकी मला फक्त भांग माहित आहे, ती पण सिनेमात त्याचे पराक्रम पाहिले आहेत. नावे वेगळी असली तरी पदार्थाचे मूळ आपण शोधून काढूच. त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल याबद्दल मी नेहमीप्रमाणे न मागता उपदेश देईलच. चला तर मग, आपण कधीही न ऐकलेल्या या पदार्थांबद्दल जाणून घ्यायला सज्ज व्हा.
--
Powered By Sangraha 9.0