सुगीचे दिस..! भाग - ६
झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्यावर येऊन आम्ही भाकरी खाण्यासाठी येऊन बसलो. मायना केलेलं भरले वांगे अन् भाकर बघून मला कधी एकदा बासनात भाकर,कोड्यास घेतो अन् खाता होतो असं झालं होतं. भुकीने पोटात कावळे ओरडत होते, त्यात भोळ्या राजूने भाकरी संगतीने तोंडाला लावायला म्हणून काल गावच्या देवऋष्या धनगराच्या पोरीच्या लग्नाला गावभरच्या पंगतीसाठी देवऋष्या धनगराने केलेली बुंदी भोळ्या राजुने आजही आता भाकरीसोबत खाण्यासाठी आणलेली होती. त्यामुळे आज एकूणच भाकरी खायला मज्जा येणार होती.
इस्माईलच्या मायने बोंबलाची खुडी अन् बाजरीची भाकर अन् लोणच्याची चिरी छोट्या बाटलीत आणली होती. तर शांता मामीने तव्यावर केलेलं जाड पिठलं भाकरी फडक्यात बांधून आणली होती. इस्माईलने अन् मी डब्याच्या एका झाकनात भाजी अन् बोंबलाची खूडी घेऊन भाकरीला हातात घेऊन खायला सुरू केलं. माय शांता मामी अन् इस्माईलची माय तिघीसुद्धा भाकरी खायला बसल्या.
भोळ्या राजूने एका केळीत पाणी भरून घेतले अन् त्याची भाकर डांगराची भाजी घेऊन तो ही आमच्या वर्तुळात भाकर खायला येऊन बसला . घास-दोन घास खाल्ले की पाणी पीत मी अन् इस्माईलने पाणी पिऊनच पोट भरवून घेतले. मायचे अन् त्यांचे भाकर खायचे होईस्तोवर आम्ही थोडं भटकायला म्हणून पाटलाच्या वावरात भटकू लागलो.
बांधाच्या एका अंगाला चालत असताना दांडात पडलेले पहाटेची बोरं आता गरम उन्हात गरम झाल्याने शेंबडाच्या लोळीसारखी झाली होती. दोन्ही पँटीच्या खिश्यात खिशे शिघोशिग भरून घेत आम्ही बोरं खात भटकत होतो. पाटलाच्या शेताला एका अंगाला असलेली शिवनामाय निवांत वाहत होती, यंदाच्या सालाला झालेला मोप पाऊस अन् मागच्या सालाला महादेवाच्या मंदिरालोक आलेलं पुराचे पाणी त्यामुळं गावाला पुढे दोन-चार वर्ष पाण्याचं टेन्शन नव्हतं.
गाव सुखी असणार होता, शेतकऱ्यांची पिके मोप पाण्याचा साठा असल्याने चांगली पिकणार होती. त्यामुळे आमच्या सारखं मजुरीने जाऊन पोट भरणाऱ्या गरीब लोकांचं आयुष्य पुढे दोन-चार वर्ष तरी निवांत कामात तरणार होतं, असं दिसून येत होतं.
मी अन् इस्माईल नदीच्या निवांत वाहणाऱ्या पाण्याला बघत निवांत बसून होतो. नदीच्या एका अंगाला असलेल्या थडीवर गावातल्या बायका धूने धुवत बसल्या होत्या, त्यांचा गलका आम्ही बसल्या जागेपर्यंत येत होता. महादेवाच्या मंदिरात सुरू असलेला नारळी सप्ताह अन् त्यात सुरू असलेलं कीर्तन बाराच्या ठोक्याला जे सुरू झालं होतं त्याचं उत्तरार्ध आमच्या कानी पडत होता.
सारं गाव आज सपत्यात उपस्थित होतं. धोंधलगावचे ह.भ.प साकेश्र्वर महाराज आज कीर्तनाला आले होते. मागच्या सालाला आमच्या गावात ते कीर्तनाला आले अन् कावीळ झालेला त्यांचा लेऊक वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या अंतिम यात्रेला मग सर्व गाव उपस्थित होता. महाराज आज आले तेव्हा महाराजांना ही आठवण झाली अन् त्यांनी सत्करात दिलेलं शाल श्रीफळ न स्वीकारता कीर्तनाला म्हणून ते घोंगडीवर उभे राहिले होते.
अख्खं गाव आज त्यांच्या कीर्तनाला उपस्थित होते. शिवना मायचं निवांत वाहणे, तिच्या आत सुरू असलेला बगळ्यांचा खेळ, पान कोंबड्यांचा खेळ मी अन् ईस्माईल बघत बसलो होतो. तितक्यात मायना आवाज दिला, आमचं लक्ष विचलित झालं अन् भानावर येत मी इस्माईलला आवाज देत चालायचा इशारा केला.
दूरवरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज येत होता,कदाचित पाटील चक्कर टाकायला अन् कांदे काढायचं काम कसं चालू आहे हे बघायला येत असावा. मी अन् इस्माईल माय जवळ आलो दुपारची उन्हं उतरतीला होती इस्माईलच्या मायने उतरत्या उन्हाचा चटका बघून आम्हाला दोघांना मुंडासे बांधून कामाला लागायला सांगितलं. मी मायना आणलेल्या भाकरीचे धुडके डोक्याला गुंडाळून घेतले अन् केळीतून गिल्लासभर पाणी तोंडात ओतून कामाला लागलो.
माय अन् शांता मामी, इस्माईलची माय कांदे पातीतून वेगळी करायला लागले अन् आम्ही दोघे कांदे काढू लागलो. भोळ्या राजू त्याचे बासने घेऊन हौदावर गेला अन् त्याने त्याची बासने, त्याची धुण्यातील कपडे हौदावर धुतली. ढोरं पाणी दाखवायची म्हणून त्यांना सोडवून तो कुंडीवर घेऊन आला अन् काहीतरी गाणे गुणगुणत त्यांना पाणी पाजत होता. तितक्यात पाटलांची राजदूत आवाज करत झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्या येऊन थांबली.
- भारत लक्ष्मण सोनवणे .