लडाखी पेय

08 Sep 2023 15:06:56

लडाखी पेय

लडाखमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पेये आहेत. आज आपण या सगळ्यांबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. खरंच विचार केला तर किती व्हरायटी आहे ना या सगळ्यात. किती पर्याय आहेत आपल्यासाठी. एकट्या भारतात, एका राज्यात इतके वेगवेगळे पदार्थ कसे असू शकतात? मी याचा विचार करणेच सोडून दिले आहे सध्या. दरवेळी आपल्या देशाबद्दल तितकेच नवल आणि कौतुक वाटते.

खुनक - काहीतरी खतरनाक उर्दू शब्द असावा असं तुम्हाला वाटत असेल तर असं नाहीये. आपल्या सध्या काळ्या चहात मीठ टाकले कि तयार! चहाची पाने पाण्यात उकळून त्यात चवीपुरतं मीठ घालून काही दिवस साठवून ठेऊ शकतो. दूध नसल्यामुळे खराब होत नाही. लिंबू चहा मी प्यायले आहे पण हा नमकीन चहा वेगळाच आहे. कारगिलच्या आसपास गुर गुर चहा पेक्षा जास्त हा चहा प्रसिद्ध आहे.

चा श्रुल - बटर चहा आणि जव/सातूचे मिश्रण म्हणजे चा श्रुल. बटर चहामध्ये भाजलेले सातूचे पीठ मिसळून हे पेय बनवतात. पोटभर चहा पिण्यापेक्षा चहालाच पोटभरीचे पेय बनवण्याची हि कल्पना वेगळीच.

चुली छू - किती वेगळी नावे आहे सगळी! लडाखी जर्दाळू/ऍप्रिकॉट पासून हे पेय बनवतात. उन्हात वाळवलेले जर्दाळूही वापरतात. जर्दाळूचा सुगंध या पेयात असतो. त्यासाठी त्याला पाण्यात भिजवून ठेवले जाते. हा सोप्या भाषेत ताज्या जर्दाळूचा ज्यूस असतो. छान नारंगी पिवळसर रंगाचा ताजा ताजा ज्यूस पौष्टिक तर आहेच पण चविष्ठही.

छांग - आता सुरवात होतेय फरमेंटेड पेयांची. हे पहिले पेय म्हणजे जव किंवा सातूपासून बनवतात. क्राफ्ट बेव्हरेजेस मध्ये मोडणारे छांगमध्ये सातूचे विशिष्ठ चव असते. अल्कोहोलचे प्रमाण नगण्य असते पण तिकडच्या थंडीसाठी योग्य! लडाखी उत्सव आणि मित्रमैत्रिणींच्या समारंभात हे पेय असतेच. काही प्रकारात तांदूळही असतो. भरडलेले धान्य किंवा अर्धवट फर्मेंट झालेले धान्य बांबूच्या उभट भांड्यात ठेवतात आणि त्यावर गरम पाणी ओतले जाते. थंड झाल्यावर हे भांडे तीन दिवस फर्मेंट केले कि छांग बनते.

अरक - छांगचे डिस्टिलेशन केले कि हे पेय बनते. हे गव्हांपासूनही बनवतात. पारंपरिक छांगला नवीन रूप दिल्यामुळे त्याची चवही सुधारली आणि शेल्फ लाइफही.

गुंतशांग - हा उच्चार बरोबर असावा अशी आशा आहे कारण हि पाककृती कुठे युट्यूबवरही मिळाली नाही. हे साधारण वाईनसारखेच कारण दाक्षांपासून बनवले जाते. फरमेंटेड दाक्षांपासून बनवले जाते.

या सगळ्या पदार्थांबद्दल मलाही जास्त माहिती मिळाली नाही. लडाखला गेल्यानंतर जमतील तितके पदार्थ नक्की खाणार आणि पिणार. दुर्दैवाने यावरून एक लक्षात येते कि आपल्याला परदेशातील कोणती वाईन कशी आणि कोणत्या पदार्थांसोबत पितात, कॉफिचे किती प्रकार हे माहित आहे पण आपल्याच देशातील पेयांची नावेही माहित नाहीत. हे सगळे प्रकार मार्केटमध्ये यायला हवे. केवळ साखरेचा भडीमार असलेल्या पेयांपेक्षा सातूचा बटर चहा पिणे कधीही चांगले नाही का? यासाठी अर्थात संशोधन, स्केलअप आणि मार्केटिंग लागेल. कोणी सांगावे, काही वर्षांनी शार्क टॅंक इंडिया मध्ये एखादी लडाखी व्यक्ती हि पेय छान बॉटलमध्ये सजवून इक्विटी विकायला येईल. तसेच होवो या सदिच्छा!

Powered By Sangraha 9.0